अतिथी कट्टा

दिनांक : २२-०८-२०२१

ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत



ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत यांचा २२ ऑगस्ट हा स्मृतीदिन. त्यानिमित्तानं डॉ. वि. स. पागे लिखित आणि लाखे प्रकाशन प्रकाशित ‘रूपेरी इतिहासाची सोनेरी पाने’ या पुस्तकामधील सूर्यकात यांच्यावर लिहिलेलं एक प्रकरण आम्ही संपादित रुपात प्रकाशित करीत आहोत.

——

‘बाल ध्रुव’ हा सूर्यकांत यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी विष्णूचं काम केलं होतं. भालजी पेंढारकर यांच्या ‘बहिर्जी नाईक’मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. ते केवळ दिग्दर्शक नव्हते. उत्कृष्ट संवाद लेखक होते. त्यामुळे त्यांनी ‘ठिणगीनं आग लागते. पण ठिणगी विझली म्हणून आग विझू नये’ अशी वाक्ये लिहिली. सूर्यकांतकडून ती हवी तशी म्हणवून घेतली. ‘पावनखिंड’मध्येही ते शिवाजी महाराज झाले. चित्रपटाची कथा बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर केंद्रित असल्यामुळे बाबूराव पहेलवान प्रभावी ठरले. पण सूर्यकांत दुय्यम ठरले नाही. तीच गोष्ट ‘महाराणी येसूबाई’ या सुलोचना प्रधान चित्रपटाची. त्यातही सूर्यकांतचे संभाजीमहाराज कमी पडले नाहीत. ‘थोरातांची कमळा’मध्ये ते संभाजीमहाराज ठरले. ‘सुभद्राहरण’मध्ये अर्जुन झाले. ‘महारथी कर्ण’मध्ये सहदेव.

सूर्यकांत अभिनेते म्हणून गाजले ते सामाजिक चित्रपटांमधून. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटात ते शोभून दिसले. सूर्यकांत म्हणजे ‘वारणेचा वाघ’. सूर्यकांत म्हणजे ‘फकीरा’. ‘वैजयंता’ मध्ये तो लावणीकार होतो. ‘ज्योतिबाचा नवस’ मध्ये तर चित्रपटभर सूर्यकांत नुसता घुमत असतो. या चित्रपटातील वेषांतर त्यांचे त्यांनी केले. धमाल आणली. ‘मल्हारी मार्तंड’मध्ये तो रांगडा मराठा नायक शोभला. त्याला त्याच्या सारखीच कलेची जाण असणारी नृत्यांगना पत्नी हवी असते. संघर्ष करून तो ती मिळवतो. या चित्रपटातल्या ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागलं कोल्हा’ किंवा ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचत हवा आई मला नेसव शालू नवा’ या लावण्या खूप गाजल्या.

जयश्री गडकर-सूर्यकांत ही जोडी चित्रपटांमध्ये चांगली रमली. पण सूर्यकांत-उषा किरण ही जोडी ‘कन्यादान’ आणि ‘शिकलेली बायको’ या दोन चित्रपटांमुळे चांगली गाजली. जरी उषाताईंच्या शिष्ट स्वभावाबद्दल सूर्यकांतांनी त्यांच्या ‘धाकटी पाती’ या आत्मचरित्रात प्रतिकूल अभिप्राय दिला असला तरी प्रत्यक्ष चित्रीकरणात ही प्रतिकूलता त्यांनी अजिबात जाणवू दिली नाही. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ ‘प्रभात’च्या उदयाने सुरू झाला. दादा कोंडकेच्या निधनानं त्याचा अस्त झाला. पण माध्यान्हकाळात जे चांगले चित्रपट निर्माण झाले, त्यात हे दोन्ही चित्रपट. ‘कन्यादान’ची कथा पं. महादेवशास्त्री जोशी यांची. रूबाबदार लष्करी अधिकारी कुमार झालेल्या सूर्यकांतचे काम मध्यंतरापर्यंतच. प्रसन्न चेहऱ्याचा सूर्यकांत वावरतो. तेवढ्या कामातही प्रभाव पाडतो. प्रथम लग्न करायला आढे वेढे घेणारा पण सुमाला (उषा किरणला) पाहाताच काहीसा खट्याळ प्रियकर, पत्नीपरायण पती अशा दुहेरी भूमिकेत तो चांगला शोभतो. ‘कोकीळ कुहु कुहु बोले’ या गाण्याच्या वेळचा दोघाचा सुखद प्रणय प्रेक्षकांना आनंदीत करतो.

‘शिकलेली बायको’ हा चित्रपट नारायण हरि आपटे यांच्या ‘डॉक्टर’ कादंबरीवरील, नायक रघुनाथ, सूर्यकांत. नायिका कमलिनी उषा किरण. रघु हा पहेलवान. आखाड्यावर प्रेम असणारा. एडक्याशी झुंज घेणारा. शिक्षण आपलं बेताबेताचं. दोघांच्याही आई-वडिलांच्या आग्रहानं या आते-मामे भावंडांचं लग्न लागतं. पण ‘शिकलेल्या बायकां’ विषयी रघुनाथचे मित्र त्याच्या मनात काहीबाही भरवतात.

तू बायकांचा गुलाम होशील. शिकलेली बायको आली की घराची कोर्ट होतात. वगैरे वगैरे. या फुसलावणीला रघुनाथ बळी पडतो. त्यावेळचा त्याचा कावरेबावरेपणा, संशय, चिडचिड, न्यूनगंड हे सगळं सूर्यकांतनं त्याच्या मुद्रेवर आणलं. न्यूनगंडाचा अतिरेक म्हणजे बायको, ‘आली हासत पहिली रात’ गाणं म्हणते तर हा पांघरूण घेऊन पाठ करून झोपून जातो. ‘नांदवायला सांगू नका. शिकलेल्या मुलीशी लग्न केल्याबद्दल वाट्टेल ती शिक्षा भोगायला मी सिद्ध आहे’ असेही म्हणतो. गैरसमज वाढतात. आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध तो बायकोला टाकतो. पुढे अनेक चित्रपटीय वेगाने घडतात. शेवट गोड होतो. प्रेक्षक सूर्यकांतच्या भूमिकेतील विविधता मनात ठेवून घरी जातो.

मास्टर विठ्ठलचा प्रभाव असलेल्या सूर्यकांतच्या संभाव्य शहरी भूमिकांविषयी काही जणांच्या मनात शंका असायची. ग. दि. माडगूळकरांनीच ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ या चित्रपटात सूर्यकांतला नायक म्हणून घेऊ नका असा समादेश दिला होता. दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारीनी तो नाकारून सूर्यकांतला घेतलं. सूर्यकांतनं भूमिकेचं सोनं केले. तीच गोष्ट ‘कांचन गंगा’ चित्रपटाची. ‘सुरेल चित्र’च्या या चित्रपटात नायक महाविद्यालयीन घरंदाज तरूण आणि नायिका गणिका यांची पटकथा गुंफलीय. कथा प्रक्षोभक असलेली तरी स्वत:च्या शांत शैलीच्या संवादांनी सूर्यकांतनं चित्रपट इतक्या उंचीवर नेऊन ठेवला की चित्रपट संपला तरी त्याचे संवाद कानात घुमत राहतात. तीच गोष्ट प्रा. ना. सी. फडके यांच्या कादंबरीवर आधारलेल्या ‘कलंक शोभा’ चित्रपटाची. या चित्रपटात स्वतःवर प्रेम करणाऱ्या ख्रिश्चन परिचारिकेला नायकाचा नकार द्यावा लागतो. पण तरीही तिच्याबद्दल तो अत्यंत भारावलेल्या संवादांनी चित्रपटाचा शेवट करतो. संवाद सूर्यकांतचे पण मोठेपण मिळते परिचारिकेला. ही किमया सूर्यकांतने साधली. एकीकडे तो अशा भावनाप्रधान चित्रपटात भावून भूमिका वठवत होता. दुसरीकडे ‘सासर माहेर’सारख्या चित्रपटातून मारामाऱ्या करत होता. पडद्यावर कधीच न आलेल्या सुधीर फडके निर्मित एका चित्रपटात तर त्यानं चक्क वाघाशी झुंज घेतली. एका चित्रपटात त्याला अखंड धुम्रपान करणाऱ्या नायकाची भूमिका मिळाली. हिंदी चित्रपटात अशा भूमिकांसाठी अशोक कुमार प्रसिद्ध होता. सूर्यकांतची ओळख भगवान दादांनी प्राणला ‘हे मराठीतले दिलीपकुमार आहेत’ अशी करून दिली. अर्थात तो दिलीपकुमारही नव्हता. अशोककुमारही नव्हता. धूम्रपान करणाऱ्या नायकाची भूमिका त्याने स्वीकारली तो पर्यंत त्यांच्या ओठाला सिगारेट लागली नव्हती. भूमिकेत स्वाभाविकपणा येण्यासाठी त्यानं धुम्रपानाची सवय केली. चित्रीकरण संपल्यावर धूम्रपान बंद केले. ‘गाठ पडली ठकाठका’, ‘बाळा जो जो रे’, ‘अखेर जमलं’, ‘प्रीतीसंगम’, ‘भाऊबीज’, ‘पतिव्रता’, ‘साधी माणसं’, ‘सांगते ऐका’. सूर्यकांतचे यशस्वी चित्रपट किती सांगावे. ‘सांगते ऐका’ पुण्यात २३१ आठवडे चालला अशी ‘धाकटी पाती’ या आत्मचरित्रात सूर्यकांत माहिती देतात. पण चित्रपट कितीही चालो मानधन आपलं दीडशे रूपयांपासून दीड हजार रूपयापर्यंत. ‘साधी माणसं’ या लताबाईंच्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. पण त्या जीव लावून, परिश्रमकरून लोहाराची भूमिका करणाऱ्या सूर्यकांतला मानधन लोखंडाच्या किमतीचं मिळालं. सोन्याच्या मोलाचं नाही.

हळूहळू सूर्यकांत चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत शिरले. त्या दृष्टीने त्यांच्या दोन भूमिका लक्षणीय ठरल्या. एक ‘पवनकाठच्या धोंडी’मधील धोंडीची दुसरी ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ मधील एका चोराची. त्या चित्रपटात इतर दोन चोर होते गणेश सोळंकी, धुमाळ. दोघेही जातीवंत विनोदी नट. सूर्यकांत त्यांच्यापुढे थोडाही कमी पडला नाही. जसा ‘पडोसन’ मध्ये महमूद आणि किशोर कुमार समोर सुनील दत्त कमी पडला नाही. हां सूर्यकांतला मराठी चित्रपटातला सुनील दत्त म्हणायला हरकत नाही. तितकाच आल्हादक, तितकाच सभ्य. तितकाच घरंदाज.

– डॉ. वि. स. जोग

(सौजन्य – लाखे प्रकाशन)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया