अतिथी कट्टा

दिनांक : ३१-०३-२०२२

‘रौद्र’चं शूटिंग करताना आम्ही डेंजर घाबरलो होतो…


मराठी चित्रपटसृष्टीत सध्या खूप नवनवीन विषय हाताळले जात आहेत. ‘रौद्र’ या चित्रपटामध्ये रहस्याची एक नवीन बाजू पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ऊर्मिला जगताप आणि राहुल पाटील यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे.

ऊर्मिला जगताप :- ‘रौद्र’ हा 1970च्या काळातील चित्रपट आहे. याला ‘पीरियड फिल्म’ म्हणता येईल. सध्याच्या काळात अशाप्रकारच्या जॉनरचे चित्रपट खूप कमी पाहायला मिळतात. या चित्रपटात मी ‘मृण्मयी’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ती एक बिनधास्त मुलगी असून तिला मनसोक्त राहायला आवडत असतं. ती तितकीच हळवी आणि भोळीदेखील आहे. लोकांच्या विश्वात ती जगत असते. तिला सतत आपण कुठंतरी अडकलोय असं वाटत असतं. तिला आपल्या इच्छा पूर्ण करता येत नसतात. या फिल्ममधून प्रेक्षकांना मृण्मयीच्या स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतील. जुन्नर, संगमनेरच्या भागात हा चित्रपट चित्रीत झाला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या वाड्यात हे चित्रीकरण झालंय. हे वाडे खूप वर्षांपूर्वीच जीर्ण झालेले होते. त्यामुळे या पडीक वाड्यांमध्ये चित्रीकरण करताना मी खूप घाबरले होते. तसेच हा वाडा ज्या गावात आहे, तिथले लोकही आम्हाला शूटिंग करताना ‘थोडं सांभाळून हं’ असं सांगायचे. भुतंखेतं असतात, नसतात मला माहीत नाही. परंतु मुळात मी खूप भित्रट स्वभावाची आहे. शूटिंग सुरू असताना मी एवढी अलर्ट होते की एक क्षणही मी स्वतःला डुलकी लागू दिली नाही. संगमनेरच्या ज्या वाड्यात आम्ही शूटिंग केलं त्या वाड्यात एक आजी-आजोबांचे जुने फोटो अडकवलेले होते. तेव्हा मला असं वाटलं की यांचे फोटो अजूनही इथंच का आहेत. त्या फोटोमधील आजी मला अजूनही आठवतात. हे दोघं जण आमच्यासमोर बसले असून ते आम्हाला बघताहेत, आमच्या वाड्यात येऊन शूटिंग करतीस का गं… हे विचारताहेत, असं डेंजर फील व्हायचं. जुन्नरमधील वाड्यात शूटिंग करताना बिबट्यांचा वावरही असायचा. त्यामुळे अजूनही जास्तच घाबरायला व्हायचं. अर्थात या भीतीदायक पार्श्वभूमीचा मला अभिनयासाठी खूपच फायदा झाला.

राहुल पाटील :- खरं तर माझी ही दुसरी फिल्म आहे. परंतु, या चित्रपटाकडून मला पहिल्या चित्रपटापेक्षा खूपच अधिक अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे निर्माते माझे मित्र असले तरी त्यांनी ‘ऑडिशन’ घेऊनच मुख्य व्यक्तिरेखेसाठी माझी निवड केली. ‘त्र्यंबक’ असं माझ्या भूमिकेचं नाव असून ही व्यक्तिरेखा खूपच गुंतागुंतीची आहे. दिग्दर्शकाच्या सूचनेप्रमाणे मला माझ्या भूमिकेच्या फार तपशीलात नाही जाता येणार. ऊर्मिलासारखा मी घाबरट नाही. परंतु हा वाडा खूपच जुनाट असल्यामुळे घाबरायला व्हायचं. दिवसाचं शूटिंग असलं की फार काही वाटायचं नाही. पण रात्रीचं शूटिंग असलं आणि केवळ माझ्यावर ‘वाईड’ शॉट घ्यायचे असले की मीही घाबरायचो. अशाप्रकारचा विषय मराठीत अनेक वर्षांमध्ये आलेला नाही. म्हणून प्रेक्षकांनी हा चित्रपट आता चित्रपटगृहात येऊनच पाहायला हवा.

– मंदार जोशी

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया