अतिथी कट्टा

दिनांक : २८-०२-२०२०

‌‌‌‌‌‌‌‌‌‘भयभीत’ प्रेक्षकांना घाबरवून टाकणार – सुबोध भावेप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेचा ‘भयभीत’ नावाचा चित्रपट २८ फेब्रुवारीपासून प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्तानं त्याचं हे मनोगत.

——

चित्रपटाचं शीर्षकच भयभीत आहे. एकटेपणाची मला खूप भीती वाटते. तसेच अंधाराचीही. पण आजपर्यंत मला कधी भुताखेतांचा अनुभव आलेला नाही. परंतु, आपल्या मनामध्ये हा विषय नेहमी असतो. त्याची भीती वाटत असते आपल्याला. एकटेपणातून जे वातावरण नि परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे आपण प्रचंड घाबरत असतो. पाण्याचा एखादा थेंब जरी कुठं पडत असेल तर त्याचा आवाज आपल्याला घाबरवून टाकतो. रातकिड्यांचे आवाज, एखादं कुत्रं कुई… करत कुठंतरी किंचाळतंय… या सर्व आवाजांचा एक ‘इफेक्ट’ बनतो. त्याची आपल्याला भीती वाटते. तीच भीती प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना अनुभवता येणार आहे.

भीतीवर आधारलेल्या जॉनरच्या चित्रपटात आपल्याला काम करायला मिळतंय, याचा मला खूप आनंद झाला. आजवर आपण खूप घाबरलो. आता आपल्याला प्रेक्षकांना घाबरवायला मिळणार म्हणून. प्रेक्षक प्रचंड घाबरतील, अशा बर्‍याच गोष्टी या चित्रपटामध्ये आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हा भुताखेतांचा चित्रपट नाही. तसेच तो रामसे बंधू टाईपही चित्रपट नाही. यात खुनी पंजा वगैरे तत्सम गोष्टी काही येत नाहीत. यात सगळा मनाचा खेळ आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर दहाव्या मिनिटालाच प्रेक्षक प्रचंड घाबरणार आहेत. हा अ‍ॅडल्ट चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहताना लहान मुलांना सोबत नेऊ नये, अशी मी सूचना करीन. तरीपण तुम्ही जर मोठे असला तरी एकट्यानं हा चित्रपट पाहू नका. आपल्या सोबत दोघा-तिघांना घेऊन जा. चित्रीकरण, व्हिज्युअल इफेक्ट्स, पार्श्वसंगीत प्रचंड अंगावर येणारं आहे.

या चित्रपटाची गोष्ट ‘पिरीयड’ नसून आजच्याच काळातली आहे. शेखर नावाच्या एका चित्रकाराच्या आयुष्यातील ही गोष्ट आहे. त्याला बायको नि एक लहान मुलगी असते. माझ्या बायकोची भूमिका पूर्वा गोखलेनं साकारली आहे. हा चित्रकार बंगल्यात राहायला आल्यानंतर भलतंच घडायला लागतं. राघो नावाची एक व्यक्तिरेखा आहे. त्याची वारलेली बायको माझ्या मुलीला कशी दिसते, शेजारी यतीन कार्येकर असतो, बरेच अनुत्तरीत प्रश्नं असं काहीतरी कथानक आहे. चित्रपटाच्या शेवटाला त्याची उत्तरं मिळायला लागतात. नि पाहणार्‍याच्या अंगाचा थरकाप उडतो.

भीती जॉनरचा हा माझा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी मी ‘सविता दामोदर परांजपे’ नावाचा चित्रपट केला होता. परंतु, तो चित्रपट एका नाटकावर आधारलेला होता. तो एका सत्य घटनेवर आधारलेला होता. हा चित्रपट तसा नाही. ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’ या गटात या चित्रपटाचा समावेश करावा लागेल. या वर्षात प्रदर्शित होणारा हा माझा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळेच तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळात मला बायोपिक चित्रपट करायचा कंटाळा आला होता. तसेच सामाजिक चित्रपट आपण आता करायचे नाहीत, असं माझं आता ठरलेलं आहे. मला असं वाटतं की, सामाजिक चित्रपट करण्यात काही वाईट नाही. पण मराठी चित्रपट म्हणजे सामाजिक चित्रपट असं जे समीकरण झालं आहे, ते मला अजिबात पसंत नाही. हे समीकरण मला मोडायचं होतं. माझ्या मते मराठी सिनेमा म्हणजे सकस सिनेमा. मराठी सिनेमा म्हणजे ज्यात उत्तमोत्तम विषय हाताळले जातात, उत्तमोत्तम कलाकारांचा अभिनय पाहायला मिळण्याची गॅरेण्टी आहे. सामाजिक सिनेमा काही घडवत नाही, फार तर तो त्यात काम करणार्‍या कलाकारांना, निर्माता-दिग्दर्शकांना पुरस्कार मिळवून देतात. प्रेक्षक घडविण्यासाठी अशा सिनेमांचं काही योगदान नसतं, असं मला प्रकर्षानं जाणवतं. मुळात सिनेमा हा मनोरंजनासाठीच बनवला पाहिजे. याच माध्यमातून प्रेक्षक तुम्हाला काय म्हणायचंय हे जाणून घेऊन त्या चित्रपटाला स्वीकारतात. उगाच काहीतरी आव आणून प्रेक्षकांवर एखादा विषय थोपवायला गेलात तर प्रेक्षक तो कधीच स्वीकारीत नाहीत.

-सुबोध भावे

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया