यशस्वी दिग्दर्शक – कमलाकर तोरणे
——
भालजी पेंढारकरांच्या शिष्यपरंपरेतले अतिशय यशस्वी दिग्दर्शक म्हणजे कमलाकर तोरणे! तोरणे कुटुंब मूळचे वेंगुर्ल्याचे. कमलाकरचा जन्म बेळगाव येथे १२ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. कमलाकर लहान असतानाच त्याचे वडील वारले. आईने मग हॉस्पिटलमध्ये नोकरी करून त्याला वाढवले. त्याचे शालेय शिक्षण बेळगावातच झाले. पुढे कमलाकरच्या आईने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी करून त्याला वाढवले. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झाले.
कमलाकरचा डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी त्याने शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. याच सुमारास कसे कोण जाणे पण त्याला चित्रपटाविषयी कुतूहल आणि आकर्षण निर्माण झाल्यामुळे तो बर्याच वेळा भालजींच्या स्टुडिओत जात असे. भालजी त्या सुमारास म्हणजे १९४४ साली त्यांच्या ‘महारथी कर्ण’ या चित्रपटासाठी कलावंतांची जुळवाजुळव करत होते. पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, शाहू मोडक, के. एन. सिंग, विनय काळे अशा दिग्गज कलाकारांबरोबर भालजींनी ‘बाल कर्णा’च्या भूमिकेसाठी स्टुडिओत नेहमी येणार्या देखण्या कमलाकरची निवड केली. ती कमलाकरच्या रुपेरी जीवनाची सुरुवात होती. कमलाकरचा चित्रपटसृष्टीत असा प्रवेश झाला आणि त्याने मग डॉक्टर व्हायचा विचार सोडून दिला. तिकडे न जाता फक्त शास्त्रशाखेची बीएस्सी पदवी पदरात पाडून घेतली. भालजींकडे काम करण्यात कमलाकरला आता रस वाटू लागला.
1948च्या म. गांधी हत्येनंतरच्या जळितात भालजींच्या स्टुडिओत असलेली ‘मीठभाकर’ या त्यांच्या चित्रपटाची प्रिंटही जळून खाक झाली. भालजींना हा चित्रपट पुन्हा काढायचा होता. यावेळी तल्लख स्मरणशक्ती असलेल्या कमलाकरने जुन्या ‘मीठभाकर’ची पटकथा व संवाद जसेच्या तसे लिहून काढण्याचा चमत्कार केला. त्या आधारावर भालजींनी पुन्हा या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून कमलाकर भालजींच्या खास मर्जीतले झाले. भालजींच्या काही चित्रपटांच्या वेळी ते त्यांचे सहाय्यक होते. भालजींकडे त्यांना खूप शिकायला मिळाले.
१९५१ साली संगीतकार सुधीर फडके यांनी निर्माण केलेल्या ‘विठ्ठल रखुमाई’ या चित्रपटातही कमलाकर तोरण्यांनी छोटी भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक यशवंत पेटकर यांच्याकडेही तोरणेंनी सहाय्यक म्हणून काम केले. यशवंत पेटकरांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झालं गेलं विसरून जा’ (१९५७) आणि ‘कीचकवध’ (१९५९) या दोन्ही चित्रपटात तोरण्यांच्या मदतीचा मोठा वाटा होता.
१९६२ सालच्या ‘भिंतीला कान असतात’ या चित्रपटापासून प्रिया टोंगे यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘हिरवा चुडा’ (१९६६) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. कदाचित हा चित्रपट दिग्दर्शनासाठी पहिल्यांदा ‘साईन’ होईन उशीरा आला असावा. कमलाकर तोरण्यांचा चांगला दिग्दर्शक म्हणून बोलबाला होऊ लागला आणि त्यांच्या डोक्यात ‘वुई आर नो एंजल्स’ या पन्नासच्या दशकात गाजलेल्या इंग्रजी चित्रपटातच्या कथेवर मराठी चित्रपट काढायची कल्पना घोळू लागली. या इंग्रजी चित्रपटाच्या कथेवर बेतलेल्या ‘अमृत झाले जहराचे’ या विद्याधर गोखल्यांनी लिहिलेल्या नाटकाची कोणीही दखल घेतली नव्हती. तसंच हिंदी चित्रपटवाल्यांनीही याच कथेवर मीनाकुमारी, बलराज सहानी, मेहमूद, अभि भट्टाचार्य अशा दिग्गज कलाकारांना घेऊन ‘पिंजरे के पंछी’ नावाचा चित्रपट काढला होता. गंमत म्हणजे या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक होते प्रसिद्ध संगीतकार सलील चौधरी. इतकं सारं असूनही हा हिंदी चित्रपट साफ कोसळला होता.
कमलाकर तोरणे ‘वुई आर नो एंजल्स’च्या इतके प्रेमात पडले होते की त्यांनी निर्माता बनून ‘प्रेमचित्र प्रॉडक्शन’ बॅनरखाली या कथेवर ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले खरे. पण या यशाची वाट फार खडतर होती. 1963 साली सुरू झालेला हा चित्रपट फार रखडला. पुन्हा काही वर्षांनी तो सुरू झाला. त्यावेळी चित्रपटासाठी शिवलेली ड्रेपरी (कपडे) बंद कपाटात पडून राहिल्यामुळे पार विटून गेली होती. आता पुन्हा नव्याने चित्रण करायचं म्हटल्यावर ड्रेपरी पुन्हा शिवणं आवश्यक होतं. पण तेवढा खर्च करण्याची आर्थिक ताकद तोरणे यांच्यात नव्हती. मग तेच विटलेले जुने कपडे अंगावर चढवून सगळ्याच कलाकारांनी तोरणे यांना खूप सहकार्य केलं. या चित्रपटाने कालांतरानं दिगंत यश मिळवलं. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात त्याला नऊ पुरस्कार मिळाले होते.
दिग्दर्शक म्हणून कमलाकर तोरण्यांचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट सुरू करण्यापूर्वी संपूर्ण चित्रपटाचं त्यांचं ‘बाऊंड स्क्रिप्ट’ तयार असायचं. ते स्क्रीप्ट सार्या कलाकारांना देत. त्यांचं स्क्रीप्ट गोळीबंद असे. त्यात एका शब्दाचाही बदल ते करीत नसत. तोरण्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रपटातली सगळी स्टारकास्ट ही नाटकातली असे. रामचंद्र वर्दे, शांता जोग, गणेश सोळंकी, मधुकर तोरडमल, विक्रम गोखले, आत्माराम भेंडे, माई भिडे, दत्ता भट, आशालता बाबगावकर, आशा काळे, अरुण सरनाईक, नयनतारा, पद्मा चव्हाण… ही सारी मंडळी नाटकातलीच होती. नाटकातल्या कलाकारांचा सर्वात उत्तम उपयोग तोरण्यांनीच करून घेतला. जगन्नाथ कांदळगावकर आणि मोहनदास सुखटणकर हे त्यांचे मित्र तर त्यांच्या प्रत्येक चित्रपटात असत.
रिमा लागू या अभिनेत्रीला ‘नणंद भावजय’ या चित्रपटातून त्यांनीच नायिका केले. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नसती आफत’, ‘अरे संसार संसार’ आणि ‘आधी जाते अक्कल’ या मालिकांमधून त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेला ब्रेक दिला. रुही, महेश कोठारे, रवींद्र ंमहाजनी, लक्ष्मीछाया यांना त्यांनी पुुढे आणले.
कमलाकर तोरणे यांच्या बहुतेक चित्रपटांचे चित्रीकरण मुंबईतील रणजित स्टुडिओत किंवा फेमस स्टुडिओत होत असे. ‘प्रेमचित्र’, ‘भरत चित्र’ आणि ‘अविनाश पिक्चर्स’ अशा तीन चित्रसंस्थांतर्फे त्यांनी सुमारे आठ चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपटात त्यांची ठरलेली टीम असे. छायाचित्रकार- रत्नाकर लाड, संकलक एन एस वैद्य, भानुदास दिवकर, कलादिग्दर्शक के. द. महाजनी (दादा) तर सहायक दिग्दर्शक म्हणून मुरलीधर कापडी, रमेश साळगावकर, नागेश दरक व शेखर सोमण ही मंडळी होती. तोरण्यांच्या बहुतेक चित्रपटांचे लेखक दिनकर द. पाटील व मधुसूदन कालेलकर होते. तोरणे यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. कॅमेरामन रत्नाकर लाड, एम. एस. साळवी (‘ज्योतिबाचा नवस’चे निर्माते) अभिनेता सूर्यकांत व संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील आणि लेखक मधुसूदन कालेलकर यांच्याशी त्यांचं चांगलं जमे.
कमलाकर तोरणेंना वाचनाचा छंद होता. त्यांचं प्रचंड वाचन होतं. वाचनामुळे आलेली साहित्याची जाण बर्याचवेळा त्यांच्या कल्पक दिग्दर्शनात दिसून येई. संगीताचाही त्यांना कान होता. फावल्या वेळात त्यांना संगीत ऐकायला खूप आवडे. ‘नेताजी पालकर’ हा एकमेव ऐतिहासिक चित्रपट सोडला तर बाकीचे त्यांचे सर्व चित्रपट कौटुंबिक वा सामाजिक विषयांवरचे होते. त्यांच्या चित्रपटात दारिद्य्र कुठेही दिसत नसे. अगदी विटकेकपडे अंगावर चढवलेल्या कलाकारांच्या ‘आम्ही जातो आमुच्या गावा’मध्ये सुद्धा कुठेही गरीबी दिसत नाही. त्यांचा चित्रपट पाहताना मन प्रसन्न होईल इतका ‘फ्रेशनेस’ त्यात जाणवतो. कमलाकर तोरणे हे मराठीतले एकमेव असे दिग्दर्शक आहेत की ज्यांचा एकही चित्रपट डब्यात गेला नाही. कमलाकर तोरणे यांना मराठीतले ‘मनमोहन देसाई’ म्हणतात.
१९६२ ते १९८८ या २७ वर्षात एकूण २८ चित्रपट दिग्दर्शिंत करणार्या कमलाकर तोरणे यांना ‘आम्ही जातो आमुच्या गावा’(१९६८), ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ (१९७५), ‘भैरू पैलवानकी जय’ (१९७८) आणि ‘थोरली जाऊ’ (१९८३) या चित्रपटांसाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पुरस्कार मिळाले. 1963 सालच्या त्यांच्या ‘गरिबाघरची लेक’ला राष्ट्रीय पुरस्कारातील उत्कृष्ट मराठी चित्रपटांचं ‘सर्टिफिकेट ऑफ मेरीट’ मिळालं होतं. १९८८ सालचा ‘आई पाहिजे’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
कमलाकर तोरणे यांच्या बरोबरीने मराठीत काम करणारे दिग्दर्शक मधुकर (बाबा) पाठक यांनी हिंदीत पद्मनाभ (बांदोडकर) यांचे सहाय्यक म्हणून काम केले तर दुसरे दिग्दर्शक राजदत्त यांनीही हिंदीत के. बालचंदर यांच्या हाताखाली प्रमुख सहाय्यक म्हणून काम केले. तोरणे यांनी हिंदीत कधीच काम केले नाही. ‘कॉसमॉस फिल्म्स’ या आपल्या वितरण संस्थेतर्फे मराठी चित्रपट धंद्याचे गणित व्यवस्थित सांभाळणार्या तोरणेंना हिंदीत जाणं फारसं पसंत नसावं. मात्र दूरदर्शनच्या ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकेतील रामाची भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या अरुण गोविल या कलाकाराला नायक करून एक हिंदी चित्रपट ते करणार होते. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे चित्रपटाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं पूर्ण स्क्रीप्ट तयार होतं. पण दुर्दैवाने हा चित्रपट सुरू करण्याच्या काही दिवस आधी अचानक झोपेतून उठताना त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे ते बेशुद्ध झाले. उपचारासाठी त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. पण त्यातून ते बरे झाले नाहीत. ९ एप्रिल १९९० रोजी त्यांचे निधन झाले.
मराठी चित्रपटाच्या पडत्या काळातील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून कमलाकर तोरणे यांचे नाव मराठी चित्रपट रसिकांच्या कायम स्मरणात राहील !
– मधू पोतदार
——-
कमलाकर तोरणे यांची चित्रपट संपदा
१) भिंतीला कान असतात, २) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, ३) गरिबाघरची लेक, ४) वैभव, ५) हिरवा चुडा, ६) आम्ही जातो आमुच्या गावा, ७) लाखात अशी देखणी, ८) अनोळखी, ९) जोतिबाचा नवस, १०) आराम हराम आहे, ११) बाळा गाऊ कशी अंगाई, १२) भैरू पैलवान की जय, १३) नेताजी पालकर, १४) जावयाची जात, १५) पैजेचा विडा, १६) छत्तीस नखरेवाली, १७) दरोडेखोर, १८) कैवारी, १९) नणंद भावजय, २०) चांदणे शिंपीत जा, २१) नवरे सगळे गाढव, २२) देवता, २३) थोरली जाऊ, २४) चोराच्या मनात चांदणं, २५) माहेरची माणसं, २६) ढगाला लागली कळ, २७) आम्ही दोघं राजा राणी, २८) आई पाहिजे
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया