विक्रमनं ‘स्माइल प्लीज’ चित्रपट ‘दिल से’ बनवलाय
——
‘स्माइल प्लीज’च्या म्युझिक लॉंचला येण्यापूर्वी मी माझी पत्नी गौरीला सांगत होतो की विक्रम फडणवीसवर माझं एवढं प्रेम का आहे हे मलाही माहीत नाही. खरं तर त्याच्याबरोबर जास्त वेळही देता येत नाही. गेल्या २० वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. सलमान आणि मी त्याचे खास मित्र आहोत. गेल्या दोन दशकांमध्ये फॅशन डिझायनर म्हणून विक्रमनं खूप मोठं नाव कमावलं आहे. जो कोणी फिल्ममेकर, दिग्दर्शक बनतो, तो माझा प्रिय होऊन जातो. त्यानं दोन वर्षांपूर्वी ‘हृदयांतर’ बनवली तेव्हा मला खूपच आनंद झाला होता. मी त्याच्या चित्रपटाच्या मुहूर्ताला हजर राहू शकलो नव्हतो. परंतु आज मी येथे उपस्थित आहे. त्यानं स्वतःमध्ये नि स्वतःच्या चित्रपटामध्ये जी कल्पकता ओतली आहे, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्याकडून आणखी काही खास फिल्म्स पाहायला मिळतील याची मला खात्री आहे.
विक्रमकडून मी या चित्रपटाची कथा जाणून घेतलीय. ती खूप छान आहे. काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न विक्रमनं या चित्रपटामधून केला आहे. प्रेम, नातेसंबंध, परस्परांना दिलेली साथ याचं अनोखं मिश्रण या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या आयुष्यातील चढ-उतारांचे दर्शन आपल्याला या चित्रपटामधून दिसेल. कितीही संकटं येऊ देत माझ्या मते कोणताही फिल्ममेकर जेव्हा ‘दिल से’ चित्रपट बनवतो तेव्हा त्याच्यापेक्षा दुसरी सरस कलाकृती असू शकत नाही. त्यामुळेच हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचावा, अशीच मी इच्छा व्यक्त करतो.
– शाहरुख खान
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया