फत्तेशिकस्त सर्व आघाड्यांवर जमून आलाय – चिन्मय मांडलेकर
——
‘फर्जंद’ करत असतानाच दिग्पाल लांजेकरचं जे व्हिजन होतं, ते आता पूर्ण होतंय असं मला वाटतंय. कारण ‘फर्जंद’च्या आधी दिग्पालला कोणी दिग्दर्शक म्हणून ओळखत नव्हतं. त्याला शिवकालाविषयी एक चित्रपट मालिकाच करायची होती. फक्त एक चित्रपट करून तो थांबणार नव्हता. ‘फर्जंद’च्या एक पाऊल पुढे जाऊन त्यानं ‘फत्तेशिकस्त’ दिग्दर्शित केला आहे. त्याचा मला अधिक आनंद आहे. कोणत्याही दिग्दर्शकावर त्याचा दुसरा चित्रपट करीत असताना अधिक दडपण असतं. कारण पहिल्या चित्रपटावेळी त्याच्यावर काहीच दडपण नसतं. पण हे चॅलेंज स्वीकारून दिग्पालनं एक पाऊल पुढं टाकलं. ‘फर्जंद’चंही स्क्रीप्ट मी ऐकलं होतं. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’चंही मी ऐकलं. मला यावेळी लेखक म्हणून दिग्पालनं खूप अधिक प्रगती केल्याचं जाणवलं. प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळीही मला एक लेखक, दिग्दर्शक नि अभिनेता म्हणून खूप जास्त प्रगती दिसली. ‘फत्तेशिकस्त’ दिग्पालनं जो कागदावर लिहिलाय त्यातला जवळजवळ ९० टक्के भाग मोठ्या पडद्यावर दाखविण्यात त्याला यश आलंय. त्याला जी लोकेशन्स हवी होती ती त्याला मिळाली. नव्हे त्यानं ती मिळवली. त्याला हवी ती भव्यता दाखविण्यातही यश आलंय. हा कोणत्या स्टुडिओत जाऊन शूट केलेला चित्रपट नाही. प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर जाऊन त्यानं हा चित्रपट चित्रीत केलाय. स्टुडिओमध्ये चित्रीकरण असलं की तुमच्यावर बंधनं येतात. त्याशिवाय त्या चित्रीकरणामध्ये कृत्रिमतादेखील येते. ती टाळण्यात आम्ही यशस्वी झालोय. राजगडावर चित्रीत झालेला हा पहिला चित्रपट आहे. हा किल्ला चढायला अत्यंत दुर्गम मानला जातो. तिथं आम्ही जाऊन शूटिंगदेखील केलं. विशाळगडच्या खोऱ्यात आम्ही चित्रीकरण केलंय. हा सगळा दृश्यक्रम अगदी खरा झालाय. त्यासाठी मी दिग्पालबरोबरच आमच्या निर्मात्यांचंही अभिनंदन करेन. स्वप्नं सगळेच बघतात. पण ती पुरी करण्यासाठी त्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरजेचं असतं. ते आमच्या निर्मात्यांनी उभं केल्यामुळे दिग्पाल त्याला हवं ते पडद्यावर दाखवू शकला.
– चिन्मय मांडलेकर
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया