अतिथी कट्टा

दिनांक : ०१-०६-२०२१

‘प्रभात’ चित्रांच्या आठवणी…



१ जून हा प्रभात फिल्म कंपनीचा वर्धापनदिन. त्यानिमित्तानं पंडित दामले यांनी लिहिलेल्या ‘प्रभात समयो पातला’ या पुस्तकामधील काही भाग आम्ही संपादित स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत.

——

मी पंडित दामले, ‘संत तुकाराम’ या चित्रपटात मी म्हाद्याची भूमिका केली होती. माझा सहजसुंदर अभिनय रसिकांना खूपच आवडला होता. दामले-फत्तेलाल दिग्दर्शित ‘संत तुकाराम’ने देश-परदेशात देदीप्यमान यश मिळवले. त्यानंतर ‘कुंकू’ या चित्रपटाचे प्रतिभावान दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याबरोबर एक छोटीशी पण महत्त्वाची भूमिका करण्याचे भाग्य मला लाभले.

निरुताईचे मामा जबरदस्तीने तिचे एका श्रीमंत म्हाताऱ्याशी लग्न लावतात. हताश निरूताई आपल्या दिवंगत माता-पित्यांच्या फोटोसमोर रडत असते. मी प्रवेश करतो. ‘अगं निरूताई, तू रडतेस का? तुझा नवरा खूप श्रीमंत आहे. त्यांनी आपल्या मामांना एवढे एवढे रुपये दिले आहेत. खोटे नाही सांगत मी. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तरण्यास दाखविले आणि म्हाताऱ्याशी लग्न केले. कशी फजिती केली?’ या वेळी निरूताईला कळतं की, आपण फसविले गेलो आहोत व मामाने आपल्याला विकले आहे. आता तिच्या अंगात सूडाची वीज संचारते.

माझी ही भूमिका चित्रपटात टर्निंग पॉइंट होती आणि ही भूमिका मीच करावी यासाठी शांतारामबापू आग्रही होते. यापूर्वी मामा व मध्यस्थ खोलीत येतात व कडी लावतात. काम फत्ते झाले. मामा रुपये घेऊन मोजू लागतात. लोभी मामाचे हात थरथरू लागतात. एवढ्यात एक रुपयाचे नाणे हातातून निसटते व घरंगळते. कोपऱ्यात बसून लाडू खात खात मी हा सर्व व्यवहार पाहत असतो. दिग्दर्शकाकडे मुलगा कोपऱ्यात बसला आहे हे दाखविण्यासाठी दुसरे अनेक पर्याय होते, परंतु शांतारामबापूंच्या प्रगल्भ बुद्धीतून उतरलेला हा पर्याय म्हणजे नाणे घरंगळत माझेपर्यंत येते. म्हणजेच व्ही. शांताराम टच !

माझ्या एकाही चित्रपटाने मला अजून कलात्मक आनंद दिलेला नाही.’ हे शांतारामबापूंचे उद्गार मी ऐकले आहेत. त्यात अतिनम्रता असून खऱ्या अर्थाने कलाकाराच्या मनोवृत्तीचे दर्शन घडते. खरं म्हणजे जातिवंत कलाकाराला स्वनिर्मित कलेविषयी पूर्ण समाधान कधीच वाटत नसते. कारण कलेच्या पूर्णत्वाला मर्यादा अशी नसतेच. स्वनिर्मित कलेविषयी समाधान पावून कलेचा आनंद मिळविणे हे रेल्वेच्या दोन रुळांप्रमाणे कधी न एकत्र येऊन मिळण्यासारखे असते. हे रूळ दूर कुठेतरी एकमेकांना भिडल्यासारखे वाटतात, पण प्रत्यक्षात ते कधीच भिडत नाहीत. कलात्मक आनंदाच्या मृगजळामागे लागूनच शांतारामबापूंनी अजरामर कलाकृती निर्माण केल्या, पण या कलाकृतींचा खरा आनंद लुटला रसिकांनीच. रसिक नशीबवान ठरले. कलानिर्मितीचा कलाकार मात्र असमाधानी राहिला.

माझे वडीलबंधू ‘दादा’ दामले यांना ‘प्रभात’ चित्रांचा अमूल्य खजिना मद्रासला कायमचा गेल्याचे दुःख एकसारखे सलत होते. आपली ती चित्ररत्ने आपल्याला परत मिळावीत याचा त्यांना ध्यास लागला होता. पण अनंत अडचणी होत्या… अखेर दादांनी प्रभातचा तो चित्रखजिना परत महाराष्ट्रात आणण्यात यश मिळविले. ‘प्रभात’चे शांतारामबापू दिग्दर्शित चित्रपट किती प्रभावी असतात याचा प्रत्यय आज केव्हाही कुठेही प्रभात-सप्ताह असला की पाहायला मिळतो. बघता बघता सर्वच चित्रपटांची तिकिटे संपतात.

याबाबतची एक आठवण सांगण्यासारखी आहे. पुण्यात एकदा प्रभात सप्ताह होता. सुरुवात शांतारामबापूंच्या ‘कुंकू’पासून होती. ‘प्रभात’ चित्रगृहातील ऑफिसात मी, दादा दामले, शरद पै गप्पा मारत बसलो होतो. सहाचा खेळ संपला. एवढ्यात एक धिप्पाड, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे वृद्ध गृहस्थ ऑफिसमध्ये दाखल झाले. त्यांच्याबरोबर १५-१६ वर्षांची मॉड वेशातली मुलगी होती. त्यांचे आम्ही स्वागत केले. ते गृहस्थ सांगू

लागले, ‘मी पूर्वी आर्मीत मेजर होतो. आता सेवानिवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालोय. शांतारामबापूंच्या प्रभात चित्रांचा मी चाहता आहे. तरुणपणी अनेक वेळा मी प्रभातचा प्रत्येक चित्रपट पहात असे. आता प्रभातचा सप्ताह इथे आहे, हे कळताच मी धावतच आलो. माझ्यासारख्यांसाठी हा अमृतसिद्धी योगच म्हणा- ही माझी नात, इथे कॉन्व्हेन्टमध्ये असते. तिला प्रभातचे चित्रपट पाहायला आग्रह केला पण तिने असे ‘जंक’ जुनेपुराणे चित्रपट पाहायला साफ नकारच दिला ! मी तिला समजावून सांगितले, निदान एक तरी चित्रपट तू पहाच. ज्या क्षणी तुला कंटाळा येईल त्या क्षणीच आपण उठून बाहेर पडू. आय प्रॉमिस. तेव्हा कुठे ती आढेवेढे घेत तयार झाली. आज ही नात ‘कुंकू’ पाहण्यात इतकी रंगून गेली की, इंटरव्हललादेखील ती बाहेर पडण्याचे नाव घेईना! शेवटच्या करुण प्रसंगी ती अक्षरशः रडतच होती. चित्रपट संपल्यावर ती सुन्न झाली. प्रभात चित्रपटांना ‘जंक’ म्हटल्याबद्दल तिने माझी माफी मागितली! इतका उत्कृष्ट, प्रभावी चित्रपट प्रथमच पाहायला मिळाल्याचे तिने कबूल करून टाकले! आणि असे चित्रपट आज का पाहायला मिळत नाहीत असे मला विचारले. यावर मी तिला काय उत्तर देणार? कुंकूचे दिग्दर्शक कोण असे तिने उत्सुकतेने विचारले. मी सांगितले- व्ही. शांताराम!

‘व्ही. शांताराम इज रिअली ग्रेट!’ ती उत्स्फूर्तपणे म्हणाली. मला धन्य वाटले. आता माझ्या या नातीला प्रभातचे सर्व चित्रपट पहायचे आहेत. तरी मेहेरबानी करून सबंध सप्ताहाची तिकिटे, द्या हीच विनंती करायला मी इथं आलो आहे. असा आहे शांतारामबापूंच्या चित्रपटांचा प्रभाव!

दामले कुटुंबाविषयी शांतारामबापूंना अत्यंत जिव्हाळा होता. आम्हा दामले कुटुंबाच्या प्रत्येक मंगलप्रसंगी, ते वेळात वेळ काढून आमच्या आनंदात सहभागी व्हायला हजर होत असत. आम्हा भावंडांवर तर त्यांचा फारच लोभ होता. मी व माझा धाकटा भाऊ यशवंत (चीफ इंजिनिअर, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन) मुंबईत राहात असूनदेखील शांतारामबापूंची क्वचित भेट होई. दादा दामलेंची कन्या अलका हिच्या लग्नास शांतारामबापू आले होते. त्या वेळी ते यशवंतला म्हणाले, ‘काय रे यशवंता, मला भेटत नाहीस तो? तू म्युनसिपालिटीत चीफ इंजिनिअर आहेस ना ? थांब, मी स्टुडिओत कचरा भरून ठेवतो नि तक्रार करतो. म्हणजे येशील धावत माझ्याकडे!’ मग माझ्याकडे वळून शांतारामबापू म्हणाले, ‘आणि पंडित, तूसुद्धा तसलाच. तू तर काय एअरक्राफ्ट इंजिनिअर! थांब, आता मी एक हेलिकॉप्टर घेतो आणि मोडून ठेवतो. मग बोलावतो तुला दुरुस्त करायला !’

थोड्या वेळासाठी आलेले शांतारामबापू अशा जिव्हाळ्याच्या गप्पा मारताना खूप वेळ रंगून जात.

– पंडित दामले

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया