‘सूर्या’द्वारे नव्या अॅक्शन हिरोचा जन्म
हसनैन हैद्राबादवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सूर्या’ चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीच्या पटलावर एका नव्या अॅक्शन हिरोचा उदय होणार आहे. पिळदार शरीरयष्टी, डौलदार चाल, वाघासारखी नजर, चित्यासारखा वेग लाभलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेला प्रसाद मंगेश हा उदयोन्मुख स्टार ‘सूर्या’मध्ये शीर्षक भूमिकेत आहे. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना कुटुंब आणि प्रेमावर घाला घालणार्या खलनायकाला धोबीपछाड देणारा डॅशिंग ’सूर्या’ला रुपेरी पडद्यावर पहाणं ही प्रेक्षकांसाठी जणू एक मेजवानीच ठरणार आहे. याबाबत प्रसाद मंगेश म्हणाला, “ ‘सूर्या’च्या रूपात नायक बनून प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंद आहे. पदार्पणातच अॅक्शनपॅक्ड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यानं मराठी सिनेसृष्टीत दमदार एंट्री घेत आहे. हीच खर्या अर्थानं आनंद आणि समाधानाची गोष्ट आहे. लव्ह, अॅक्शन, इमोशन, ड्रामा, समधूर गीत-संगीत, स्मरणीय संवाद, उत्कंठावर्धक कथानक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे केलेलं सादरीकरण यामुळे ’सूर्या’च्या रूपात मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेजच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं स्वप्न माझ्या वडिलांनी पाहिलं होतं. मराठी चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा बनावा असं त्यांना वाटत होतं. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. परंतु दुर्दैवानं ते आज आपल्यासोबत नाहीत. त्यामुळे या चित्रपटाचे खरे शिल्पकार माझे वडील मंगेश ठाणगे आहेत. कोरोना सुरू व्हायच्या आधी वडिलांचं आकस्मिक निधन झालं. वडील गेले तेव्हा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं. फक्त पोस्टप्रॉडक्शन बाकी होतं. मग कोरोना आला. लॉकडाऊन झालं. मग चित्रपटसृष्टीमधील सगळी गणितच बदलली. त्यामुळे माझंही मनोबल खचायला लागलं होतं. प्रस्तुतकर्ते राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल यांनी मला या काळात आधार दिला. ते पप्पांचे जुने मित्र. त्यांनी साथ दिल्यामुळे हा चित्रपट आता प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटामधील सगळी अॅक्शन दृश्यं मी स्वतः केली आहेत. डमी कोणी वापरलेला नाही. कौशल मोझेस, अब्बास अली मोघल यांच्याकडून मी ट्रेनिंग घेतलंय. अॅक्शनची मला पहिल्यापासून आवड आहे. जिममध्ये मी भरपूर सराव केलाय. हिंदीमधले नावाजलेले कलाकार यात आहे. कोणतीही तडजोड आम्ही केलेली नाही.”
मराठीतील आपल्या अनुभवाबद्दल अखिलेंद्र मिश्रा म्हणाले, “हिंदी चित्रपटांमधील त्याच त्याच भूमिका साकारून मी आता कंटाळलो होतो. त्यामुळे चांगल्या मराठी चित्रपटाची मी वाट पाहात होतो. ती प्रतीक्षा या चित्रपटानं संपली. अत्यंत देखणा आणि तांत्रिकदृष्ट्या सशक्त असा ‘सूर्या’ हा चित्रपट आहे. त्यात काम करताना मला खूपच मजा आली. भविष्यातही मला मराठी चित्रपट करायला आवडतील. ‘संत तुकाराम’ हा व्हेनिस आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी झालेला पहिला मराठी सिनेमा. मराठी चित्रपटांना खूप चांगली परंपरा आहे. म्हणूनच चांगले मराठी चित्रपट माझ्या वाट्याला आले तर ही भाषा पूर्ण शिकण्याची माझी इच्छा तसेच तयारी आहे.”
‘टारझन’फेम अभिनेते हेमंत बिरजे यांनी या चित्रपटात एक दमदार खलनायक साकारला आहे. चांगली भूमिका, उत्तम निर्मितीमूल्ये असल्यामुळेच हा चित्रपट स्वीकारला असल्याचं बिरजे यांनी सांगितलं. एखाद्या बिगबजेट हिंदी चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट बनविण्यात आला असून उत्तम दर्जेदार मनोरंजन करण्यात तो यशस्वी होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. अभिनेत्री रुचिता जाधव म्हणाली की, यात मी काजल नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ते संपूर्ण चित्रपटात सूर्याला साथ देते. त्याची ती प्रेयसी आहे. खूप वर्षांनी मी एवढा ग्लॅमराइज्ड रोल केला आहे. हा एक साधासुधा मराठी चित्रपट नाहीय. या चित्रपटासाठी निवडलेली स्टारकास्टही अगदी ‘चुन चुन के’ आहे. अखिलेश मिश्रासारख्या मोठ्या कलाकारांनी कधीही आपण बॉलिवुडमधले आहोत असा फिल येऊ दिला नाही. हेमंत बिरजेंसारखा सहा फूट उंचीचा कलाकार सेटवर चालत आला की खूपच भारी वाटायचं. या सगळ्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी शूटिंगदरम्यान खूपच धमाल केली.
– सूर्या अॅक्शन हिरो
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया