आक्रंदनद्वारे विदारक दुःखाला वाचा फोडलीय – शशिकांत देशपांडे
——
या चित्रपटाच्या कथा-पटकथा-संवादामध्ये माझा सहभाग आहे. संवाद लिहिलेत ते मिलिंद इनामदार यांनी. हे कथानक सुचण्यामागे काही घटना कारणीभूत होत्या. काही वर्षांपूर्वी दिल्लीत काही समाजाच्या लोकांवर अत्याचार झाले. तेव्हा मला असं वाटलं की अत्याचारपीडित लोकांची जात महत्त्वाची आहे का? त्यांना न्याय मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दिल्लीतल्या मुलीवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा सगळे लोक मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. लोकांमध्ये या घृणास्पद घटनेविरुद्ध आक्रोश होता. झालेली ही घटना दुर्दैवीच होती. परंतु, खैरलांजीसारखी घटना घडली तेव्हा समाजातून त्याचा निषेध करणारे पडसाद का उमटले नाहीत? त्यावेळी आपण सगळे लोक रस्त्यावर का नाही उतरलो? तेव्हा आमची मानसिकता नेमकी काय होती? कोणावरही अत्याचार होणं हे वाईटच आहे. परंतु, अत्याचार कोणावर झाला आहे, हे पाहून आपण रिअक्ट होतो. ती पद्धत चुकीची आहे, असं मला वाटतं. म्हणून मी हा चित्रपट लिहिला नि दिग्दर्शितही केला.
या चित्रपटासाठी मला उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे, विक्रम गोखले असे नामवंत कलाकार मिळाले आहेत. या सर्वांबरोबर माझा काम करण्याचा अनुभव छान होता. गेल्या काही वर्षांमध्ये मी जवळपास ७० ते ८० टीव्ही मालिका केल्या आहेत. मराठीमधील बहुतेक सर्व कलाकार मला जवळून ओळखतात. अर्थात उपेंद्र लिमये आणि शरद पोंक्षे यांच्याबरोबर मी या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच काम करतोय. अर्थात त्यांनी माझ्या मालिका पाहिल्या असल्यामुळे माझं काम त्यांना ठाऊक होतं. या दोघांनी मला या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान खूपच सहकार्य केलं. या चित्रपटाचा विषय खूप महत्त्वाचा नि चांगला होता. तो कोणीतरी पुढं येऊन मांडणं गरजेचं होतं. तो आम्ही मांडला नि हे सगळे नामवंत कलाकार आमच्याबरोबर काम करण्यास तयार झाले.
या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विशेष तयारी केली आहे. या चित्रपटाचा विषय़ सामाजिक असल्यामुळे आम्ही सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणावर मदत घेतली आहे. फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमांचा चांगला उपयोग केला आहे. अनेक व्हॉट्सअप ग्रुप्सवरून आम्ही या चित्रपटाची प्रसिद्धी केली आहे. त्यामुळे लोकांपर्यंत तो नक्कीच पोचला आहे. आता आमचे प्रयत्न पाहण्यासाठी त्यांनी चित्रपटगृहात यायला हवं, असं मी आवाहन करेन.
– शशिकांत देशपांडे
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया