अतिथी कट्टा

दिनांक : ०१-११-२०२०

संगीतयोगीविख्यात संगीतकार यशवंत देव यांचा जन्मदिन. त्यानिमित्तानं ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ या अशोक चिटणीस लिखित आणि नवचैतन्य प्रकाशन प्रकाशित पुस्तकामधील प्रा. प्रवीण दवणे यांची प्रस्तावना आम्ही प्रकाशित करीत आहोत.

——

गेली सहा दशके ज्यांच्या सुरांनी आणि शब्दांनी अनेक पिढ्या मंतरल्या अशा संगीतयोगी यशवंत देव यांचं आठवणींच्या सोबतीनं उलगडत जाणारं प्रस्तुत चरित्र वाचणं हा एखादं उत्कट भावगीत अनुभवत असल्याचा आनंद आहे. हा आनंद अवघ्या समाजाला प्रवाही-सुसंवादी शैलीनं देणाऱ्या प्राचार्य अशोक चिटणीस यांनी परिश्रमानं, रसिकतेनं आणि जिज्ञासेनं हे चरित्र साकार केल्याचा प्रत्यय प्रत्येक प्रकरणातून वाचकाला येत राहतो.

एका सात्त्विक, सुशील कुटुंबातून आलेल्या यशवंतरावांनी ऋणाईत घरातून स्वत:च्या आयुष्याचा सूर कसा शोधला; वैचारिक गुरूची भूमिका व्रतस्थपणे बजावणारे वडील आणि सतारीची तार छेडताछेडता मराठी भावसंगीतात स्वत:चा अढळ ध्रुवतारा कसा निर्माण केला याचा वळणावळणाचा -कधी रम्य तर कधी अंतर्मुख करणारा- वेधक प्रवास चरित्रकार अशोक चिटणीससरांनी वाचकांशी आपुलकीचं नातं जोडीत, एखादी मैफल रंगवत न्यावी असा रंगविला आहे.

प्रस्तुत चरित्रग्रंथ वाचताना महत्त्वाचं वैशिष्ट्य जाणवतं ते हे की, एका व्यक्तीचा जीवनप्रवास न होता, एका समग्र साधनेचा, उमलत्या माणूसपणाचा हा सुवास होतो. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या पहाटेपासून बदलत्या सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेचा येथील उंच-सखल निष्ठांचा आलेख आपण अनुभवतो, म्हणूनच, सहा दशकांच्या साधनेत शतकाला स्पर्श करणारा हा संगीतयोगी संगीताबरोबरच जीवनाचाही प्रेरक गुरू होत जातो.

यशवंत देवांचं आयुष्य इतक्या निरागस तात्त्विक जीवननिष्ठेनं भारलेलं आहे की, त्यात सहजपणे येणारे नियतिनिर्मित गुंतेही सरळ होऊन जातात. प्राचार्य चिटणीससरांनी देवसाहेब हे चिंतन- नवनीत कुशलतेने शब्दबद्ध केले आहे.

व्यावसायिक व सामाजिक आयुष्यातले असंख्य क्षण देवसाहेबांनी स्वत:च्या अथक जिद्दीनं आणि कायम ‘विद्यार्थी’दशा जपण्याच्या अविचल ध्यासाने, एखादी बंदिश तपस्वी गायकाने जगून पेश करावी तसे, सुरेल केले आहेत आणि त्या अभंग आयुष्याचा चरित्ररूपाने एक अम्लान प्राजक्त अशोक चिटणीससरांनी मराठी वाचकाला समर्पित केला आहे.

एका सामान्य घरातला सामान्य मुलगा श्रेष्ठ संगीतकार, कवी, निरूपक, सतारवादक, ध्वनिमुद्रक, तत्त्वचिंतक, संगीतगुरू आणि पुढे ध्यानयोगी आनंद यशवंत कसा होतो, हा सारा विकसित होत जाणारा देव-पट चिटणीससरांनी यशवंत देवांच्या स्मरणसोबतीनं व अनेक संदर्भग्रंथांसह, शिवाय देवसाहेबांच्या सहवासातील टिपूर क्षणांच्या प्रत्ययासह, परिणामकारक शैलीत मांडला आहे.

….चरित्र वाचताना रसज्ञ वाचकांना जाणवेल ह्या शब्दप्रवासातील काही चमकदार रुपेरी शिखरं आपला पाठलाग करीत राहतात. मनोमन ज्यांना गुरू मानून स्वररचनेचा ध्यास घेतला त्या थोर संगीतकार अनिल विश्वासांनी अनपेक्षित घरी येणं आणि समोर त्यांचं छायाचित्र पाहून गहिवरून ह्या आवडत्या ‘एकलव्या’ला वात्सल्याने मिठीत घेणं; दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटात साक्षात् लता मंगेशकर यांच्या गळ्यात आपलं गाणं उतरवणं; आशा भोसले यांच्या उपस्थितीत त्या ‘बुलंद’ स्वराला अर्पण केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या व सत्काराच्या क्षणी आशाताईंनी अचानक, तुमची आवडती गायिका कोण? लता मंगेशकर की आशा भोसले असा प्रश्न विचारणं, आणि त्यावर देवसाहेबांचेही तितक्याच प्रांजळपणे लता मंगेशकर म्हणणं व आशाताईंनी देवांचं सच्चेपण दिलखुलासपणे स्वीकारणं -एक का दोन- असे असंख्य रोमांचकारी व जाता जाता जाणिवेची ज्योत उजळणारे अनेक प्रसंग आपल्याला ‘ह्या’ भल्या माणसाचं देवपण’ सांगत राहतात. विशेष म्हणजे प्राचार्य अशोक चिटणीस यांच्यासारख्या तेवढ्याच उमेदीने, सर्वाना दाद देत जगलेल्या जिंदादिल लेखकाने हे सर्व प्रसंग, तंतोतंत आताच घडताहेत अशा चित्रमयतेने रंगवले आहेत.

पुस्तकातील अनेक वैशिष्ट्यांचा उल्लेख स्थलसंकोचास्तव टाळावा लागत आहे. परंतु संगीतगुरू यशवंत देव यांच्या आयुष्यातील फार महत्त्वाच्या मनरंगाचा उल्लेख मला करावासा वाटतो, कारण हे दोनही मनरंग अशोक चिटणीससरांनी पुरेशा तपशिलांनी- विस्तारांनी व बेटपणे व्यक्त केले आहेत. एक म्हणजे- देवसाहेबांचे संसारीजीवन आणि स्वामी आनंद यशवंत यांचं म्हणजेच यशवंत देवांचं संन्यास जीवन! म्हटलं तर दोन्ही अतिखासगी गोष्टी- पण शब्दसुरांच्या हा सांगाती व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यात हे कप्पे व्यक्तिगत उरत नाहीत आणि देवांसारख्या श्रेष्ठ सर्जनशील कलावंताबाबत तर ते, त्यांच्यातील माणूस व कलावंत जाणून घेण्यास उपयोगी ठरतात.

प्रथम पत्नी कमल आणि त्यांच्या निधनानंतर यशवंत देवांच्या आयुष्यात सहधर्मचारिणी म्हणून आलेल्या नीलम प्रभू अर्थात् करुणा देव यांच्याबद्दलचे सर्व तपशील यशवंत देवांमधील करुणाकर अथांग माणूसपणाचे दर्शन घडवणारे आहेत. कमलताई आणि नीलमताई यांची मैत्री आणि देवसाहेब बबन प्रभू यांच्यातील निखळ मैत्र ह्या पार्श्वभूमीवर देवांच्या आयुष्यातून कमलताईनी व जीवापाड जीव ज्याच्यावर लावला त्या बबन प्रभू नीलमताईंच्या आयुष्यातून कायमचं निघून जाणं आणि मग हे स्वर-गुणी कलावंत पुन्हा प्रपंचात गुंफणं व त्यांचं आतून हुरहुरतं पण आयुष्याचं संगोपन करणारं विलोभनीय सहजीवन त्यातील ऊन-पावसासह, राग- रंगासह एखाद्या चलत् चित्राप्रमाणे उमटलं आहे. लेखक चिटणीससरांनी अगदी कुठलाही आडपडदा न ठेवता ह्या प्रौडपणातील त्यांच्या एकत्र येणं व एकरूप होणं याबद्दलचे लेखन त्यांच्या ओघवत्या भाषेत केले आहे. मुळातून ते वाचताना सर्व पिढ्यांतील वाचकांना कुटुंबव्यवस्थेतील संस्कारमूल्यांचा त्यातील सकारात्मक आग्रहाचा प्रत्यय आल्यावाचून राहणा नाही.

त्याचप्रमाणे ओशोमय यशवंत देव हा एक स्वतंत्र विराट विषय आहे. आयुष्यात आलेल्या सतारवेडातील पहिल्या प्रेमानं ‘बोट’ सोडल्यानंतर नि:शब्दपणे वाहणारी संन्यस्तता, संत-पंत-वसंत कवींच्या काव्य-आस्वाद व गीतनिर्मितीच्या ध्यासातून आलेले चिंतन आणि जन्मभर आपण ‘विद्यार्थी’च असतो ही उक्ती बोलण्यापुरती न ठेवता जगणाऱ्या यशवंत देवांच्या आयुष्याला उत्तरार्धात संन्यासाचा जो अमृतगंध आला; त्यांच्या अंत:संवेदनांतून संन्यासाचे जे ब्रह्मकमळ उमलले तो सर्व प्रवास, एखाद्या केशरी, शांत ज्वालेच्या प्रकाशाप्रमाणे वाचनानंतरही सोबत करतो. यातून देवसाहेबांच्या आयुष्यावर प्रकाश पडतोच; पण साक्षात् ओशो आणि त्यांचा संन्यास हेही समजून घेता येते. आपल्या संन्यासाचा कुणालाही अगदी पत्नीलाही, आग्रह न धरणारे परिपक्व सुजाण पतीपासून ते ओशोंच्या समोर स्वत: देवांनी लिहिलेल्या रुबाया गाताना डोळ्यांतून पाझरणारा श्रावण सांभाळताना ‘तुझं गाणं हे तुझं ‘ध्यान’ आहे! ‘संन्यास’ आहे!’ हा आशीर्वाद प्रत्यक्ष आचार्य ओशोंकडून मिळवणारे स्वामी आनंद यशवंत हे सर्व आंतरिक पैलू हे ह्या आगळ्यावेगळ्या चरित्राचे वैशिष्ट्य आहे.

शतकाला भिडू पाहणारं- नव्वदीच्या वयाचा प्रदीर्घ पट, कला-समाज व कुटुंब यातील असंख्य बदलांचे प्रत्यक्ष साक्षीदार व त्यात प्रत्यक्ष आकंठ बुडालेले समृद्ध आयुष्य संगीताचार्य यशवंत देवांना लाभले. देवांचं प्रस्तुत चरित्र वाचताना म्हणूनच उत्तुंग हिमालयाच्या पर्वतराजीतून चालल्याचा आनंद मला झाला. केवढी मोठी माणसं, कलावंत देवांच्या भोवती जमली; जुळली व त्या सर्वांनी एकमेकांचे व समाजाचे जीवन अंतर्बाह्य श्रीमंत केले- अशा किती माणसांच्या आनंददायी भेटी पानोपानी होतात. काही नावं केवळ उदाहरणासाठी- स्वरतीर्थ सुधीर फडके, अनिल विश्वास, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर, लता मंगेशकर, आशा भोसले, दिनकर द. पाटील, जे. कृष्णमूर्ती, ओशो, ग. दि. माडगूळकर असे किती तरी म्हणूनच ह्या साऱ्यांच्या अर्थपूर्ण नात्यांसह देवसाहेबांच्या आयुष्याचं’ खऱ्या अर्थानं ‘जीवन’ झालं…; संजीवन झालं; हे सारे एकेक तंतू आता विस्मरणकोशात जाऊ पाहणाऱ्या यशवंत देवांकडून अथक प्रयत्नाने काढून घेणे; त्यांच्या वृद्धापकाळातील आधी व्याधींचे वेळापत्रक सांभाळून त्यांना पुनःपुन्हा बोलते करणे व हे सारे एखाद्या रसरशीत कादंबरीप्रमाणे सर्जनशील करण्याचे आव्हान चरित्रकार, साहित्यिक व प्रयोगशील प्राचार्य अशोक चिटणीस यांनी पेलले व ‘व्वा! क्या बात है!’ असे दिलखुलासपणे म्हणावे अशा नेटकेपणाने यशस्वी केले.

प्रस्तुत चरित्रग्रंथ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक दालनातील दस्तऐवज ठरावा असा आहे. कलाप्रेमी शासनकर्त्यांनी खरे तर अशा आयुष्यांचे दृक्-श्राव्य चित्रमुद्रण करायला हवे; पण आपल्याकडे याबाबत घनघोर शांतता असल्यामुळे प्राचार्य अशोक चिटणीस यांच्यासारखे रसिक चरित्रकार जे लेखनकार्य करतात ते बहुमोल व अनमोल ठरते. संगीतावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना प्रस्तुत चरित्रग्रंथ म्हणजे आनंदाचा स्वरोत्सव आहेच; परंतु नव्या साधकांना व कुठल्याही कलाक्षेत्रातील ध्यासवंतांना प्रस्तुत ग्रंथ मार्गदर्शक आणि प्रेरक ठरणार आहे.

शब्दप्रधान गायकीचे मर्म उलगडत परमात्म्यानं दिलेल्या चैतन्याची उत्कटता जगत, आशयघन जगणाऱ्या, आपल्या अनेक भावगीतांनी- कवितांनी ‘मन’ असलेल्या प्रत्येकाचे आयुष्य सुरेल करणाऱ्या यशवंत देवसाहेबांना प्रस्तावनेच्या निमित्ताने हा मानाचा मुजरा!

हा मानाचा मुजरा करू देण्याची संधी मला देणाऱ्या आणि समाजाला नेहमी प्रकाश व प्रेरणादायीच लेखन देणाऱ्या प्राचार्य अशोक चिटणीससरांचे अष्टांगभावे अभिनंदन!

नमस्कार!

– प्रवीण दवणे

(सौजन्य – नवचैतन्य प्रकाशन)

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया