अतिथी कट्टा

दिनांक : २१-०९-२०२२

‘बॉईज 3’मध्ये प्रचंड ‘एनर्जी’ आहे!


‘बॉईज’ चित्रपटाच्या सीरिजनं सर्वांचच भरपूर मनोरंजन केलं आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर ह्या त्रिकूटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज 2’नं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर ‘बॉईज 3’ काय नवीन हंगामा घेऊन येणार, याकडे प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात होते. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेल्या या चित्रपटात आता विदुला चौगुले या नवीन नायिकेची भर पडली आहे. ‘सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि’ अंतर्गत ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’सह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज 3’चं दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केलं असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांमध्येच तब्बल तीन कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाच्या टीमचं हे मनोगत.


——–

‘बॉईज’चा तिसरा भागदेखील विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाबद्दल ते म्हणाले, “पहिला सिनेमा जेव्हा हिट होतो तेव्हा खूप चॅलेंजेस दिग्दर्शकापुढे असतात. त्याच्यावर मोठी जबाबदारी असते. त्याचं मग अर्थातच दडपणही तेवढंच येतं. ‘हिट’ सिनेमापेक्षा चांगला सिनेमा बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. ‘बॉईज’ फ्रँचायझी चालण्यामागे खूप कारणं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सर्वांची एनर्जी. पहिल्या भागाइतकीच एनर्जी आम्ही तिसर्‍या भागातही लावली आहे. तिसर्‍या भागासाठीही आम्ही सर्वांची कार्यशाळा घेतली. कार्यशाळेतच आम्ही खर्‍या अर्थानं सिनेमा जगत असतो. माझी टीम तीच आहे. सगळ्यांकडून काम काढून घेणं हे चॅलेंजिंग होतं. तीन मुख्य व्यक्तिरेखा साकारणारी मुलं ही दिसायला नाठाळ असली तरी खूप अभ्यासू आहेत. तिसर्‍या भागात आम्हाला जॉईन झालेली विदुला खूप लवकर सगळ्यांमध्ये मिक्स झाली. त्यामुळे मला तीन नव्हे तर चार बॉईजबरोबर आपण काम करतोय असं वाटलं. शूटिंग करताना आम्ही खूप धमाल केली. एखादी पिकनिक करतोय असंच आम्हाला वाटलं.”

या चित्रपटाच्या मेकिंगबद्दल सुमंत शिंदे म्हणाला, “ ‘बॉईज 3’ करताना खूप मजा आली. कारण आमची खूप छान मैत्री झाली आहे. लॉकडाऊनच्या काळातही आम्ही एकमेकांना भेटत होतो. या चित्रपटाच्या शूटिंगआधीही आम्ही भेटलो होतो. आमच्या तिघांमधला ‘बाँड’ खूप घट्ट आहे. आमच्या टीममध्ये आता विदुला आली आहे. तिलाही हॅट्स ऑफ. तिला आम्ही ‘कम्फर्टेबल’ करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यात आम्ही यशस्वी झालो. सेटवर आम्ही तिघंही खोड्या करायचो. त्यात आता विदुलाची भर पडली आहे. आमच्या चौघांमध्ये पार्थ जरा जास्त शांत असतो. वास्तवातला पार्थ आणि पडद्यावरचा पार्थ यांच्यात खूप मोठा फरक आहे.”

‘बॉईज 3’मधील आपल्या अनुभवाबद्दल पार्थ भालेराव म्हणाला, “आमच्या तिघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. त्यामागचं मोठं कारण म्हणजे आमचं शूटिंग नसलं तरी आम्ही एकमेकांना भेट राहायचो. विदुलानं या आधी एका मालिकेत काम केलं होतं. पण त्यामधील तिची भूमिका खूप वेगळी होती. त्यामुळे ती या चित्रपटातील भूमिका कशी साकारेल याची आम्हाला उत्सुकता होती. पण तिनं खरोखरीच खूप छान काम केलं आहे. प्रतिकच्या गावात एकदा आम्ही गेलो असताना तिथल्या लोकांनी आमच्याबरोबर बॉईजचे संवाद म्हटले होते. हा प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही.”

‘बॉईज 3’च्या ‘मेकिंग‘बद्दल प्रतीक लाड म्हणाला, “शूट करताना आम्ही खूप धमाल केली. आम्ही तिघे सोबत असताना नेहमीच मजा-मस्ती सुरू असते. ‘बॉईज 1’मधलं सगळं विश्व शाळा आणि हॉस्टेलभोवतालचं होतं. ‘बॉईज 2’ला मग आम्ही कॉलेज आणि हॉस्टेलमधली धमाल करताना दाखवण्यात आली. पण ‘बॉईज 3’ ही ट्रॅव्हल फिल्म आहे. ‘बॉईज 1’च्या वेळी पार्थनं माझ्यावर प्रँक केला होतं. बडिशेपची पुडी म्हणून त्यांनी मला मातीची पुडी खायला लावली होती. अशी भरपूर धमाल आम्ही चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान केली.”

‘बॉईज 3’द्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी विदुला चौगुले म्हणाली, “ ‘बॉईज 3’ या चित्रपटासाठी आपल्याला ‘ऑडिशन’ द्यायची आहे, हे समजल्यानंतर मी उडाले होते. या आधीचे दोन्ही चित्रपट मी पाहिले होते. त्यामुळे अशा हिट चित्रपटाच्या फ्रँचायझीमध्ये आपल्याला मोठी संधी मिळेल, या हेतूनं मी छान ऑडिशन द्यायचं ठरवलं. माझ्या दोन ऑडिशन झाल्या आणि अखेर निवड झाली. त्यामुळे मी तर आनंदी झालेच, पण माझ्या कुटुंबियांना अधिक कौतुक वाटलं. या फ्रँचायझीमधल्या लग्नाळू गाण्याचं नवीन व्हर्जन करताना खूप आनंद मिळाला. खूप एनर्जी होती या गाण्यात. त्यासाठी माझ्या नृत्याचं स्कील पणाला लागलं. मी भरपूर मेहनत घेतली. माझ्यावर दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि इतर सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला नि आता त्याचा चांगला ‘रिझल्ट’ आला.”

‘बॉईज 3’च्या संगीताबद्दल अवधूत गुप्ते म्हणाले, “आपण आधी केलेल्या कामाचं पुन्हा नव्यानं सादरीकरण करणं किंवा आपण उभ्या केलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं हे नवीन चॅलेंज तसेच इंट्रेस्टिंग गोष्ट असते. ते मी ‘लग्नाळू’ या गाण्याद्वारे स्वीकारलं. निर्मात्यांकडून हे गाणं पुन्हा करण्याचा प्रस्ताव आला. मग त्या मुलीच्या ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’नं आधी हे गाणं लिहिलं गेलं. या गाण्यात नवोदित अभिनेत्री विदुलानं लावलेली एनर्जी कमालीची आहे. तेवढी अपेक्षा मी खरोखरीच केली नव्हती. तिचं खूप छान भवितव्य आहे, असं मला वाटतं.”

‘बॉईज 3’मधील ‘लग्नाळू’ गाणं गायलंय ते प्रख्यात गायिका मुग्धा कर्‍हाडे हिनं. त्या अनुभवाबद्दल मुग्धा म्हणाली, “या गाण्याचं मूळ ‘मेल व्हर्जन’ मी खूपदा ऐकलं होतं. त्यामुळे ते आपल्याला गायला मिळणार याचीच मला मजा वाटत होती. अवधूत गुप्तेबरोबर काम करताना मजा असते. त्यामुळे अगदी हसतखेळत आम्ही हे गाणं रेकॉर्ड केलं. हे गाणं गाण्यासाठी आधी मी खूप छान मूड बनवला. त्यामुळे मानसिक तयारीवर मी अधिक भर दिला. आपण आज धमाल करायचीय, या मूडमध्ये जाणं आवश्यक असतं. त्या मूडमध्ये मी गेले. त्यामुळेच हे गाणं एवढं छान झालंय.”

– टीम ‘बॉईज’

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया