‘ चित्रतपस्वी ’ : एक संस्कार केंद्र
——
‘ शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयाचे मनन करावे
शिवकार्याचे सेवक व्हावे, देव-देश आणि धर्म रक्षणी ’
हे सूत्र ज्यांनी आयुष्यभर जपले, मोहमयी मायावी सृष्टीच्या विषारी अंगापासून जे कायम अलिप्त राहिले, अशी आभाळाएवढी कर्तबगारी असणारे भालजी ऊर्फ बाबा पेंढारकर. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी व ओजस्वी जीवनाचे दर्शन इतिहासकारांइतक्या प्रखर निष्ठेने भारतीय रजतपटावर जिवंत आणि ज्वलंतपणे साकारण्याची उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या शिवभक्त भालजी पेंढारकरांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. इतिहास सर्वांनीच वाचला; पण शिवरायांची प्रतिमा जनमानसाच्या मनावर कोरण्याचे काम भालजींच्या ऐतिहासिक चित्रपटांनी केले. मराठमोळ्या इतिहासाने त्यांच्या लेखणीतून जन्म घेतला. त्या लेखणीला धार होती तलवारीची. टोके होती भाला बर्चीची. त्यांचे चित्रपट एक इतिहास आहे आणि जो द्रष्टा असतो तोच इतिहास घडवू शकतो. काळ्या कभिन्न अंधारात शिवभक्तीचे पलिते पेटते ठेवण्याचे कार्य करण्यासाठी ते सदैव कार्यरत राहिले. दहा ठिकाणी व्याख्यान देऊन जे सांगता येणार नाही ते चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येतं असं वाटल्यामुळेच भालजींनी चित्रपटाच्या माध्यमाचा आधार घेतला. त्यांना महत्वाचं वाटत होतं चित्रपटाद्वारे होणाऱ्या लोकशिक्षणाचं. केवळ लोकरंजन हा त्यांचा हेतू कधीच नव्हता.
भालजींचे पूर्ण नाव भालचंद्र गोपाळ पेंढारकर. ते मूळचे कोल्हापूरचे. जेमतेम एस.एस.सी.पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. कुस्ती वगैरे खेळात लहानपणी तरबेज झाले. १८ व्या वर्षी मिलिटरीत सैनिक म्हणूनही काम केले. पुढे १९२५-२६ साली ते चित्रपट क्षेत्राकडे वळले. मूकपटांच्या टायटल्स लिहिण्यासाठी पुण्यात रुस्तुम मोदी यांच्या ‘लक्ष्मी’ थिएटरात व्यवस्थापक झाले. ‘रूपमती, ‘श्यामसुंदर’ अशा बोलपटांचं लिखाण बाबांनी केले. नंतर ते कोल्हापूरला आले आणि या सृष्टीतच स्थिरावले. त्यांनी पटकथेसोबत ‘असुरी लालसा’, ‘कायदेभंग’ अशी नाटकेही लिहिली. १९३२ मध्ये बोलपटांचे युग सुरू झाले तेव्हा त्यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आला. मुंबईत रौप्यमहोत्सव साजरा केलेला हा पहिला बोलपट. भालजींना पुण्याहून जयप्रभा स्टुडिओसाठी खास कोल्हापूरच्या छत्रपतींनी सन्मानाने बोलावून घेतले आणि या स्टुडिओने आकार घेतला.
स्टुडिओ घडताना बाबांना अनेकांचे सहकार्य लाभले. त्यात प्रामुख्याने मा.विठ्ठल, श्री.परांडेकर आणि माझे पप्पा म्हणजेच जयशंकर दानवेही होते. हिंदी-उर्दू रंगभूमी आपल्या अभिनयाने गाजवलेल्या आणि आर्य सुबोध नाटक मंडळीत योगदान असणाऱ्या दानवेंना बाबांनी कोल्हापूरला बोलावून घेतले. भालजींच्या एका हाकेसरशी दानवेंनी मुंबईतील नाट्य व सिनेसृष्टी सोडली अन कोल्हापूरला स्थायिक झाले. सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी भालजींनी त्यांना दिली. कारण त्याकाळी स्टुडिओत शूटिंगच्या आधी सीनसंदर्भात नाटकासारख्या तालमी होत असत. तालमी घेण्यात निष्णात असलेले दानवे नवीन कलाकारांना अक्षरश: छिन्नी-हातोडीने ठोकून तयार करत आणि भालजींसमोर त्यांना उभं करत. असा जयप्रभा स्टुडिओचा शिरस्ता होता. त्यामुळे प्राथमिक अभिनयाचे धडे दानवेच देत असत आणि त्याचबरोबर व्हिलनची कामंही करीत. ते अतिशय प्रभावी व्हिलन होते. म्हणूनच भालजी नेहमी म्हणत, ‘शिवाजी महाराजांचे जसे तानाजी,बाजी तसे माझे जयशंकर व मा.विठ्ठल.’
हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य गाजविणाऱ्या सुलोचनाबाई जयप्रभा स्टुडिओतच घडल्या. बाबांनी १९४६ला ‘सासुरवास’ चित्रपटात शांता जोग या नवीन अभिनेत्रीला मुख्य भूमिका दिली आणि सुलोचनादीदींना सहाय्यक अभिनेत्री केले. १९४७ला आपले सहाय्यक दिग्दर्शक दानवेंना ‘जयभवानी’ हा चित्रपट स्वतंत्र दिग्दर्शनासाठी दिला. त्यावेळी दानवेंनी दीदींना प्रथम नायिका बनवले. तसेच दीदींना रंगभूमीवर ‘करीन ती पूर्व’ या नाटकातही मुख्य नायिका बनवून सुलोचनादीदींचे रंगभूमी आणि सिनेसृष्टीतले ते पहिले पाथेय ठरले. अशा प्रकारे भालजीबाबा आणि दानवे या दोघांच्या अभिनयाच्या तालमीत दीदी तयार झाल्या. जणू करवीरच्या महालक्ष्मीने अभिनयकलेचा रत्नजडीत कोल्हापुरी साज त्यांच्या गळ्यात घातला आणि मुंबईच्या हिंदी सिनेसृष्टीची कवाडे त्यांच्यासाठी खुली केली.
हिंदी चित्रपटसृष्टीचा शो मन राजकपूरसुद्धा जयप्रभा स्टुडिओतच घडला. १९४६चा हिंदी ‘वाल्मिकी’ चित्रपट अर्ध्यावर आला तरी नारदाचे काम करणारे पात्र मिळाले नव्हते. त्यावेळी
१६ वर्षाच्या राजकपूरचे नारदाच्या भूमिकेसाठी वेशभूषा, रंगभूषा, टाळ, चिपळ्या आणि हिंदी संवादांसह फोटोसेशन करून दानवेंनी त्याला बाबांसमोर उभे केले आणि हिंदी सिनेसृष्टीला शो-मन मिळाला. हा दैवी संकेत होता असे म्हणावे लागेल. या वटवृक्षाच्या छायेत अनेक लहानथोर कलावंत, लेखक,तंत्रज्ज्ञ निर्माण झाले, विसावले आणि प्रसिद्धीस पात्र ठरले. शाहू मोडक,शांता आपटे,शांता जोग, वसंत शिंदे, रमेश देव, राजशेखर, सूर्यकांत, चंद्रकांत, गणपत पाटील, अनुपमा, चित्तरंजन कोल्हटकर, दादा कोंडके, उमा भेंडे, पद्मा चव्हाण, जयश्री गडकर एवढेच नव्हे तर राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर, कमलाकर तोरणे अशा अनेकांनी लेखन, अभिनय, दिग्दर्शन याचे पहिले धडे कोल्हापूरामधील जयप्रभा स्टुडिओतच भालजींच्या हाताखाली गिरवले. ही एक अध्ययनाची जागा असे समीकरण होते. प्रसिद्धीच्या झगमगटात वावरणाऱ्यांना हा स्टुडिओ नेहमी खुणावत राहिला.
द्वेषबुद्धीने गांधीहत्येनंतर लोकांनी त्यांचा जयप्रभा स्टुडिओ भस्मसात केला. स्टुडिओ जळाला तरी जळत्या जहाजाचे स्वीकृत सुकाणू घट्ट धरून डेकवर निश्चल उभे राहिलेले भालजी एक ‘चित्रयोगीच’ होते. राखेच्या कोळशाच्या ढिगाऱ्यासमोर उभा राहून हा धैर्याचा मेरुमणी शांतपणे म्हणाला, ‘चला,कोळशाच्या व्यापाराची अनायसे सोय झाली.’ त्यावेळी ‘मीठभाकर’ या चित्रपटाची प्रिंट नुकतीच तयार झाली होती. तीही या आगीत भस्मसात झाली. त्यावेळी भालजींना संशयित म्हणून अटकही झाली होती. त्यावेळी जयशंकर दानवेंना भालजींनी तुरुंगातून आदेश दिला की,आठवतील तसे ‘मीठभाकर’चे संवाद लिहून काढा. या चित्रपटाच्या इतक्या तालमी झाल्या होत्या की,स्क्रिप्ट जळालं तरी संवाद जिभेवर होते. श्री.दानवे आणि श्री.परांडेकर यांनी संवादाचे लिखाण केले आणि भालजी येताच केवळ २८ ते ३० दिवसांत पुन्हा ‘मीठभाकर’चे चित्रीकरण झाले आणि हा चित्रपट अतिशय दिमाखात पंचवीस आठवडे गर्दी खेचत राहिला.
भालजींनी अनेक पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपट निर्माण केले.दिग्दर्शक व निर्माता म्हणून पन्नास वर्षांच्या काळात जवळजवळ ३३ चित्रपट केले. ‘नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, थोरातांची कमळा, जय भवानी, शिलंगणाचे सोने, छत्रपती शिवाजी, पावनखिंड, नायकिणीचा सज्जा, रायगडचा राजबंदी, मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मेळवावा’ असे अनेक ऐतिहासिक चित्रपट तसेच ‘मीठभाकर, मी दारू सोडली, सासुरवास, सूनबाई, तांबडी माती, घरची राणी, साधी माणसं’ असे अनेक सामाजिक चित्रपटही त्यांनी निर्माण केले. ‘साधी माणसं’ चित्रपटाला १९६७ साली मराठी चित्रपट महोत्सवात पहिले पारितोषिक मिळाले. शिवाय इतर नऊ पारितोषिके मिळाली.वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी अखेरची इच्छा म्हणून ‘गनिमी कावा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले.डोळे अधू होते, पण म्हणतात ना दिग्दर्शकाचा तिसरा डोळा असतो. तो त्यांचा शाबूत होता.
श्रीकृष्ण व छत्रपती शिवराय ही भालजींची दैवतं होती. जीवनात स्वीकारलेल्या तत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.ताठ मानेनेच हा माणूस जगला. त्यांच्या चित्रपटाची सुरुवात
‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या मंगल महाराष्ट्र गीताने होत असे.त्यांनी चित्रपटाद्वारे देशाची अस्मिता जागृत ठेवून चित्रपट या प्रभावी हत्याराचा उपयोग जबाबदाररित्या स्वदेश प्रेम जागृत ठेवण्यासाठी केला अन जीवनभर एक महत्वपूर्ण कार्य केले.
– जयश्री दानवे
(सौजन्य – अथर्व प्रकाशन, कोल्हापूर)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया