अतिथी कट्टा

दिनांक : १६-०२-२०२१

दादासाहेब फाळकेंचा संघर्षकाळ…



भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिवंगत अभिनेते वसंत शिंदे यांनी लिहिलेल्या ‘विनोदवृक्ष’ या आत्मचरित्रामधील फाळके यांच्यासंदर्भातचा हा भाग संपादित स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत.

——

माझा दादासाहेबांशी संबंध आला तो कंपनीत नोकरीला लागताना म्हणजे १९२४ साली. त्या वेळी ते ५४ वर्षांचे होते. (त्या काळी सरकारी नोकर ५५ या वर्षी पेन्शनीत जात.) दादासाहेबांच्या आयुष्यातलं ते ‘दुसरं पर्व’ चालू. खरं म्हणजे दादासाहेबांचं कर्तृत्व याआधीच सिद्ध झाल्याने त्यांना ‘भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनका’चा मान मिळालाच होता!

दादासाहेबांचा जन्म १८७० सालचा. ते मूळ त्र्यंबकेश्वरचे. पुढे मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टची परीक्षा प्रथम श्रेणीत ते पास झाले. अनुभव मिळविण्यासाठी त्यांनी बडोद्याच्या प्रा. गज्जरांचा कलाभवन स्टुडिओ गज्जरांच्याच विनंतीवरून काही काळ चालवला. इथं ते पेंटिंग आणि फोटोग्राफी शिकले. त्यानंतर गोध्रा येथे त्यांनी स्वतंत्र छायाचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय त्यांनी सुमारे ७ वर्षे केला. पुढे प्लेगच्या साथीमुळे तो बंद करावा लागला. दादासाहेब मोठे हरहुन्नरी होते. बडोद्याला असताना एका जर्मन जादूगाराशी ओळख झाल्यावर त्यांनी बऱ्याच जादू त्याच्याकडून शिकून घेतल्या होत्या. यावर एक माहितीपटही पुढे त्यांनी काढला.

पहिली पत्नी आधीच वारली होती. वयाच्या ३१व्या वर्षी १९०१ मध्ये त्यांनी दुसरा विवाह केला. सौ. सरस्वतीबाईंची पुढील आयुष्यात त्यांना फार मदत झाली. ह्या सरस्वतीबाईंचे सख्खे मामा म्हणजे रंगभूमीवर गाजलेले नटसम्राट भाऊराव कोल्हटकर ऊर्फ भावड्या होय! लग्नानंतर लवकरच डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकरांच्या ओळखीने दादासाहेब पुरातत्त्व वस्तू संशोधन खात्यात (ऑर्किऑलॉजी) छायाचित्रकार व ड्राफ्टस्मन म्हणून लागले. नोकरीमुळे त्यांचा भारतभर प्रवास झाला खरा पण त्यांचं मूळचं कलासक्त मन या नोकरीत रमत नव्हतं.

या आधी गुजरातमध्ये असतानाच त्यांनी पेंटिंग व फोटोग्राफीबरोबरच हाफटोन ब्लॉक्स, फोटोलियो, तिरंगी छपाई, सिरॅमिक फोटोग्राफी वगैरे शिकून घेतलं होतं. नोकरी सोडून त्यांनी लोणावळ्याला स्वतंत्र अशा ‘फाळके एनग्रेव्हिंग अॅन्ड प्रिंटिंग वर्क्स’ या छापखान्याची स्थापना केली. भांडारकरांचा लोभ होताच, धंद्याचा व्याप इतका वाढला की त्यांना तो मुंबईला हलवावा लागला.

पुढे पुरुषोत्तम मावजी या धनिकाच्या भागीने त्यांनी नवा ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग प्रेस’ अतिशय नावारूपाला आणला. पुढे अस्वस्थ व उद्विग्न मन:स्थितीत त्यांनी तोही सोडून दिला. त्यानंतरचे काही दिवस ‘बेकारीत ‘च गेले. पण या बेकारीत त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की त्यांचं आयुष्यच पार बदलून गेलं. रोज संध्याकाळी धाकट्या मुलाला ‘बाबाराया’ला घेऊन ते फिरायला जात. एके दिवशी परत येताना गिरगाव बॅक रोडला असलेल्या (सध्या जिथे हरकिसनदास हॉस्पिटल आहे.) मोठ्या तंबूत त्यांनी एक ‘चित्रपट’ पाहिला. पडद्यावरची हालती चालती माणसं व प्राणी बघून बाबाराया तर एवढा खूष झाला की कधी घरी जातो व आईला हे सारं सांगतो असं त्याला झालं, सरस्वतीबाईंनी मुलांचं ऐकल्यावर उत्सुकता म्हणून दादासाहेबांना त्याबाबत विचारले. दादासाहेब म्हणाले, “तुला बघायचं आहे का? उद्या तुला घेऊन जातो.

दुसऱ्या दिवशी दादासाहेब सरस्वतीबाईंना घेऊन गेले. त्या दिवशी ‘ईस्टर’मुळे ‘दि लाईफ ऑफ खाइस्ट’ हा येशूच्या जीवनावरचा चित्रपट दाखवला. आणि त्याचवेळी दादासाहेबांच्या मनात विचार आला. आपण ख्रिस्ताच्या जागी ‘राम’ वा ‘कृष्ण’ का दाखवू नये ? भारतीयांना आपल्याच संस्कृतीचे दर्शन का घडवू नये? त्या वेळी ‘स्वदेशी’चं वारं प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीच्या मनात वाढत होतं. दादासाहेब तर अस्सल ‘भारतीय’ होते. त्यांनी ठरवलं, हे काम मीच करणार! येताना सरस्वतीबाईंनी विचारलं, “ही चित्रं कशी हो हलतात?”

‘तेही तुला लवकरच माहीत होईल. कारण आता मीच हा ‘हलणाऱ्या चित्राचा धंदा’ सुरू करणार आहे.” दादासाहेब आत्मविश्वासपूर्वक बोलत होते.

दुसऱ्या दिवशी दादासाहेबांनी प्रोजेक्ट ऑपरेटर खराब फिल्मचे जे तुकडे फेकून देतो ते गोळा करून आणले व घरी ‘ मॅग्निफाईंग लेन्स’मधून सगळ्यांना दाखवू लागले. ‘हा ख्रिस्त’ याच्याऐवजी आपला ‘कृष्ण’ दाखवायचा तर या ‘ मेरी’ ऐवजी दाखवायचीय ‘ यशोदा!’ असं दादासाहेब बोलत. आता चित्रपटाच्या वेडाने दादासाहेबांना पुरतं झपाटून टाकलं होतं.

एक ‘टॉयसिनेमा’ व फिल्मचे रीळ आणून ते मशिनमध्ये मेणबत्ती ठेवून लेन्सच्या साहाय्याने घरातील भिंतीवर ‘सिनेमा’ दाखवायचे. दादासाहेबांना खरोखरच वेड लागलं की काय अशी त्यांच्या नातेवाईकांना भीती वाटायला लागली. काहींनी तर त्यांना ‘वेडा’ ठरवून ठाण्याच्या इस्पितळात त्यांची रवानगी करण्यापर्यंत मजल गेली होती. दादासाहेबांची झोप उडून त्यांच्या दृष्टीवरही वाईट परिणाम झाला होता. पण यशवंत घनश्याम नाडकर्णी नावाच्या एका फोटोग्राफीच्या दुकानाच्या मालकाने मात्र त्यांना फार मदत केली. त्यांच्या मदतीमुळे दादासाहेब इंग्लंडला गेले व तेथे चित्रपट निर्मिती संबंधातील सर्व माहिती घेऊन आत्मविश्वासाने भारतात परतले.

भारतात परतल्यावर त्यांनी चित्रनिर्मितीसाठी स्टुडिओ बघायला सुरुवात केली आणि सुदैवाने त्यांना भायखळ्याचा मथुरादास मकनजींचा दादर येथील ‘मथुरा भुवन’ हा मोठा बंगला मिळाला. (भारतीय चित्रपटसृष्टीचे उगमस्थान असलेला हा बंगला आजही ‘मथुरा भवन’ याच नावाने दादासाहेब फाळके रोड, दादर, मुंबई येथे उभा आहे.) दादासाहेब आता पुढच्या तयारीला लागले. त्यांनी परदेशहून मागवलेली यंत्रसामग्री यायला अवकाश होता. तोपर्यंत डार्करूम, काचेचा स्टुडिओ ही कामे त्यांनी पूर्ण केली.

स्त्री-वर्गाच्या प्रेक्षकांवर ‘परिणाम’ करणाऱ्या कथानकावर जर चित्रपट काढला तर तो सर्वांना अपिल होईल व प्रेक्षकांची अमाप गर्दी खेचेल हा आडाखा दादासाहेबांनी मनात बांधूनच ‘ हरिश्चंद्रा’च्या कथेवर ‘सिनेरिओ’ तयार केला. त्यानंतर त्यांनी सेटिंग्जची स्केचेस तयार केली. या वेळपर्यंत त्यांनी मागवलेली मशिनरी मुंबईत येऊन दाखल झाली.

दादासाहेबांकडे अजून नोकर-चाकर नव्हते. त्यामुळे मशिनरीचं पॅकिंग स्वत: दादासाहेबांनी मुलं व सरस्वतीबाईंच्या मदतीने फोडून यंत्राचे सर्व भाग व्यवस्थित जोडून फिटिंग करून ‘ यंत्रसामग्री’ तयार केली. त्या वेळी फिल्मला बाजूचं ‘परफोरेशन’ नसे. त्यामुळे अख्ख्या फिल्मला भोकं पाडायचंही काम त्यांना करावं लागलं. दादासाहेब व सरस्वतीबाईंनी दोघांनी आळीपाळीने मोठ्या चिकाटीने ते काम पार पाडलं. फिल्मचा तो २०० फुटी तुकडा मग कॅमेरात बसवण्यात आला.

आता फक्त शूटिंग करायचं होतं. एकदम ‘हरिश्चंद्र’ सुरू करण्यापूर्वी ‘ट्रायल’ म्हणून एखादी छोटी फिल्म तयार करावी व तोपर्यंत ‘हरिश्चंद्रा ‘साठी लागणारं भांडवल गोळा करावं, असं दादासाहेबांच्या मनात आलं. त्यांनी मग एका कुंडीत वाटाण्याची बी पेरली व दर तासातासाने त्या कुंडीचं शूटिंग करवून वाटाण्याच्या बीचे संपूर्ण वेलीत रूपांतर होईपर्यंतचा एका छोटासा ‘चित्रपट’ तयार केला. याचं प्रिटिंग आणि डेव्हलपिंग त्यांनी सरस्वतीबाईंच्या मदतीने केलं होतं.

आता या छोट्या फिल्मची ‘ट्रायल’ बघायची होती. परदेशातून आणलेल्या यंत्रसामग्रीत ‘प्रोजेक्टर’ होताच. परंतु त्या वेळी (१९१२) दादरला वीज आली नव्हती. दादासाहेबांनी ‘कार्बाईड’च्या साहाय्याने फिल्म सर्वांना दाखवली. अवघा एक मिनिटां’चा तो चित्रपट! पण तो पाहून सारेजण एवढे हर्षभरित झाले. त्यांनी आनंदाने टाळ्या वाजवून पसंतीची पावती दिली. ट्रायल बघायला आलेले नाडकर्णी दादासाहेबांना म्हणाले, “तुम्ही वाटाण्याच्या रूपाने आज भारतीय चित्रपटसृष्टीचं बीजारोपण केलंय!”

दादासाहेबांचा आत्मविश्वास आता दुणावला. त्या भरात त्यांनी हरिश्चंद्राच्या तयारीसाठी म्हणून एका पेंटरची व एका सुताराची नेमणूक करून टाकली व ‘सुस्वरूप नट-नट्यां’साठी ‘इंदुप्रकाश’मध्ये एक जाहिरातही देऊन टाकली. पण या जाहिरातीमुळे कुणीही स्वत:ला सुंदर’ समजून दादासाहेबांना भेटायला येऊ लागले. या गोष्टीचा दादासाहेबांना एवढा वैताग आला की, शेवटी त्यांनी जाहिराती शिवायच कलाकार निवडायचं, असं ठरवलं.

मुंबईच्या ‘नाट्यकला ‘मधले एक स्त्री-पार्ट पांडोबा साने व एक उर्दू नाटकात काम करणारे गजानन वासुदेव साने (सानेमामा) दरमहा रु. ४० पगारावर फाळक्यांकडे आले. पांडोबा सानेंच्या ओळखीचे दादा दाबके हे गृहस्थ अत्यंत सुदृढ तब्येतीचे व रुबाबदार वाटल्याने त्यांना ‘हरिश्चंद्राचे’ काम द्यायचे ठरले. ‘रोहिदासा’च्या कामासाठी मुलगा मिळणं अवघड होतं. रोहिदासाचे वनवासात हाल व नंतर मृत्यू हा भाग दाखवणार म्हटल्यावर कुणीही आपल्या मुलाला या भूमिकेसाठी द्यायला तयार होईना. आपल्या मुलाचे पडद्यावर का होईना पण ‘ हाल आणि मृत्यू’ बघायची कुणाचीच तयारी नव्हती. शेवटी दादासाहेबांनी स्वत:च्या मुलाला भालचंद्र ऊर्फ बाबाराय याला रोहिदास करायचं ठरवलं.

आता फक्त ‘तारामती’ची निवड तेवढी राहिली होती. कुलीन वा घरंदाज स्त्रिया या भूमिकेसाठी येईनात. तेव्हा दादासाहेबांनी पुन्हा एक जाहिरात दिली. त्यात त्यांनी अगदी स्पष्टपणे लिहिलं होतं, ‘केवळ सुस्वरूप चेहऱ्याच्या तरुणींनीच मुलाखतीसाठी यावे.’ आणि लवकरच एक बऱ्या चेहऱ्याची स्त्री आली व कामाला तयार झाली. ती एक वेश्या होती. दादासाहेबांनी या ‘तारामती’ला चार दिवस अभिनयाची तालीम दिली. पण पाचव्या दिवशी तालमीच्या वेळी तिचा शेठजी तिथं आला आणि तिच्यावर डाफरला, “काय गं एs तुला काही लाजलज्जा आहे का नाही? का सगळीच सोडलीस? सिनेमात काम करतेस?” असं म्हणून तिला ओढून घेऊन गेला. त्याच्या दृष्टीने तिच्या धंद्यापेक्षा सिनेमात काम करणे कमीपणाचे होते!

मग दादासाहेबांनी सरळ मुंबईतल्या वेश्यावस्तीत जाऊन एखादी ‘बाई’ मिळते का हे बघायला सुरुवात केली. तिथल्या अनेक वेश्यांना त्यांनी ‘सिनेमात काम करणार का?’ असं विचारलं. पण तिथेही त्यांना अतिशय मासलेवाईक अशी उत्तरं ऐकायला मिळाली. एकीनं सांगितलं, “आम्ही सिनेमात काम केलं तर आम्हाला जातीबाहेर वाळत टाकतील!”

दुसरी म्हणाली, “आमच्या शेटजींची आधी परवानगी काढा.”

तिसरीनं विचारलं, ”तुम्ही पैसे किती देणार?”

दादासाहेब म्हणाले, ”महिना चाळीस रुपये!”

तशी ती म्हणाली, ” एवढे पैसे तर मी एका रात्रीत मिळवते. तुमच्या सिनेमात काम करून काय फायदा?” यावर दादासाहेब काय बोलणार?

तर चौथीनं आईला भेटायला सांगितले. दादासाहेब तिच्या आईला भेटले, तेव्हा ती त्यांना म्हणाली, “तुम्ही माझ्या पोरीशी झुलवा (लग्न) लावा. मग ती तुमच्या सिनेमात काम करील.” हा असा अनुभव आल्यावर दादासाहेब अतिशय निराश झाले. ‘तारामती’ आता शोधायची कुठे, या विचारात ते दमून थकून ग्रँट रोडवरच्या गोखले उपहारगृहात चहा घ्यायला म्हणून आले. तो त्यांना हॉटेलातच गिहाईकांना चहा-भजी देणारा एक वेटर दिसला. तो नाकी डोळी नीटस, तरतरीत नाकाचा, गोरागोमटा आणि अतिशय देखणा असा होता. दादासाहेबांच्या मनात त्या वेळी एक विचार चमकला. त्यांनी त्या वेटरला बोलावलं आणि सिनेमात काम करणार का, म्हणून विचारलं. त्या पोरांला हॉटेलात जेवून-खाऊन दहा रुपये मिळत.

दादासाहेबांनी पंधरा रुपये देऊ म्हटल्यावर तो तयार झाला आणि दादासाहेबांना ‘तारामती’ सापडली. तारामतीचं काम करणाऱ्या त्या पोराचं नाव होतं, कृष्णा हरि तथा अण्णा साळुखे. याच्याच मिशा दादासाहेबांनी पुढे सफाचाट केल्या. (याच अण्णा साळुख्याच्या हाताखाली पुढे माझा आत्येभाऊ प्रभाकर चव्हाण कॅमेरामन म्हणून होता.) याचवेळी तिथली आणखी काही मुलं दादासाहेबांच्या कंपनीत सामील झाली. त्यात शिंदेमामा, दत्तू क्षीरसागर ही मंडळी होती. दादासाहेबांचा त्र्यंबकेश्वरचा बालमित्र त्र्यंबक बाबाजी तेलंग याला फोटोग्राफीचा नाद होता. दादासाहेबांनी त्यालाच आपला कॅमेरामन करून टाकलं. त्याची दोन्ही मुलं (विश्वनाथ आणि दत्तात्रय ) दादासाहेबाकंडेच कामाला होती.

अशा त-हेने सगळी तयार झाल्यावर दादासाहेबांनी चित्रनिर्मितीस सुरुवात केली. पटकथा तयारच होती. त्याप्रमाणे तालमी झाल्या. दिग्दर्शन, कलादिग्दर्शन, वेशभूषा, संकलन, प्रोसेसिंग इत्यादी साऱ्या जबाबदाऱ्या स्वत: दादासाहेब सांभाळत होते. राजापूरकर नाटक मंडळीचे मालक बाबाजी राणे सुदैवाने त्या वेळी मुंबईत होते. त्यांनी आपल्या नाटकमंडळीची आख्खी ड्रेपरी दादासाहेबांना पुरवली. त्यामुळे बराच खर्च वाचला.

मुंबई-पुणे रेल्वेलायनीवर वांगणी म्हणून गाव आहे, तिथं आऊटडोअर शूटिंग झालं. काही भागाचं शूटिंग त्र्यंबकेश्वरला झालं. तर काही भाग मुंबईच्या बंगल्यातच चित्रित झाला. अहोरात्र परिश्रम घेऊन दादासाहेबांनी ६ महिने २७ दिवसांत, ३७०० फूट लांबीचा म्हणजे सुमारे चार रीळांचा ‘ राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट पूर्ण केला. मुंबईच्या कॉरोनेशन थिएटरमध्ये दि. १७ मे १९१३ रोजी ‘ राजा हरिश्चंद्र’चे उद्घाटन डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांच्या शुभहस्ते झाले. अनेक मान्यवर मंडळी या अभूतपूर्व समारंभाला हजर होती. अनेकांनी या चित्रपटाचा गौरख विसाव्या शतकातील अभूतपूर्व चमत्कार अशा शब्दांत केला, भारतीय चित्रपट व्यवसायाची मुहूर्तमेढ ‘ राजा हरिश्चंद्र’ने रोवली गेली होती. वास्तविक ‘राजा हरिश्चंद्र’च्या बरोबर एक वर्ष आधी दादासाहेब तोरण्यांचा ‘पुंडलिक’ प्रदर्शित झाला होता. पण तरीही भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकत्वाचा मान दादासाहेब फाळक्यांनाच मिळतो. याचं कारण म्हणजे ‘पुंडलिक ‘मध्ये चित्रपटाचं तंत्र नव्हतं, नाटकाचं सरळसरळ चित्रीकरण होतं. तंत्रज्ञ परदेशी होते, इतकंच काय पण फिल्मची प्रक्रिया व प्रिंटिंगही लंडनहून करून आणलं होतं. याउलट ‘ राजा हरिश्चंद्र’मध्ये चित्रपटाचं तंत्र होतं. तंत्रज्ञही भारतीय होते. फिल्मचे प्रिंटिंग, डेव्हलपिंग इत्यादी सारी प्रक्रिया इथं भारतातच झाली होती आणि म्हणूनच ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला व त्याच्या निर्मात्याला म्हणजे दादासाहेब फाळक्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा जनकत्वाचा मान बहाल केला गेला! यानंतरही दादासाहेबांनी ‘लंकादहन’, ‘कालियामर्दन’, ‘मोहिनी-भस्मासूर’ सारखे अप्रतिम चित्रपट काढले,

१९१३ ते १९१८ हा दादासाहेब फाळक्यांच्या आयुष्यातील ‘सुवर्णकाळ’ म्हणता येईल. त्यानंतरची काही वर्षे रंगभूमीवर काढून १९२३ साली स्थापन झालेल्या हिंदुस्थान फिल्म कंपनीत ते आपट्यांकडे पगारी नोकर म्हणून राहिले. नेमका याच काळात माझा दादासाहेबांशी संबंध आला. त्यांच्या हाताखाली काम करायला मिळालं. दादासाहेबांच्या कडक शिस्तीमुळे लहानपणीच शिस्त, स्वावलंबन व वक्तशीरपणा हे गुण आमच्यात रुजले.

दादासाहेबांनी हिंदुस्थान फिल्म कंपनीत १९२३ ते १९२९ या काळात सुमारे ४४ मूकपट निर्माण केले. सुदैवाने त्यातील १९ मूकपटांत मला काम करायची संधी मिळाली.

– वसंत शिंदे

(शब्दांकन – मधु पोतदार)

सौजन्य – मंजुल प्रकाशन

(लेख सौजन्य – तारांगण मासिक)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया