अतिथी कट्टा

दिनांक : ११-०२-२०२३

पेशन्स आणि पॅशन फिल्ममेकरकडे आवश्यक…


‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘दबंग’, ‘फॅशन’ या चित्रपटांचे छाया-दिग्दर्शक तसेच ‘यलो’ चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांचा ‘जग्गू आणि ज्युलिएट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्तानं श्री. लिमये यांचं हे मनोगत.


——–

‘जग्गू आणि ज्युलिएट’ हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेली नऊ वर्षं मी या चित्रपटाच्या गोष्टीच्या मागे वेड्यासारखा धावत होतो. एक चित्रपट केला की मग बर्‍याच ऑफर्स येतात. परंतु, माळ लावणारे चित्रपट करण्याची माझी विचारधारा नाही. तसेच या काळात दिग्दर्शक म्हणून माझ्याकडे इतर ज्या कथा येत होत्या, त्या मला तेवढ्या भावल्या नाहीत. त्यामुळे एखाद्या गोष्टीला आपण न्याय देऊ शकू, असं वाटत असेल तरच ती आपण गोष्ट करावी असं मला वाटतं. मी बर्‍याच निर्मात्यांना या चित्रपटाची गोष्ट ऐकवली होती. बर्‍याचशा गोष्टी पटकन घडतात, पण काहींना वेळ लागतो. अर्थात त्याचा आम्हाला फायदाच झाला. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही काम केलंय. माझ्या गोष्टीला न्याय पुनीत बालन यांच्याकडून मिळेल याची खात्री वाटल्यानं मी त्यांच्यासोबत हा चित्रपट केला.

निर्माते पुनीत बालन यांच्याशी गेल्या दशकभरात माझं खूप छान नातं निर्माण झालेलं आहे. पुनीतबरोबर मी यापूर्वी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट केलाय. त्या चित्रपटाचा मी छाया-दिग्दर्शक होतो. या चित्रपटाच्या निमित्तानं आमचे चांगले सूर जुळले. पुनीत हे श्रीगणपतीचे निस्सीम भक्त आहेत. गणेशोत्सवात ते पुण्यात बर्‍याच गोष्टींचं आयोजन करतात. भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळातर्फे जे विविध उपक्रम राबवले जातात, त्यात त्यांचाच पुढाकार असतो. 2020च्या कोव्हिड काळातील गणेशोत्सवात पुनीत यांनी सर्व पातळ्यांवर खूप मदत केली. या काळात आम्ही एक शॉर्ट फिल्मदेखील केली. करोना काळातील गणेशोत्सव कसा होता यावर ती फिल्म आधारली होती. अनंतचतुर्दशी आणि त्याचा आदला दिवस, अशा फक्त दोन दिवसांमध्येच आम्ही ती चित्रीत केली होती. दगडूशेठ गणपतीसमोर तसेच लक्ष्मी रोडवर तेव्हा फक्त कबुतर आणि चिमण्यांचे आवाज येत होते. त्यानंतर मग आम्ही दिवाळीसाठी एक छानशी शॉर्ट फिल्म केली. ‘आशेची रोषणाई’ असं तिचं शीर्षक होतं. त्यात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख असे दोघे होते. अशा फिल्म्स पुनीतनं केल्या आहेत. त्यामुळे मी त्याला ‘जग्गू आणि ज्युिएलट’बद्दल सांगितलं आणि त्यानं लगेचच होकार दिला. निर्माते टिकवणं ही आजची गरज आहे. माणूस जेव्हा 100-200 रुपयांचं तिकीट काढून जेव्हा चित्रपटगृहात जातो, तेव्हा त्याला काही शिकवलं पाहिजे असं नाही. मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना भावेल असा एखादा विचार त्यातून सांगितला तर ते खूप चांगलं होईल असं मला वाटतं. म्हणून तशा पद्धतीचा मनोरंजक चित्रपट आम्ही बनवला आहे.

2011 मध्ये मी ब्रिटनमध्ये गेलो तेव्हा बरीच माणसं माझ्या पाहण्यात आली होती. एक दिग्दर्शक म्हणून बरंच काही तेव्हा माझ्या पाहण्यात आलं. ‘बॅगपॅकर्स’वर मला काहीतरी करायचं होतं. या कल्पनेचं माझ्यावर विलक्षण गारुड होतं. मग आम्ही ही ट्रॅव्हल फिल्म आम्ही बांधली. अंबर आणि गणेशबरोबर यापूर्वी मी ‘बालक पालक’ आणि ‘यलो’ हे दोन चित्रपट केले होते. तेव्हापासून आमचे छान सूर जुळले आहेत. अत्यंत चांगले असे ते लेखक आहेत. या चित्रपटासाठी मी त्यांचा अक्षरशः ज्यूस केलाय. त्यांच्याकडचं सर्वोत्कृष्ट मी काढून घेतलंय या चित्रपटासाठी. प्रेम आणि हास्य या दोन गोष्टी लोकांच्या आयुष्यातून खूप कमी झाल्या आहेत. आपण सध्या सगळे जण घड्याळाच्या काट्यावर फिरतोय. तेव्हा प्रेम आणि विनोद हा धागा पकडून माझ्या मनातील मूळ कल्पनेचा मी अंबर आणि गणेशकडून विस्तार करून घेतला. प्रेम आणि प्रवास ही न संपणारी गोष्ट आहे. या प्रवासातले दोन टोकाच्या भिन्न व्यक्तिरेखा मला अपेक्षित होत्या. म्हणून मग त्यात जग्गू आणि ज्युलिएट आले. या चित्रपटात नायक-नायिकेव्यतिरिक्त इतर 17-18 महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत.

या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण उत्तराखंडात झालं आहे. चित्रपटगृहात जेव्हा प्रेक्षक चित्रपट बघायला गेला आणि त्याला त्याची भव्यता पटली तर तुम्ही त्या चित्रपटाशी लगेच जोडले जाता. तसेच पहिल्या दहा मिनिटांमध्येच प्रेक्षकाला भावतील असे एक-दोन हलकेफुलके प्रसंग दिले तर प्रेक्षक त्यात गुंतायला सुरुवात होती, असं मला वाटतं. नेमकी हीच गोष्ट आम्ही या चित्रपटात केली आहे. आधी हा चित्रपट ब्रिटनमध्ये चित्रीत होणार होतं. मग आम्ही ऑस्ट्रेलियाची निवड केली. कालांतरानं मग आम्हाला उत्तराखंडच अधिक योग्य वाटलं.

या चित्रपटाची कथा ही तरुणाईची आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला भावेल, त्यांना या चित्रपटाच्या गाण्यावर नाचावंसं वाटेल असं संगीत मला अपेक्षित होतं. हे असं काही करून देण्यात सध्या अजय-अतुल हे दि बेस्ट आहेत. खरं तर 2014 मध्येच मी त्यांना या चित्रपटाचं कथानक ऐकवलं होतं. तेव्हापासून ते माझ्याबरोबर आहेत. अजय-अतुल हे दोघेही खूप मोठे संगीत दिग्दर्शक आहेत. त्यामुळे इतकी वर्षं माझ्या कथानकासोबत त्यांनी राहणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा त्यांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होणार नाही. कधी कधी अतुल मला हसून म्हणायचादेखील, महेश आता एखादी दुसरी गोष्ट बघ. फिल्ममेकिंगमध्ये फिल्ममेकरकडे भरपूर पेशन्स असणं आवश्यक असतो. तो माझ्याकडे आहे, म्हणूनच या चित्रपटारुपी माझं स्वप्न पूर्ण झालं. ‘अजय अतुल मीट्स मायकेल जॅक्सन’ अशा कल्पनेवर मला एक गाणं त्यांच्याकडून हवं होतं. तेव्हा माझी ही कल्पना ऐकून ते दोघंदेखील खूपच उत्साहित झाले होते. ‘तू बी आणि मी बी’ हे ते गाणं आहे. या गाण्यासाठी मी त्यांच्याबरोबर भरपूर सीटिंग्ज केल्या. 2014 मध्येच आम्ही काही गाणी निश्चित केली. केवळ ‘मना तुझ्याविना’ हे एक गाणं आम्ही अलीकडे बनवलं.

अमेय वाघचं काम मी गेली 12-13 वर्षं पाहतो आहोत. तो कमालीचं काम सध्या करतोय. त्याला चार वर्षांपूर्वीच मी ही गोष्ट ऐकवली होती. अमेयसाठीही हा खूप अवघड रोल होता. तो मला एकदा म्हणालादेखील, ‘सर मी पुण्याबाहेरची कॅरेक्टर्सच आजपर्यंत केलेली नाहीत.’ पण या गोष्टीत त्याला अभिनेता म्हणून करायला खूप काही गोष्टी होत्या. कोळी-आगरी भाषेतले संवाद त्याला दिले आहेत. ज्युिएलटसाठी बर्‍याच अभिनेत्रींचे चित्रपट आणि त्यांचे व्हिडीओज पाहिले होते. एकदा शंतनू भाकेनं मला वैदेही परशुरामीचे काही फोटोज पाठवले. तेव्हा या फोटोमधील तिचे लुक पाहूनच मला माझी ज्युलिएट सापडली. अमेरिकेत वाढलेली आणि जग फिरलेली ज्युली ही व्यक्तिरेखा आहे. तिच्यासाठी तिनं कधीच न साकारलेलं हे पात्र होतं. मानसी अत्तरदे या माझ्या वेशभूषाकारानं या दोघांना खूप चांगले कॉश्च्युम्स दिले आहेत. ‘यलो’पासून ती माझ्या बरोबर आहे. उत्तराखंडसारख्या सुंदर प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांची वेशभूषा उठून दिसणं आवश्यक होतं. वेशभूषा जमली तर कलाकारांनाही आपल्या व्यक्तिरेखेच्या अधिक जवळ जाता येतं. प्रवीण तरडे, समीर चौघुले, समीर धर्माधिकारी, अविनाश नारकर, अंगद म्हैसकर, हृषिकेश जोशी, अभिज्ञा भावे, मनोज जोशी, राया अभ्यंकर, सविता मालपेकर, उपेंद्र लिमये, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट यात आहे. या सगळ्यांनी त्यांच्या इमेजच्या विरुद्ध असलेल्या भूमिका साकारल्यात हे विशेष. सर्वच कलाकार आपापल्या व्यक्तिरेखेत घुसले होते. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी अमेयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. इतर कलाकारांचीही हीच अवस्था होती. सर्वसाधारपणे चित्रपटाचं शूटिंग संपलं की संपूर्ण युनिट एकमेकांसोबत फोटो काढतं. परंतु, त्या दिवशी आम्ही सगळे जण गंगेच्या किनार्‍यावर नुसतेच शांत बसून होतो. गंगेच्या प्रवाहाचा आवाज ऐकत होतो. सर मला अशी ही व्यक्तिरेखा पुन्हा नाही करता येणार… एखादा कलाकार आपल्या व्यक्तिरेखेशी किती समरस होऊन गेलाय, याचं हे खूप बोलकं उदाहरण आहे. वैदेहीची अवस्था काहीशी अशीच होती.

उत्तराखंडमध्ये गंगेच्या तीरावर आम्ही सगळं चित्रीकरण केलंय. गंगेच्या तीरावर चित्रीकरण करणं हे आमचं भाग्य. गंगा नदीचा जो ‘फ्लो’ आहे, त्यातून माझ्या चित्रपटामधील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दिसतात. या सगळ्यांना उत्तराखंडमध्ये घेऊन जाऊन चित्रीत करणं ही सर्वात मोठी टास्क होती. सगळ्यांच्या तारखा जुळवून करोनाच्या लाटेदरम्यान चित्रीत करणं हे खूप कठीण काम होतं. देव माझी परीक्षा पाहात होता. या सगळ्या कलाकारांनी खूप मदत केली. मी खूप शांतपणे काम करतो. आपण कोणावर रागावलो तर संबंध तुटण्याची भीती असते. चांगली माणसं नकळत मिळतात. त्यांच्याबरोबरचा धागा क्षणात तुटू शकतो. परंतु मनं जुळवून टिकवून ठेवायला आयुष्य अपुरं पडतं. पण मनं एकदा जुळली की तुम्हाला आयुष्यभराची साथ मिळते. ही माणसं म्हणजे माझी आयुष्यभराची पुंजी आहे.

याचं श्रेय मी माझे आई-वडील आणि पत्नीला देईन. लहानपणी माझ्यावर जे संस्कार झाले, त्याचंच प्रतिबिंब आहे ते. माझ्या आई-वडिलांनी मला कोणत्याही गोष्टीसाठी थांबवलं नाही. त्याउलट आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी मला आणखी प्रेरित केलं. ‘तू मास्टर ऑफ दि आर्ट… मग बघ जग तुझ्या मागं येईल…’ असं माझे वडील मला नेहमी सांगायचे. आजही मी घरातून बाहेर पडताना आईला नमस्कार करून बाहेर पडतो. तेव्हा तू आज काय काय करणार आहेस असं मला विचारते. माझी पत्नी शमानं आपलं करियर माझ्यासाठी मागं ठेवलं. माझ्यासाठी या सर्वांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. शिवकुमार पार्थसारथी, जितेंद्र कुलकर्णी, ओंकार हर्डीकर मानसी अत्तरदे, अंबर-गणेश ही माझ्या खूप जवळची माणसं आहेत. ही माणसं म्हणजे माझी खरी कमाई आहे.

छाया-दिग्दर्शनात माझे प्रयोग सतत सुरूच असतात. किंबहुना या चित्रपटात मी बर्‍याच वेगळ्या गोष्टी केल्या आहेत. सध्या दोन वेगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात घोळत आहे. एका हिंदी चित्रपटाचाही विचार सुरू आहे. फक्त यापुढील कलाकृतीसाठी तुम्हाला नऊ वर्षं नाही थांबावं लागणार असं आश्वासन मी प्रेक्षकांना देतो.

अगदी खरं सांगायचं तर चित्रपट निर्मितीचा विचार मी अजूनपर्यंत तरी केलेला नाही. पण ‘ली पिक्चर्स’ या कंपनीतर्फे मी विविध जाहिरातींची निर्मिती करीत असतो. ‘रिलायन्स ज्वेल’साठी ‘महालया’ नावाची मी नुकतीच एक मोठी जाहिरात दिग्दर्शित केली. पण चित्रपटाची निर्मिती करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. परमेश्वराची कृपा असेल आणि सर्वांची साथ मिळाली तर माझ्याकडून भविष्यात निर्मितीदेखील होईल. पण लोकांना नेहमी चांगलं देत राहावं या हेतूनंच मी झटून काम करीत असतो.

या क्षेत्रामध्ये काळाप्रमाणे सतत स्वतःला बदलावं लागतं. त्यामुळे तुम्ही किती लोकप्रिय आहात किंवा मोठे आहात, याला मी फारसं महत्त्व देत नाही. नवीन व्हिजन ही लोकांना आवडतच असते. प्रत्येकाकडे वेगळी दृष्टी असतेच. फक्त या क्षेत्रात येण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्याकडे खूप पेशन्स हवा. माझ्या हातात कॅमेरा आला, मी शॉर्ट फिल्म बनवली, आता मी फिल्ममेकर झालो, असं वाटणं धोकादायक आहे. कारण फिल्ममेकर बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मी सापशिडीचं उदाहरण देईन. झटपट वर जाऊन तुम्ही 97वरून पुन्हा एकदम तळाला येऊ शकता. त्यामुळे सगळ्या छोट्या छोट्या पायर्‍या चढून यशाच्या शिखराकडे वाटचाल करा. ही सापशिडी आहे. तुम्ही प्रत्येक वेळी सावधतेनं खेळलात आणि एक आणि दोनचे फासे टाकलेत तर तुम्ही यशस्वी व्हाल. ‘पेशन्स’ आणि ‘पॅशन’ या दोन गोष्टी या क्षेत्रात खूप महत्त्वाच्या आहेत.

– महेश लिमये

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया