अतिथी कट्टा

दिनांक : २९-०८-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌पोलिसच आहेत खरे हीरो
इंट्रो…
पोलीस दलावर आधारलेला ‘लाल बत्ती’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मंगेश देसाई यांचं हे मनोगत.

——

आजवर आपल्याकडे पोलिसांवर बरेच चित्रपट येऊन गेलेत. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला असेल की पोलिसांवर आणखी एक चित्रपट कशासाठी बनवण्यात आला असावा. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे पोलिसांवर आतापर्यंत तयार झालेल्या बहुतेक सर्व चित्रपटांमधील पोलिसांची इमेज ही खूपच चुकीच्या पद्धतीनं दाखविण्यात आलीय. एक तर त्यांना आपल्याकडील फिल्ममेकर्सनी कॉमेडियन बनवलं आहे किंवा त्यांना खलनायक तरी ठरवलेलं आहे. परंतु, पोलिसांमधला खरा पोलीस आपल्याला कधीच दिसलेला नाही. हे अवघड काम दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीनं करून दाखवलं आहे.

पोलीस म्हटलं की, तापट स्वभावाची, असंवेदनशील व्यक्ति अशी सर्वसाधारण प्रतिमा जनमानसात असते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ‘ड्यूटी’ बजावणारा पोलिस हासुद्धा एक माणूस आहे; त्यालाही भावभावना आहेत याचा अनेकदा आपल्याला विसर पडतो. समाजात घडणाऱ्या अनेकविध घटनांकडे पोलिससुद्धा तेवढ्याच सजगतेने, आपुलकीने पाहात असतात. पोलिसांतील याच पैलूवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पोलिसांची लाचखोरी, अधिकाराचा उन्माद, गुन्हेगारांशी असणारे साटेलोटे याच्या बातम्या आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतात. त्यामुळे पोलिस आणि जनता यांच्यामधील विश्वासाची जागा संशयाने आणि टीकेने घेतली आहे, पण पोलिसांचे शौर्य, वीरता आणि त्यांच्यातील माणुसकी ह्याचा उल्लेख मात्र कमी प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी सतत झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीमम’ध्ये (क्यूआरटी) घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भविष्यात दहशतवादी हल्ले रोखायचे, त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे, तर तसे प्रशिक्षित कमांडो दल असणे आवश्यक होते व याच गरजेतून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पोलिसांच्या सबलीकरणासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ची (क्यूआरटी) स्थापना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केली. दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये चिघळलेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या ‘क्यूआरटी’ च्या कमांडोची ट्रेनिंग अतिशय कठीण असते. याच खडतर ट्रेनिंगचा थरार दाखवत आणि दहशतवादाशी मुकाबला करत, ज्येष्ठ पोलिस अधिकारी एस.बी.पवार आणि त्यांच्या हाताखाली क्विक रिस्पॉन्स टीममध्ये असणारा कमांडो गणेश, यांच्या नातेसंबधाभोवती ‘लालबत्ती’ चित्रपटाची कथा फिरते.

प्रत्येक कलाकार खास अशा कलाकृतीच्या शोधात नेहमीच असतो. ‘लाल बत्ती’ सिनेमाच्या निमित्ताने मला एका कर्तव्यकठोर तरीही अतिशय संवेदनशील अशा पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारायला मिळणं हे नक्कीच समाधानकारक आहे. या चित्रपटात मी एस. बी. पवार या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी मी खास ठाण्याच्या QRT टीम कडून (क्विक रिस्पॉन्स टीम) खडतर ट्रेनिंग घेत भूमिकेसाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टी शिकून आत्मसात केल्या आहेत. जनतेसाठी काम करणारे पोलिसच खरे हिरो आहेत. हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण त्या व्यक्तिरेखेशी आपली शरीरयष्टी जुळणं गरजेचं असतं. ते माझ्यापुढचं मोठं चॅलेंज होतं. तब्बल २१ दिवस आम्ही कडक ट्रेनिंग घेतलं. पोलीस मैदानावर सरावही केला.

या चित्रपटात माझ्यासोबत भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला साजेसं अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभले असून चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर आहेत.

– मंगेश देसाई

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया