अतिथी कट्टा

दिनांक : २८-१०-२०२१

सिनेमाची जन्मकथा


भारतात सोळा भाषांत वर्षाला हजार ते अकराशे चित्रपट निर्माण होतात. सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश हे भारताचे अव्वल स्थान १९७३ सालापासून अबाधित आहे! जपान व हॉलीवूड यांना अव्वल स्थान परत मिळविता आलेले नाही. ज्येष्ठ लेखक सुधीर नांदगावकर यांनी या लेखात जगातील चित्रपट माध्यमाचा जन्म, त्यानंतरच्या रोचक घडामोडी, भारतामधील चित्रपट माध्यमाचा जन्म आणि त्याची भारतात झालेली भरभराट यावर प्रकाशझोत टाकला आहे.

मानवी संस्कृतीच्या इतिहासात अठरावे शतक अत्यंत महत्त्वाचे शतक मानले जाते. या शतकाने मध्ययुगाचा अस्त आणि यंत्रयुगाचा आरंभ पाहिला. त्याआधी तीनशे वर्ष चालू असलेल्या वैज्ञानिक प्रक्रीयेवर शिक्का मोर्तब केले. पण मन्वतराची ही पहाट सुरवातीला फक्त युरोप खंडात आली. याचे प्रमुख कारण म्हणजे तेथे झालेला विज्ञानाचा उदय आणि प्रसार तसेच युरोपियन लोकांनी केलेला त्याचा डोळस स्वीकार!

युरोपातले मध्ययुग म्हणजे रोमन साम्राज्याचा इ. स.४७६ मधे झालेला पाडाव ते १४५३ मधे तुर्कानी कॉन्स्टॉटिनीपल हे शहर जिंकले हा हजार वर्षांचा काळ! युरोपात पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात रेनेसान्सचा (प्रबोधनपर्व) उदय झाला. तेथपासून युरोपात आधुनिक युग अवतरले असे मानले जाते. इसवी सन १५०० ते २००० या पाचशे वर्षात शास्त्रज्ञांनी असंख्य वैज्ञानिक शोध सिद्ध केले. युरोपातील प्रत्येक देशात शास्त्रज्ञ जन्मले. त्यांनी विज्ञान समृद्ध केले. विज्ञाना पाठोपाठ तंत्रज्ञान आले. सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी हातात हात घालून विज्ञानयुग विस्तारत नेले. तंत्रज्ञानाचा आरंभ चौदाव्या शतकात घडाळ्याच्या बांधणी पासून सुरू झाला.

जेम्स वॅटने बाष्प शक्तीचा शोध अठराव्या शतकात सिद्ध केला. यातून यंत्राला शक्ती लाभली. तो पर्यंत प्राणी शक्ती हाच उर्जेचा स्त्रोत होता. बाष्पशक्तीमुळे प्राणी विरहित उर्जा माणसाला गवसली. ही उर्जा यंत्रनिर्मित आहे. तेथून तंत्रज्ञानाची भरारी सुरू झाली. यंत्रयुग प्रथम कापड उद्योगात अवतरले. गिरण्या सुरु झाल्या. तंत्रज्ञानात प्रयोगासाठी अनेक उपकरणे उपलब्ध झाली.
आणखी एक घटना म्हणजे विज्ञानप्रसारासाठी अकादम्या वा सोसायट्या युरोपात स्थापन झाल्या. इंग्लंडमधे रॉयल सोसायटी (१६६०) प्रâान्समधे दि अकॅडमी ऑफ सायन्स (१६६६) जर्मनीत रॉयल अकॅडमी, बर्लीन (१७००) आणि रशियात सेंट पीटर्सबर्ग अकॅडमी (१७२४) या क्रमाने स्थापन होत गेल्या. संशोधनाची नवी नवी शिखरे पादाक्रांत करत युरोपात १९ व्या शतकापासून विज्ञान वेगाने पुढे सरकू लागले.

भारतातले मध्ययुग साधारणत: इसवी सन १००० पासून म्हणजे मुस्लीम आक्रमणाच्या आरंभ काळापासून ते १८१८ मधे पेशवाई संपून ब्रिटीशांचा अंमल प्रस्थापित होईपर्यंतचा ९०० वर्षांचा काळ! याला आपल्याकडे अंधारयुग म्हटले जाते. युरोप काय किंवा भारत काय मध्ययुगाचे एक वैशिष्टय म्हणजे बळी तो कान पिळी. या सूत्राचा अंमल! तसेच सत्ता वेगवेगळ्या पातळ्यावर केंद्रित होत गेल्याने ज्ञान साधनेला महत्व उरले नाही. आणि ज्ञानाचे डबके साचले. तेच मध्ययुग! तेराव्या शतकात ‘ज्ञानेश्वरी’ सारखा अपूर्व ग्रंथ महाराष्ट्रात लिहला गेला, तेव्हा ब्रिटीश लोक मांस सहा महिने कसे टिकवायचे या विवंचनेत होते. पण याच काळात म्हणजे तेराव्या शतकात इंग्लंडमधे पार्लमेंट स्थापन झाले हे विशेष, म्हणजे युरोपीय देशांना भौतिकता महत्वाची वाटत होती; तेव्हा भारतीय समाज अध्यात्मांत आणि भक्तीत रमला होता. आणि कर्मकांडात धन्यता मानू लागला होता.

भारतात विज्ञान प्राचीनकाळापासून अस्तित्वात आहे. कणाद, आर्यभट्ट, मेधातिथी अशी वैज्ञानिकांची अनेक नांव सांगता येतील. पण हे विज्ञान प्राय: अनुभुतीशास्त्रावर आधारीत होते. कदाचित म्हणूनच अग्नीचे विविध प्रयोग शोधणारा अंगीरस, बुध ग्रहाचा शोध लावणारा वामदेव, वैद्यकशास्त्राची मांडणी करणारा वाग्भट हे प्राचीन शास्त्रज्ञ ऋषिमुनी म्हणून संबोधले गेले. त्यांचे संशोधन हे आधुनिक विज्ञानाच्या बुद्धीप्रमाण्य, प्रयोग, दाखला या निकषावर आधारीत नव्हते. अनेक वैज्ञानिक संकल्पना त्यांना अनुभूतीशास्त्राने उमजल्या तरी त्याचा उपयोग व्यावहारिक जीवनात कसा करायचा याचा विचार नव्हता. म्हणजेच विज्ञानाची ओळख होती तंत्रज्ञानाची नव्हती. जी कांही थोडीफार तंत्रज्ञानाची ओळख होती त्यांतून पुढे सातत्याने विकसित होणार्‍या तंत्रज्ञानाची निर्मिती झाली नाही. त्याचे एक कारण असेही सांगता येते की भारतात मनुष्य वस्तीला बारमहा अनुकुल हवामान आहे. त्यामुळे जगण्यासाठी येथे निसर्गाशी संघर्ष करावा लागला नाही. युरोपात ती स्थिती नाही. तेथे वर्षभर बदलते व तीव्र ऋतूंचे वातावरण. थंडीमधे बर्फ पडू लागले आणि दिवस छोटा व रात्र मोठी झाली, की दैनंदिन जिणे कठीण होई. त्यात सुकरता आणण्यासाठी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर अटळपणे करावा लागला. युरोपातील ‘रेनेसान्स’ने ज्याप्रमाणे विज्ञानाला जन्म दिला आणि त्यातून मानवकेंद्री विचारधारा तेथे उभी राहिली. असे कांही भारतात घडले नाही. भारतीय विज्ञान येथील जीवनशैलीत व संस्कृतीत गोठून गेले.

भारतातली मध्ययुग म्हणजे अंधारयुगच होते. ज्ञानाचे डबके साचले होते. शास्त्रापेक्षा रुढी बलवत्तर होती. ज्ञानेश्वरांना संन्याशाचा पोर म्हणून हिणवले गेले. ते आणि त्यांच्या भावंडाना पैठण येथेही शुद्धीपत्र मिळाले नाही. छत्रपतींचा आणि पहिल्या बाजीरावाचा पराक्रम या अंधारयुगातलाच. पण थोर मुत्सद्दी व शूर बाजीरावाला इंग्रज वकीलाने जेव्हा घड्याळ भेट दिले तेव्हा त्याने ते नाकारले. याला कांही राजकीय कारण असू शकेल पण नव्या विज्ञान शोधा विषयी कुतुहल नव्हते असाही अर्थ यांतून निघू शकतो. पेशवाईतला मुत्सद्दी नाना फडणवीस १८०० साली मरण पावला. शाहीरांनी नानांच्या बुद्धीवैभवाचे कौतुक ‘भले बुद्धीचे सागर नाना’ या शब्दात केले होते. नानांना कोणी विचारले नाना ही पृथ्वी केवढी आहे? तेव्हा नानांचे उत्तर होते ‘नवखंड पृथ्वी आणि दहावे खंड काशी’. आजच्या सातवीत शिकणार्‍या मुलाचे भौगोलिक ज्ञान नानांपेक्षा कितीतरी अधिक आहे. पण हा दोष नानांचा नव्हता. मध्ययुगीन समाज व्यवस्थेचा होता. मध्ययुगातील आठशे नऊशे वर्षात भारतीय समाज रुढी व कर्मकांडात अडकला होता. त्याचे कुतूहल पूर्णत: संपून गेले होते. ज्ञानापिपासेची प्राचीन काळातली परंपरा कुंठीत झाली.

मध्ययुगीन भारतीय समाजाची मानसिकता ईश्वरकेंद्री मध्ययुगीन जीवन मूल्यावर आधारलेली होती. विचारांपेक्षा श्रद्धेला महत्व होते आणि याच काळात येथे इंग्रजांचे राज्य आले. इंग्रजांनी कायद्याचे राज्य आणले. इंग्रजी भाषा शिकवायला आरंभ केला आणि इंग्लडमधले वैज्ञानिक शोध भारतात आणायला सुरवात केली. १६ एप्रील १८५३ रोजी मुंबई-ठाणे पहिली रेल्वे धावली. मध्ययुगीन जीवन मूल्यावर जगणार्‍या श्रद्धाळू समाजाला रेल्वे हा साहेब बहादूरने केलेला ‘चमत्कार’ वाटला. पेशवाईतली शाहीरी परंपरा तोपर्यंत जिवंत होती. साहेबाने बिनघोड्याची गाडी चालवली अशी कवने शाहीरांनी केली. १८५६ साली ब्रिटीशांनी तार व्यवस्था पोस्ट ऑफीसमधे आणली. लोकांना हा देखील ‘चमत्कार’च वाटला. १८९६ साली मुंबईत चलच्चित्रांचे खेळ सुरू झाले. पण त्यामागचे वैज्ञानिक सूत्र लक्षात न घेता आपल्या समाजाने या विज्ञानाच्या अपत्याला ‘चमत्कार’ न मानता ‘लोककले’चाच ‘नवा’ अवतार समजून सिनेमाचे स्वागत केले.

१४५३ मधे तुर्कानी कॉन्स्टॉटिनोपल (आजचे इस्तंबूल) जिंकल्यावर भारत व चीन मधून खुष्कीच्या मार्गाने युरोपात पोचणारे मसाल्याचे पदार्थ पोचणे थांबले. सिल्करुट बंद झाला. तेव्हा जलमार्गाने भारतात पोचता येईल का? याचा शोध सुरू झाला. या शोध मोहिमेला व्यापार्‍यांनी पैसा पुरविला. यांतून कोलंबस अमेरिकेत पोचला आणि वास्को-डी-गामा आप्रिâकेला वळसा घालून केरळात पोचला. १४४० मधे जर्मनीत गुटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला. या शोधामुळे ‘बायबल’ छापले गेले. ते सर्वसामान्य माणसाच्या हाती पडले. युरोपियन माणूस बायबल हाती येताच हरखून गेला. पण पाद्री सांगतो त्यापेक्षा ‘बायबल’ कांही वेगळे सांगत आहे. हे सामान्य माणसाला उमजले यामुळे चर्चची धार्मिक अधिसत्ता धोक्यात आली. जर्मनीत मार्टिन ल्यूथरने पोपच्या वर्चस्वाला आक्षेप घेतला. यातून प्रोटेस्टंट पंथ जन्माला आला. इंग्लंड आणि प्रâान्सच्या राजांनीही पोपची अधिसत्ता झुगारून दिली. या घटनांतून धर्मसत्तेच्या अधिपत्याखाली गुदमरून व गोंधळून गेलेले माणसाचे ‘मन’ मुक्त झाले. हे सारे घडायला दोन-तीन शतके जावी लागली. विज्ञानाच्या जाणीवेने युरोपीय समाजाला ईश्वरकेंद्री मध्ययुगाकडून मानवकेंद्री आधुनिक युगाकडे नेले. युरोपात रेनेसान्सने वैज्ञानिक दृष्टी निर्माण केली. याचा प्रारंभ पंधराव्या शतकात झाला. त्याला कारणीभूत; साचलेले डबके बनलेली ईश्वरकेंद्री धर्मसत्ताच होती. कोणतेही मन्वतर हे पंचागाच्या परवानगीसाठी अडून बसत नाही. तरीही इतिहासकार ‘रेनेसान्स’चा आरंभ १४५३ मधे झाला असे मानतात.

‘रेनेसान्स’ची पांच मूलभूत तत्वे सांगता येतात.

१. बुद्धीप्रामाण्य २. मानवकेंद्री दृष्टीकोण, ३ इहवाद, ४. व्यक्तीस्वातंत्र्य ५. राष्ट्रवाद या तत्त्वांचा आग्रह धरणारा सुधारणावाद युरोपात अवतरला. यातून समाजाची वैज्ञानिक दृष्टी-उंचावली. विज्ञान प्रसाराला बळ मिळाले. गणित, खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान, वैद्यकशास्त्र अशा बहुविध शास्त्रात युरोपभर विज्ञानाची दौड सुरू झाली. अठराव्या शतकांत बाष्पशक्ती व एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर विद्युतशक्ती यांचा शोध लागला. सिनेमाचा शोध गवसण्या पूर्वीच विज्ञानाने अनेक महत्त्वाचे शोध लावले. बाष्पशक्ती व विद्युतशक्ती यामुळे उर्जेचे नवे स्त्रोत उपलब्ध झाले. तंत्रज्ञान विकसित झाले होते.

अठराव्या शतकात १७६५ साली बाष्पशक्तीचा शोध जेम्स वॅटने सिद्ध केल्यानंतर प्रâेंच मेकॅनिकने १७६९ मधे पहिले रेल्वे इंजिन बनविले या दोन्ही शोधांचा उपयोग करून जॉर्ज स्टीव्हन्सने कोळशावर चालणारे नवे इंजिन बनविले आणि १८२५ साली इंग्लडमधे स्टॉकस्टन ते डार्लिंगटन या मार्गावर जगातली पहिली रेल्वे धावली. यामुळे सामान्य युरोपीय माणसापर्यंत विज्ञानाचे अनन्य साधारण महत्व पोचले. १९व्या शतकात युरोपीय ‘रेनेसान्स’ने वैज्ञानिक दृष्टी असलेला समाज हळूहळू निर्माण झाला आणि शतकाच्या अखेरीला म्हणजे १८९५ साली विज्ञानाने जन्माला घातलेला सिनेमा अवतरला.
चलच्चित्राचा शोध प्रâान्समधे सिद्ध झाला. विज्ञानाचा कोणताही शोध एका रात्रीत सिद्ध होत नाही. त्याआधी बरेच प्रयोग खर्ची पडलेले असतात. सिनेमा शोधाचा उगम, स्थिर फोटोग्राफीचा शोध सिद्ध झाला तेथून सांगता येतो. प्रâेंच सायन्स अकॅडमीने स्थिर फोटोग्राफीचा शोध ७ जानेवारी १८३९ रोजी जाहीर केला. प्रारंभी फोटोची ‘पॉझीटिव्ह’ कागदावर होती. त्यामुळे एका फोटोच्या अनेक प्रती काढता येत नव्हत्या. टाल्बोटने ही अडचण दूर केली. त्याने कोलोडिन फिल्म निगेटिव्ह वापरली. त्यामुळे एका फोटोच्या अनेक प्रती काढता येऊ लागल्या.

स्थिर फोटोग्राफीचा शोध सिद्ध झाल्यावर चलत्चित्र कॅमेर्‍याचे संशोधन सुरु झाले. त्यासाठीही अनेक प्रयोग खर्ची पडले. प्रथम १८४५ मधे प्रâान्सिस रोनाल्डने वेधशाळेसाठी चलत्चित्र कॅमेरा बनविला त्याची गती कमी होती. इंग्लंडमधे प्रâेंच गृहस्थ लुई प्रिन्स याने १८८८ मधे कॅमेरा बनविला. अनेक प्रयोग केल्यानंतर सिंगल लेन्सने चित्रण करता येइल असा कॅमेरा तयार झाला. या कॅमेर्‍याने त्याने ‘राऊंड हे गार्डन’ व ‘लीडचा पूल’हे दोन लघुपट चित्रित केले. यांतला पहिला सेकंदाला १२ प्रâेम व दुसरा लघुपट सेकंदाला २० प्रâेमस्नी चित्रीत करण्यांत आला होता. जगातली ही पहिली वहिली चलत् चित्रे होती. ब्रॅडफोर्ड नॅशनल मीडीया म्य्ुझियममधे हा पहिला चलत् चित्र कॅमेरा जपून ठेवलेला आहे.

एका बाजूला स्थिर फोटोग्राफीचा पेपर पॉझिटिव्ह ते फिल्म निगेटिव्ह असा प्रयोग चालू होता त्याआधीच इंग्लडमधे फिजिशियन पीटर मार्क रोजे याने ९ डिसेंबर १८२४ रोजी प्रकाशीत केलेल्या आपल्या प्रबंधात दृष्टीसातत्याचा सिद्धान्त मांडला. हा सिद्धान्त असा, की एखादी प्रतिमा डोळ्यात उमटते व तेथे ती निमिषार्धात नाहीशी होते. पण नंतर मेंदूत ती काही काळ रहाते. रोजेचा सिद्धान्त बेल्जीयन संशोधक जोसेफ प्लॅटूने आणखी पुढे नेला. त्याने १८३० मधे पेनाकिस्टीकोप (शब्दश: अर्थ आय डिसीव्हर-डोळ्यांना चकविणारा) तयार केला. आणि किंचित वेगवेगळ्या चित्रप्रतिमा (पेंटिंग्ज) एकामागोमाग दाखवून त्यांतून सलग चित्र-पट निर्माण झाल्याचा दृष्टीभ्रम होतो हे दाखवले. असे अनेक प्रयोग होत होते. प्रâेंच चित्रपट इतिहासकार जॉर्ज सॅडोल चलत् चित्रांचे मूलतत्व प्लॅटून मांडले असा निर्वाळा देतो. सिनेमा प्रोजेक्टरचे मूळ मॅजिक लँटर्न मधे होते. सतराव्या शतकापासूनच मॅजिक लॅण्टर्नचे खेळ प्रथम युरोप अमेरिकेत सुरू झाले. १८५०च्या सुमारास मॅजिक लॅन्टर्न मधे पेंटिंग ऐवजी छायाचित्रांचा उपयोग युरोपात सुरू झाला.

आपल्याकडेही १८९२ पासून कल्याणच्या महादेव गोपाळ पटवर्धन यांनी पेंटिंग्ज मॅजिक लॅण्टर्नद्वारा पडद्यावर दाखवायला सुरवात केली. ते मॅजिक लॅन्टर्न घेऊन भारतभर फिरले. त्यावर ते पौराणिक कथा सादर करीत. मॅजिक लॅण्टर्नला त्यांनी ‘शांबरिक खरोलिका’ असे संस्कृत नांवही शोधून काढले. त्या सर्व स्लाइडस पुण्याला नॅशनल फिल्म आर्काइव्हमधे जपून ठेवलेल्या आहेत.
चार्ल्स इमिल रेनॉड (१८४४–१९१८) हा प्रâेंच सायन्स शिक्षक होता. त्याने १८७७ मधे प्रॅक्झीनोस्कोप प्रोजेक्टर तयार केला. यामुळे चित्रपटाचे प्रोजेक्शन पूर्णत्वास पोचले. अमेरिकेत जॉर्ज इस्टमन१ यांनी फोटोग्राफीक फिल्मचे पेटंट १८८९ मधे घेतले. जगभरच्या या वैज्ञानिक शोधांचा उपयोग करून प्रâेंच ल्यूमियर बंधूनी ‘चलत्-चित्रांचा’शोध सिद्ध केला. ल्युमियर बंधूची फोटोग्राफिक मटेरीयल तयार करण्याची फॅक्टरी होती. या कारखान्यातून बाहेर पडणारे कामगार हाच पहिला चलत्-चित्रपट त्यांनी चित्रीत केला. या पहिल्या फिल्म स्ट्रीपची लांबी फक्त एक दीड मिनटांची होती. ल्युमियर बंधूनी आपल्या थ्री-अिन-वन म्हणजे कॅमेरा प्रिंटर प्रोजेक्टरचे पेटंट १३ फेब्रुवारी १८९५ ला घेतले आणि त्याचे नामकरण सिनेमातोग्राफ मशीन असे केले. यावरूनच पुढे चलत्-चित्रांना सिनेमा हा शब्द रूढ झाला. इतिहास लुमियर बंधू चलत्चित्रांचे जनक मानतो.

माणसाला विज्ञानाचा साक्षात्कार न होता तर सिनेमाचा जन्मच होऊ शकला नसता. सिनेमा ही विज्ञानाची देणगी आहे. तसेच रोजचे मानवी जीवन सुखद करण्यासाठी विज्ञानाने असंख्य शोध लावले पण सिनेमा ही एकच ‘कला’ जन्माला घातली. यासाठीच सिनेमा विज्ञानाचे अपत्य म्हटले जाते. विज्ञान जसजशी प्रगती करेल तसा त्या प्रगतीचा फायदा सिनेमाला उठविता येतो. १८९५ साली एका फिल्म स्ट्रीपने जन्मलेला सिनेमा शंभरवर्षात म्हणजे १९९५ साली डिव्हीडीद्वारा पुस्तकासारखा घरी घेऊन जाण्याच्या प्रगत अवस्थेला पोचला: इंग्रजीत सिनेमाचे Arू ूप्rदल्ुप् ेम्गहम असे यथार्थ वर्णन नोंदविले गेले आहे.

विज्ञानाने सिनेमा ही एकमेव ‘कला’ मानवी संस्कृतीला दिली असे म्हणताना कांहीच्या मनात टेलीव्हिजनचे काय? असा प्रश्न येऊ शकतो. मुख्य म्हणजे हालत्या चित्रप्रतिमा हाच सिनेमाप्रमाणे टेलीव्हिजचा पाया आहे. टेलीव्हिजन हे प्रक्षेपणाचे साधन आहे. अन्य कांही नाही.

ज्येष्ठ लेखक सुधीर नांदगावकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया