माझा मी – वसंत शिंदे
दिवंगत अभिनेते वसंत शिंदे यांचा १४ मे हा जन्मदिन. वसंत शिंदे यांचं मधु पोतदार यांनी शब्दांकित केलेलं नि मंजुळ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आत्मचरित्र लोकप्रिय ठरलं. या आत्मचरित्रामधील वसंत शिंदे यांनी स्वतःबद्दल सांगितलेली ही माहिती संपादित स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत.
——
संपूर्ण नाव – वसंत कृष्णाजी शिंदे
वजन -५० किलो.
उंची-१४५ सेंमी
शिक्षण – चौथी इयत्ता पास.
टोपणनाव – अण्णा. ‘वसंता’ म्हणणारे कुणीच राहिले नाहीत. ‘वसंता’ म्हणणारे शेवटचे भालजी. काही मित्रमंडळी ‘वसंतराव’ म्हणतात. ‘अण्णा’ हे नाव प्रभाकर मुजुमदारनं ठेवलं.
पेहराव – (घरी) – काम करताना हाफपॅन्ट, इतरवेळी पायजमा- शर्ट. (बाहेर) – फुलशर्ट, पायजमा, पॅन्ट. (कार्यक्रमासाठी) – जोधपुरी कोट – पॅन्ट, फरकॅप. वयपरत्वे काठी अथवा छत्री हातात धरतो. ती नसली तरी व्यवस्थित चालू शकतो. स्वावलंबी आहे. स्वत:चे कपडे स्वत:च धुतो. (नाटक कंपन्यांनी लावलेली सवय हाडीमासी मुरली आहे.) भटकायला खूप आवडतं. अजूनही बसने प्रवास करू शकतो. दुपारी झोपत नव्हतो. पण आता थोडी झोप घेतो. जेवण कमी. एक पोळी थोडा भात एवढंच! वाचायची आवड नाही. पुस्तक वाचताना झोप येते. वेळेच्या बाबतीत अतिशय व्यवस्थित. कुठे जायचे असेल वा कुणी येणार असेल तर आधीच तयार असतो. (दादासाहेब फाळके, चिंतामणराव, भालजी, या मंडळींनी लावलेली शिस्त!)
शाकाहारी, मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडतात. मद्यपान पूर्वी अधूनमधून. आता जवळजवळ बंद. काटकसरी आहे. खर्चिक नाही. गरिबीतून आल्यामुळे तशी वृत्तीच बनली आहे. स्वभाव भिडस्त. सहसा कुणालाही, कशालाही नाही म्हणत नाही.
माणसांत मिसळायला आवडतं. गप्पांची मैफल आवडते. मैफल हसती व हलती ठेवण्याचा प्रयत्न करतो. मित्रमंडळींच्या फिरक्या घ्यायला फार आवडतं. चेष्टा, मस्करी आवडते. केलेल्या विनोदात खोडसाळपणा असेल पण विष नसतं. निर्व्याज व सरळ वृत्ती कायम जागी. अहंकार आणि व्यसन हे कलाकाराला लागलेले शाप आहेत. मी ‘अहंकारा’चा वारा कधी लागू दिला नाही. जमिनीवरचे पाय सुटू दिले नाहीत. त्याचप्रमाणे कुठल्याही व्यसनाच्या अधीन झालो नाही. मोहाचे क्षण टाळले. एकंदरीत वाट्याला ते कमीच आले.
मूकपटात ५ रुपये ते १८ रुपये हा पगाराचा प्रवास. नाटक कंपनीत रु. १० ते २० रुपये. (राजाराम सोडण्यापूर्वी मी व जोगळेकर लोंढ्यांना म्हणालो, पगार वाढवा. २० रुपयांचा २५ रुपये करा. लोंढ्यांनी नकार दिला म्हणून राजाराम सोडली.)
दादासाहेबांनी १९१३ साली निर्माण केलेल्या ‘हरिश्चंद्र तारामती’ यासिनेमात कमीत कमी कॉन्ट्रॅक्ट २०० रुपयाचे. (जिवाचा सखा) तर जास्तीत जास्त आठ हजार रुपयांचे, ‘ऐकावं ते नवल’ हा चित्रपट पूर्ण झाला नाही. बाकीचे चित्रपट रु. २००० ते रु. ३००० या सरासरीने, ‘सांगत्ये ऐका’ या गाजलेल्या चित्रपटाचं काँन्ट्रेक्ट अवघं पाचशे रुपयांचं आहे. अर्थात त्या वेळी पाचशे रुपयालाही किंमत होती.
आता थोडं माझ्या आवडीनिवडीविषयी.
आवडते ठिकाण – पुणे, कोल्हापूर आठ दिवस राहू शकेन. मुंबई अजिबात आवडत नाही. काम संपलं की ताबडतोब निघून येतो.
आवडता चित्रपट (कृष्णधवल) – कानून (हिंदी), ऊनपाऊस (मराठी)
आवडता रंगीत चित्रपट – अप्पू राजा ( अप्रतिम मेकअपसाठी फार आवडला.)
मेरा नाम जोकर. (यातील जोकरला आईच्या मृत्यूच्या वेळी काम करावं लागतं, हा माझ्या आयुष्यात खरोखर घडलेला प्रसंग आहे.)
आवडतं नाटक – सौभद्र, तुझे आहे तुजपाशी.
आवडतं लोकनाटय – विच्छा माझी पुरी करा.
आवडता दिग्दर्शक (चित्रपट) – भालजी, राजा परांजपे, अनंत माने.
आवडता दिग्दर्शक (नाटक) – चिंतामणराव कोल्हटकर.
आवडते नाट्यगृह – कराडचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह.
आवडता नट (हिंदी) – ओमप्रकाश, नाना पाटेकर,
आवडती नटी (हिंदी) – मधुबाला, हेमामालिनी.
आवडता नट (मराठी) – सूर्यकांत, सचिन,
आवडती नटी (मराठी) – जयश्री गडकर, सुकन्या कुलकर्णी.
आवडता पोषाख – सुरवार, झब्बा, जाकीट, टोपी.
आवडता पदार्थ (तिखट / गोड) – याबाबत काहीही आवडीनिवडी नाहीत. सगळे पदार्थ चवीने खातो. ताटात टाकलेलं आवडत नाही. मात्र हॉटेलात ‘रुमाली रोटी’ करताना बघायला आवडते.
आवडते पुस्तक – पाणकळा, कोल्हापुरी साज,
आवडता नेता – नेताजी सुभाषचंद्र बोस.
आवडता लेखक – मधुसूदन कालेलकर,
आवडता नाटककार – राम गणेश गडकरी,
स्वत:ची आवडती भूमिका (चित्रपट) – अखेर जमलं, थापाड्या.
स्वत:ची आवडती भूमिका (नाटक)-प्रेमसंन्यास (गोकुळ), कविराय राम जोशी (धोंडी शाहीर)
आवडते चित्रपटगीत (हिंदी)- किसीकी मुस्कुराहटोपे (अनाडी).
आवडते चित्रपटगीत (मराठी) – विकत घेतला श्याम (जगाच्या पाठीवर).
आवडते नाट्यगीत – शूरा मी वंदिले.
आवडते विनोदी नट – दिनकर कामण्णा, राजा गोसावी.
आवडते विनोदी नट (अलीकडचे) – अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर.
आवडते गायक – मास्टर दीनानाथ.
आवडती गायिका – लता मंगेशकर, आशा भोसले.
कोणत्या नटाबरोबर काम करायला आवडायचं? – निळू फुले.
कोणत्या नटीबरोबर काम करायला आवडायचं? – इंदिरा चिटणीस, जयश्री गडकर, लीला गांधी.
हिंदीतल्या कुठल्या नायकाबरोबर काम करायला आवडलं असतं? – जितेंद्र व राजेश खन्ना.
हिंदीतल्या कुठल्या विनोदी नटाबरोबर काम करायला आवडलं असतं? – ओमप्रकाश, जॉनी वॉकर. (आगा व मेहमूदबरोबर काम केलंय.)
नाटकासाठी प्रेक्षक कुठला आवडतो? – मुंबईचा. मुंबईचा प्रेक्षक फार सोशीक व चुकांवर पांघरुण घालणारा क्षमाशील असा आहे.
आयुष्यात येऊन गेलेल्या स्त्रिया ? – माझी पत्नी सौ. शांता व सूनबाई सौ. विजया.
चित्रपटातील आदरणीय स्त्रिया? – कै. इंदिराबाई चिटणीस, सुलोचनादीदी, जयश्री गडकर, लीला गांधी, उषा चव्हाण, आशा काळे, सुहासिनी देशपांडे, नलिनी बोरकर.
माझ्या कितीतरी नायिका माझ्या मुलीपेक्षाही लहान वयाच्या होत्या. (पुष्पा भोसले, मधू कांबीकर, लता अरुण इ.) पण मी त्यांना कुणालाही ‘अगं तुगं’ केलं नाही.
प्रवास कुठे झाला? – दिल्ली, ग्वाल्हेर, इंदोर, भोपाळ, बडोदा, गोवा या ठिकाणी नाटकाच्या निमित्ताने आणि जावईबुवांबरोबर म्हैसूर, बंगलोर, तिरुपती, कन्याकुमारी इत्यादी ठिकाणी गेलोय.
– वसंत शिंदे
(शब्दांकन – मधु पोतदार)
(सौजन्य – मंजुळ प्रकाशन)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया