अतिथी कट्टा

दिनांक : ०३-०९-२०२२

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३७ व्या
स्मृतिदिनाच्या निमित्त्याने


कोल्हापूर म्हणजे कलापूर. या नगरीत अनेक कलावंत निर्माण झाले. त्यांनी कोल्हापूरची शान वाढविली. ‘‘आम्हाला वगळा, गतप्रभ झणी होतील तारांगणे’’

——–

केशवसुतांच्या या काव्यपंक्तीप्रमाणे आव्हान देणारे जे कलावंत सिने-नाट्यसृष्टीत होऊन गेले, त्यात अग्रक्रमानं नाव घ्यावं असे होते जयशंकर दानवे. सध्या काळाची गती प्रचंड वाढली आहे.संगणकातल्या सॉफ्टवेअरपासून कलेच्या लोकप्रियतेपर्यंत सर्वच गोष्टींचे मानदंड बदलत चालले असले, तरी कलाकार याला अपवाद असतो. तो विस्मृतीच्या पडद्याआड कधीच जाऊ शकत नाही, अशा कलाकारासाठी काळही थांबतो व सिंहावलोकन करतो.

नाटक ते मूकपट व मूकपट ते बोलपट असा अविरत साठ वर्षांचा दानवेंचा कलाप्रवास होता. नाटक-सिनेमाच्या ध्यासाने बाराव्या वर्षी घरातून पळून गेल्याने त्यांचे आयुष्य म्हणजे अविरत कष्ट, सततचा संघर्ष,अखंड परिश्रम,एकनिष्ठ गुरुसेवा आणि नाटक सिनेमाप्रती असणारी अविचल श्रद्धा यांची कहाणी आहे. नाटक, सिनेमा या माध्यमांना प्रतिष्ठा मिळवून देणारे ते फक्त कलाकार नव्हते, तर हाडाचे शिक्षक म्हणजे सिने-नाट्य दिग्दर्शकही होते.त्यांनी असंख्य कलाकार घडविण्याचे कर्तृत्वही केले.म्हणूनच या ज्येष्ठ कलाकाराच्या स्मृतींची जपणूक आवश्यक आहे.जेव्हा चित्रपटसृष्टी व रंगभूमीचे स्वरूप हळूहळू बदलू लागले तेव्हा बरीच कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी मुंबई-पुण्याकडे धावली, पण ते भालजी पेंढारकरांवर निष्ठा ठेवून कोल्हापुरातच राहिले

जयप्रभा स्टुडिओचा इतिहास लिहिला तर जयशंकर दानवे हे नाव अपरिहार्य आहे,इतकं त्यात त्यांचं योगदान आहे. ते भालजींचे फक्त वैचारिक सल्लागार नव्हते,तर कृतिशील सहकारी होते. दानवे म्हणजे भालजींचा उजवा हात. जयप्रभा स्टुडिओत शूटिंगच्या आधी नाटकासारख्या तालमी चालत. कॅमेऱ्यासमोर हातवारे कसे करायचे,आवाज कोणत्या टोनमध्ये ठेवायचे,किती पावलं चालायचे, चेहऱ्यावर हास्य कितपत ठेवायचे, अशा गोष्टी तालमीच्या वेळी ठरवत असत अन् त्याचा वापर शूटिंगच्या वेळी केला जात असे.त्यामुळे रिटेक होत नसत.भालजी दानवेंच्यावर सर्व जबाबदारी टाकून निश्चिंत असत.त्यांचा विश्वास होता की,शंकर जे सांगेल ते योग्यच असणार ! त्यामुळे बाबांच्या एवढीच त्यांची शिकविण्याची धास्ती सर्वांना वाटायची.भालजी कधी कधी अभिनय शिकविताना छडीचा वापर करत,पण दानवे शब्दांचे फटकारे देत.स्टुडिओत कोणताही नवा कलाकार आला की, प्रथम तो दानवेंच्या ताब्यात असायचा आणि भालजीबाबांसमोर उभा केला जात असे असा जयप्रभा स्टुडीओचा शिरस्ता होता.ते भालजींच्या सर्व चित्रपटात व्हिलनची कामेही अतिशय प्रभावीपणे करत.

‘संत कान्होपात्रा’ चित्रपटात दानवेंनी जेव्हा चिंतामणराव कोल्हटकरांच्या हस्तकाची म्हणजेच दुय्यम खलनायकाची भूमिका केली तेव्हाच त्यांच्यातला खलनायकी स्पार्क भालजींना जाणवला असणार.‘बहिर्जी नाईक’ मधला बाजी मोरे हा खलनायक एका पायाने अधू,लंगडत चालणारा. हा बाजी मोरे त्यांनी इतका अप्रतिम साकार केला की,आजपर्यंत रसिक त्याला विसरू शकले नाहीत.

भालजींच्या अनेक चित्रपटातील त्यांचे असंख्य खलनायक प्रेक्षकांच्या चिरस्मरणात राहिले. चित्रपटा इतकेच रंगभूमीवरही त्यांचे अतिशय प्रेम होते.त्यामुळे कोल्हापुरातच नवनवीन नाट्यसंस्थेच्या माध्यमातून ते कलाकार घडवित राहिले.त्यांनी जवळजवळ १३४ नाटके दिग्दर्शित केली आणि करवीर भगिनी मंडळ,देवल क्लब,करवीर नगर वाचन मंदिर,जीवन कल्याण,स.म.लोहिया
हायस्कूल,पद्माराजे गर्ल्स हायस्कूल अशा अनेक संस्थांचा नावलौकिक वाढविण्यास मदत केली होती.

कला, संस्कृती याविषयी आपण जेव्हा अभिमानानं बोलतो, त्या वेळी आपल्या हाती त्या वैभवशाली संस्कृतीचा काही भाग असला पाहिजे. तो काळाच्या ओघात वाहून जाऊन चालणार नाही. ही माहिती पुढे संक्रमित व्हायला हवी. त्यांच्या नाट्य दिग्दर्शनाबद्दल आजही बोलले जाते,परंतु एखाद्या कलाकाराच्या अभिनयावर वा दिग्दर्शनावर शेकडो बक्षिसांची बरसात होणारा तो काळ नव्हता. त्यामुळे खरं तर त्यांच्यासारखे असंख्य हिरे खाणीतच राहिले. त्यांना कोंदण मिळालेच नाही. एवढे कार्यकर्तृत्व असूनही ते प्रसिद्धीच्या झोतापासून दूरच राहिले.

अशा जुन्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकाराची स्मृती जतन करण्याचा, त्यांचे प्रेरक स्मरण करण्याचा प्रयत्न दानवे कुटुंबीयांच्या तर्फे दरवर्षी केला जातो.१ मार्च २०१० रोजी त्यांची कन्या जयश्री दानवे लिखित त्यांचा कलाप्रवास उलगडणाऱ्या ‘कलायात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या हस्ते संपन्न झाले होते. या कलायात्री चरित्रग्रंथास आजवर एकूण १० पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २५ वर्षे त्यांचे स्मरण केल्यानंतर १ मार्च, २०११ पासून ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ सुरू झाले. ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ.गिरीश ओक, भरत जाधव,अविनाश व ऐश्वर्या नारकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर यांना आजपर्यंत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

सध्या कोल्हापूर येथे जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार सोहळ्याची गणना कोल्हापुरातील मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात होत आहे. या क्षेत्राच्या जडणघडणीत नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली.

मूर्ती घडविल्यानंतर पूजा मूर्तीची होते.मूर्तिकाराची नाही.दिग्दर्शक म्हणून त्यांची अशीच अवस्था होती.अनेक कलाकार स्वहस्ते घडवले.त्यांना भले खासगी व शासकीय पुरस्कार न मिळोत, पण त्यांनी कलेची जी निरपेक्षपणे सेवा केली त्याचे ऋण सिने-नाट्य सृष्टीने कदापि विसरता कामा नये.

– जयश्री जयशंकर दानवे,कोल्हापूर.

ज्येष्ठ लेखिका

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया