समर्थ अभिनयाची बोलकी साक्ष
——
सध्या प्रत्येक क्षेत्रातच पुरस्कारांची आणि पारितोषिकांची रेलचेल आहे. अशा प्रोत्साहनाची कलाकाराला जरूरी असते. त्याचा आत्मविश्वास बळावण्यास निश्चित याची मदत होते. पण जुन्या काळी बिचाऱ्या कलावंतांना याचा मोहही नव्हता आणि पद्धतही नव्हती. समाजाकडून त्यांच्या कामाच्या पावत्या मिळत, पण त्या वेगळ्या प्रकारच्या असत.
तब्बल साठ वर्षे जयशंकर दानवेंनी अनेक हिंदी, उर्दू व मराठी चित्रपट आणि नाटकातील शेकडो जबरदस्त भूमिका स्वत:च्या समर्थ अभिनयाने अमर केल्या. या कला जीवनाच्या प्रवासात त्यांच्यावर गुदरलेल्या अनेक प्रसंगांतून त्यांच्या अभिनय नैपुण्याच्या, लोकांच्या प्रेमाच्या आणि आदराच्या, त्यांना अनेक पोचपावत्या मिळाल्या. कला,प्रेम आणि ध्येय या गोष्टी विजेसारख्या असतात. त्यांना स्पर्श करायला जाणाऱ्या शंभरांपैकी नव्व्याण्णव होरपळून जातात. एखादाच तिला पकडू शकतो. ती कला दानवेंना चांगलीच अवगत होती. त्यांनी कौशल्याने खलनायकाच्या भूमिका साकारल्या, पण प्रेक्षकांकडून त्याचे स्वागत झाले शिव्या-शाप इ. मार्गांनी! तो खलनायक साकारताना त्यांनी किती श्रम घेतले याचा तो पुरावा होता.
‘मीठभाकर’ चित्रपटातील ‘सुंदरराव सातपुते,’ ‘माझी आई’मधील ‘मिल मॅनेजर,’ ‘जावई माझा भला’मधील ‘जावई’, ‘बहिर्जी नाईक’मधील ‘बाजी मोरे’, ‘स्वराज्याचा शिलेदार’मधील ‘गहनाजी’, ‘महारथी कर्ण’मधील ‘शकुनी,’ ‘मोहित्यांची मंजुळा’मधील ‘चंद्रराव मोरे,’ ‘मराठा तितुका मेळवावा’मधील ‘चंद्रोजी खोपडे,’ ‘धनंजय’ चित्रपटातील ‘जिप्सी सरदार,’ ‘गावची इज्जत’मधील ‘दरोडेखोर पाटील,’ ‘धन्य ते संताजी धनाजी’ मधील ‘नागोजी माने,’ ‘सुभद्राहरण’ चित्रपटातील ‘शकुनी मामा’, ‘आंधळा मारतो डोळा’मधील ‘काका’ अशा अनेक कुटिल व्यक्तिरेखा चित्रपटात त्यांनी साकार केल्या. त्यासाठी त्यांना अनेक रसिकांचे शिव्याशाप लाभले. हे शिव्याशाप म्हणजे त्यांच्या समर्थ अभिनयाची बोलकी साक्ष होती. ही त्यांची मानपत्रे होती. याचा अर्थ त्यांच्या अभिनयात इतकी ताकद होती.ते नेहमी म्हणायचे, ‘मी चांगला आहे हो, पण हे दिग्दर्शक, लेखक मंडळी मला वाईट कृत्य करायला भाग पाडतात. मग सांगा, पडद्यावरील खरे बदमाष कोण? मी का माझे कर्ते-करविते लेखक अन् दिग्दर्शक?’. कारण निर्मात्यांना खात्री असे, त्यांचा खलनायक पाहायला आणि त्यांना शिव्याशाप द्यायला तरी थिएटरवर प्रेक्षकांच्या उड्या पडणारच.
सन १९४३च्या ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटातील ‘बाजी मोरे’ ही त्यांची भूमिका खूपच गाजली. बाजीचे पडद्यावर नुसते दर्शन झाले तरी लोकांचा थरकाप होत असे. डावी भुवई मोडून, उजवा डोळा बारीक करून, तोंडात शब्द चावत, विकट हास्य करण्याची ढब त्यांनी संपूर्ण चित्रपटात कायम ठेवली होती आणि इतका जबरदस्त खलनायक पेश केला होता की, रसिकांच्या मनात चीड निर्माण होत असे. खलनायकाचा खरा चेहरा या चित्रपटामुळे त्यांना मिळाला. ‘गडावर साप आले आहेत’ हे त्यांचे वाक्य इतके गाजले होते की, त्यांच्या त्या अभिनयाचा ठसा अद्याप लोकांच्या हृदयावर जाणवतो.
कलावंताला भूक असते की आपल्याप्रमाणेच कुणीतरी आपल्या अभिनयानं वेडं व्हावं. सन १९६१ला असाच एक प्रसंग घडला. मुंबईला सेंट्रल स्टुडिओत ‘माझी आई’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. हा कामगारांच्या जीवनावरील चित्रपट असल्याने मॉब सीनसाठी बरेचसे खरे कामगार आणले होते. दानवे होते मिलचे मॅनेजर. कामगारांच्या विरोधात हा मॅनेजर मालकाचे कान भरतो व कामगारांना हाकलून लावतो असा सीन होता. सीन ओके झाला आणि दानवे स्टुडिओबाहेर गाडीची वाट पाहात उभे राहिले. एवढ्यात कामगारांचा एक प्रचंड जमाव त्यांच्या दिशेने आला व घोषणा सुरू झाल्या. ‘ठोका याला, हाच तो मॅनेजर, यानेच मागण्या मान्य न करता आम्हाला हाकलून लावलं.’ कामगारांनी त्यांना घेराव घातला. त्यांचे संतप्त चेहरे पाहून दानवे मनातून खूप घाबरले. प्रसंग नाजूक होता. तेवढ्यात कामगारांचा पुढारी आला. त्याने कामगारांना समजावले की, ‘तुम्ही सिनेमात काम करायला आला होता ना? हे त्या सिनेमातले मॅनेजर आहेत. खरे मॅनेजर नाहीत. तुमचा आणि यांचा काहीही संबंध नाही. चला निघा इथून.’ हे सर्व पाहता त्या सीनचा टेंपो किती जबरदस्त असेल याचा अंदाज येतो.
सन १९६२च्या ‘जावई माझा भला’ या कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारीत चित्रपटात जावईच खलनायक व जावईच हिरो होता. साऱ्या गावाचे नुकसान करण्यासाठी टपलेल्या या जावयाला पाहून कितीतरी बिचाऱ्या जावयांना शिव्याशाप मिळाले असतील. महाराष्ट्रातील वृत्तपत्रकारांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आणि प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘कथानायक (जावई) नारोपंत उकिडवेच्या इरसाल भूमिकेत कोल्हापूरचे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांनी इतका इरसालपणा दाखविला आहे की, कोणत्याही थरातील प्रेक्षक त्यांची भूमिका पाहून करकचून दात खातो. दोन तास का असेना, पण त्यांच्या मनात कमालीचा उद्वेग निर्माण करतो. आपण सत्यसृष्टीत या जावयाला पाहात आहोत असा भास निर्माण होतो, पण तोच प्रेक्षक अव्वल दर्जाच्या या नटश्रेष्ठावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करीत निघून जातो. चित्रपटसृष्टीत ही इरसाल भूमिका करून श्री. दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे.’
सन १९७०च्या दिनकर द. पाटलांच्या ‘कोर्टाची पायरी’ या चित्रपटातील खलनायक सावकाराने तर सर्वांवर कळस चढविला. दानवेंनी तो खलनायक चीड आणणाऱ्या पद्धतीने साकार केला होता. त्या सावकाराला पोलिसांच्या हवाली करून चित्रपट संपविला होता. पण पुढे पंढरपूरला हा चित्रपट जेव्हा विठ्ठलचरणी प्रथम रुजू केला, तेव्हा प्रेक्षकांनी त्या सावकाराला तुरुंगात टाकलेले पाहण्याचा आग्रह धरला. चित्रपटाचा परमोच्च बिंदू अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक करण्याकरिता प्रेक्षकांच्या आग्रहासाठी पुन्हा शूटिंग घेऊन दानवेंना गजाआड जावे लागले. जनमानसावर त्यांच्या भूमिकेचा केवढा पगडा होता, प्रभाव होता याची साक्ष द्यायला हा किस्सा पुरेसा आहे.
जिथं चंद्र काचेचा आणि फुलं कागदाची असतात, अशा मुखवट्याच्या दुनियेत त्यांचा स्वाभाविक आणि प्रभावी अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांची देहबोली इतकी जबरदस्त होती की, अनेकदा संवादांची गरज भासत नसे. फक्त नजरेचा अभिनय पुरेसा असायचा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सन १९७३ साली ‘आंधळा मारतो डोळा’ या दादा कोंडके यांच्या सेटवर घडलेली घटना. या चित्रपटात दादा कोंडके आणि रजनी चव्हाण हे दोघे त्यांचे पुतण्या व पुतणी असतात. या दोघांचे काका (दानवे) त्यांची इस्टेट मिळविण्यासाठी सतत त्यांच्यावर कुरघोडी करत असतात. रजनी चव्हाण खिडकीतून काकांची वाट पाहात असते आणि काका दिसताच आपल्या भावाला (दादा कोंडकें) काका आल्याची खूण करते असा शॉट होता. शॉट सुरू होताच दानवेंनी खिडकीतून रजनीकडे पाहून असा काही भयानक लुक दिला की सेटवर रजनी जोरात किंचाळली. कट् कट् असा आवाज झाला. सर्व जण धावत तिच्याजवळ आले. तेव्हा ती इतकी घाबरली होती की दादांना तिने विनंती केली, या माणसाला पुन्हा माझ्याकडे पाहायला लावू नका, नाहीतर माझे पुढचे काम होणार नाही. सर्व जण सेटवर हसू लागले. तेव्हा दादा कोंडके त्यांना म्हणाले, ‘वा! दानवेसाहेब, नुसते डोळ्यांनी बोलून समोरच्या कलाकाराला तुम्ही घायाळ करू शकता. खरोखरच तुम्हाला अभिनयाची दैवी देणगी लाभली आहे.’ त्यांची उंचावलेली भुवई, भेदक नजर व चेहऱ्यावरचा भाव हा फक्त बघणाऱ्याचाच थरकाप उडवीत नसे तर दुय्यम नटाची त्यांच्या नजरेला नजर भिडली तरी त्या लोकांचा हमखास रिटेक होत असे.
चित्रपटापेक्षा नाटकातल्या पात्रांशी प्रेक्षक अधिक एकरूप होतात. कारण नाटकातील प्रसंग समोर प्रत्यक्ष साकार होत असतात. सोलापूरला ‘सत्त्वसाफल्य’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी असाच एक मजेशीर प्रसंग घडला. दानवे खलनायक होते. नायिकेच्या नवऱ्यावर खुनाचा खोटा आरोप करून, त्याला देशोधडीला लावून त्या नायिकेच्या मागे घराचे भाडे देण्यासाठी त्यांनी तगादा लावलेला असतो असा प्रसंग सुरू होता. नाटकभर त्या खलनायकामुळे नायिकेची स्थिती दयनीय झालेली असते. नाटक रंगात आले होते. तेव्हा वैयक्तिक सुख-दु:ख कोणाला राहिले नव्हते. रंगमंच आणि प्रेक्षक यांच्यात एक अतूट नातं निर्माण झालं होतं. तिथं साकार होत असलेला प्रसंग ही प्रत्येकाची व्यथा होती. त्यामुळे प्रेक्षकांतून एकजण अनाहूतपणे धावत स्टेजवर गेला आणि त्या खलनायकाच्या अंगावर खिशातल्या नोटा फेकत, दोन चार शिव्या देऊन म्हणाला, ‘हे घे तुझे भाड्याचे पैसे अन् चालता हो इथून.’ यावर कळस म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा त्या माणसाच्या या कृत्यावर हायसे वाटून टाळ्यांनी दुजोरा दिला. यावरून या खलनायकाने प्रेक्षकांना किती चीड आणली असेल याची कल्पना येते.
या सर्वांपेक्षा एकदा दानवेंच्या मूक अभिनयाला प्रत्यक्ष बाबूराव पेंटर यांनी जी दाद दिली, तो प्रसंग फारच महत्त्वपूर्ण वाटतो. ‘सावकारी पाश’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी एकदा गप्पा मारताना केशवराव दात्यांनी एक टूम काढली. एकाच विषयावर सर्वांनी अभिनय करून दाखवायचा. विषय होता एका कोट्यधीशाचे बँकेतले सर्व पैसे बुडाले. श्री. औंधकर यांनी ‘सावकारी पाश’मधलाच वेड लागलेल्या सावकाराचा अभिनय केला. श्री. दाते यांनी पैसे बुडाले म्हणून रडण्याचा अभिनय केला. कुणी हर्षवायू झालेला तर कुणी शॉकने मेल्याचा अभिनय केला. सर्व रथी-महारथींचा अभिनय झाल्यानंतर दानवेंनी बाबूराव पेंटर यांच्या परवानगीने काही वस्तू मागून घेतल्या. खुर्चीत ऐटीत सिगारेटचे झुरके घेत वर्तमानपत्र वाचत बसण्याचा अभिनय केला. एकाला वाक्य बोलायला सांगितले की, साहेब तुमचे बँकेतले पैसे बुडाले. हे वाक्य ऐकताच त्यांनी पटकन त्या माणसाकडे पाहिले. नंतर सावकाश वळून सिगारेट झाडली आणि धूर सोडीत पुन्हा वर्तमानपत्र वाचत बसले. बस्स! सर्वांनी टाळ्या वाजवल्या. काही लोकांना हा मूक अभिनय कळलाच नाही. तेव्हा दानवेंनी खुलासा केला, तुमचा विषय होता एका कोट्यधीशाचे बँकेतील पैसे बुडाले. पण कोट्यधीशाचे एका बँकेतले पैसे बुडाले तर काय नुकसान होणार आहे? म्हणून ती बातमी ऐकताच प्रथम त्यांनी चमकून पाहिले अन् नंतर सावकाश वळून सिगारेटची राख झटकली. याचा अर्थ मनात विचार केला की पैसे बुडाले तर बुडाले, दरियामें खसखस! आणि पुन्हा बेफिकिरीने सिगारेट ओढत वर्तमानपत्र पुढे ओढले. हे सर्व ऐकताच खुद्द बाबूराव पेंटरनी त्यांची पाठ थोपटली अन् म्हणाले, ‘वा! दानवे, तुम्ही सर्वांवर मात केली. मूक अभिनयातून खूप बोललात. याला म्हणतात जातिवंत कलाकार!’ बाबूराव पेंटरसारख्या दिग्गज दिग्दर्शकाने दिलेली त्यांच्या अभिनयाची पोचपावती त्यांना फार महत्त्वाची वाटली.
त्यांच्यातील खलनायकी अभिनयाचे इतके कौतुक झाले. कारण त्यांच्याकडे होता प्रचंड आत्मविश्वास. त्यांच्याकडे होता वास्तवतेचा स्वीकार. मातीत पाय रोवून उभं असणं, आभाळात कितीही भरारी मारली तरी जमीन न सुटणं ! अशा माणसांना शक्ती दोन्हीकडून मिळते, खुणावणाऱ्या आभाळाकडून अन् पायाखालच्या जमिनीकडून. फुललेल्या फुलांना आपला सुगंध जाहीर करण्यासाठी जाहिरात करावी लागत नाही. त्याचा सुगंधच त्याची ग्वाही दाही दिशांना देतो. त्याप्रमाणे दानवेंच्या चित्रपटातील खलनायकी प्रवृत्तीचे किस्सेच सांगतात त्यांचा अभिनय काय तोलामोलाचा होता! खलनायकाच्या भूमिकेला हिरोसारखी प्रसिद्धी मिळवून देणारा हा खलनायक.
– जयश्री जयशंकर दानवे
(कलायात्री : सौजन्य : अथर्व प्रकाशन,कोल्हापूर)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया