अतिथी कट्टा

दिनांक : २२-१२-२०२०

आनंदयात्री वसंतराव देसाई



विख्यात संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांचा २२ डिसेंबर १९७५ हा स्मृतीदिन. दिवंगत लेखक मधु पोतदार यांनी वसंत देसाई यांच्यावर ‘वसंतवीणा’ नावाचे एक पुस्तक लिहिले. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांनी प्रस्तावना लिहिली होती. त्या प्रस्तावनेचा हा संपादित भाग.

——

भारतीय चित्रपट आणि नाट्यसृष्टीत वसंतराव देसाई या नावाचे एक अलौकिक स्वरांचे किमयागार होऊन गेलेत. त्यांची आठवण होताच प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याचे, तेजस्वी स्नेहल डोळ्यांचे, भरदार अन् पिळदार देहयष्टीचे हातात मोगऱ्याचा गजरा बांधलेले एक सदाबहार व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. निरनिराळ्या सिनेगीतांना व नाट्यगीतांना तसेच महाकवी माडगूळकरांच्या राष्ट्रप्रेम आणि वीररसाने ओथंबलेल्या गीतांना त्यांनी दिलेल्या चाली कानांत घुमू लागतात आणि मग मनासमोर साकार होत जातो लक्षावधींच्या विराट मेळाव्यात ‘एक सूर एक ताला’त गायलेल्या समूहगीताद्वारे बालकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा स्वरसम्राट वसंतराव देसाई!

वसंतराव केवळ स्वरसम्राटच नव्हते तर संगीताच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची चिंगारी नसानसांतून प्रवाहीत करणारे एक देशसेवकही होते. संगीताच्या साहाय्याने अनेक कार्यक्रमांच्याद्वारे देशसेवा करणे ही त्यांची जीवननिष्ठा होती. अशा एका राष्ट्रभक्त कलाकाराची ही जीवनगाथा आहे. या चरित्राला प्रस्तावना लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर आली हे मी माझे भाग्य समजतो. या चरित्रात वसंतरावांच्या घराण्याच्या पूर्वइतिहासापासून त्यांनी केलेल्या संगीत साधनेचा, तसेच चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीच्या, संगीताच्या माध्यमातून केलेल्या अमूल्य सेवेचा, सविस्तर व मनोज्ञ आढावा घेतला आहे. चरित्रकार श्री. मधू पोतदार यांनी अविश्रांत धडपड करून चरित्र लेखनासाठी माहिती गोळा केली आणि त्या आधारे हे सुंदर चरित्र साकार केले. हे कौतुकास्पद आहे. वसंतरावांवरील त्यांच्या भक्तिभावामुळेच हे शक्य झाले आहे. चरित्र नायकाविषयीच्या त्यांच्या श्रद्धा, निष्ठा व उपलब्ध झालेली दुर्मिळ सामग्री यामुळे चरित्र वाचत असताना बऱ्याच ठिकाणी असे वाटून जाते, की जणू हा चरित्रकार, घटना घडत असताना चरित्र नायकाच्या सोबतच असावा.

मी महाराष्ट्राचा शिक्षण व सांस्कृतिक विभागाचा मंत्री असताना माझा व वसंतरावांचा परिचय झाला. अनेक कार्यक्रमानिमित्त त्यांच्या भेटीगाठी होत असत. ते, कविवर्य माडगूळकर, प्रकाशभाई मोहाडीकर व मी अनेकदा भेटत असू. बालकांच्या विकासाबद्दल चर्चा करीत असू. त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे या भेटीगाठीचे रूपांतर जीवाभावाच्या ऋणानुबंधात झाले. विशेषत: त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आखणीनिमित्त ज्यावेळेस आम्ही भेटायचो त्यावेळेस एक जाणवलं, की एकदा का वसंतरावांनी एखादी जबाबदारी स्वीकारली, की ती साऱ्या शक्तीनिशी पार पाडण्याचा, सर्वांगसुंदर करण्याचा ते प्रयत्न करीत. त्यामुळे आम्ही निर्धास्त असायचो कारण त्या कामाचा त्यांना रात्रंदिवस ध्यास लागायचा. त्यांचे त्या विषयाचे चिंतन, मनन, संकीर्तनच असायचे. त्या चिंतनात त्यांची समाधी लागायची अन् मग कार्यक्रम उत्कृष्ट व्हायचे.

महात्मा गांधी जन्मशताब्दीच्या काळात आम्ही कविवर्य माडगूळकरांकडून मोठ्या आग्रहाने अनेक गाणी लिहून घेतली. त्या गाण्यांना वसंतरावांनी समर्पक चाली दिल्या. महाराष्ट्राच्या शाळाशाळांतून, दऱ्याखोऱ्यांतून ती गीते एका सुरात एका तालात गाऊन घेतली गेलीत. आजही ठिकठिकाणी ती गायली जातात.

१९६५च्या पाकिस्तानच्या आक्रमणानंतर बालकांच्या मुखामुखात बसावे असे एखादे गीत लिहून द्यावे असा कविवर्यांकडे मी आग्रह धरला. दोन दिवसांनी ते आले आणि चतकोर पाठकोऱ्या कागदावर लिहिलेले एक गीत वाचून दाखवू लागले. वसंतराव देसाई, प्रकाशभाईदेखील त्या वेळी उपस्थित होते. गीत होते, ‘जय जवान जय किसान’. ते वाचून झाल्यानंतर मी म्हणालो, ‘हे गीत चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या साऱ्या बालकांच्या मुखातून एका सुरात एका तालात गायले जावे अशी माझी अपेक्षा आहे. चांद्याच्या मुलांची महाराष्ट्र बघायला निघालेली एखादी ट्रीप पुण्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी असेल आणि त्या वेळी बांद्याच्या मुलामुलींची दुसरी ट्रीप त्या प्लॅटफॉर्मच्या समोरच्या प्लॅटफार्मवर उभी असेल, अशा वेळी एका बाजूने या गीताचा सूर छेडला तर दुसऱ्या प्लॅटफार्मवरील मुलामुलींनी त्यांना त्याच तालासुरात साथ द्यावी आणि मग दोघांनी मिळून ते समूहगान गावे असे दृष्य बघायला मिळाले तर किती बहार येईल. सारा महाराष्ट्र एका सुरात एका तालात बांधला जाईल.’ हे ऐकले अन् वसंतराव गुणगुणले, ‘ठीक आहे.

चांद्यापासून बांद्यापर्यंत

एक सूर एक ताल

एक गाऊ विजय गान

जय जवान, जय किसान

जय जवान, जय किसान

जय जवान जय जय।।’

शब्द मिळाले, सूरही मिळाले अन् एक बहारदार गीत मोठ्या स्फूर्तिदायी चालीत साऱ्या महाराष्ट्राला मिळाले.

असेच एकदा गांधीशताब्दीच्या निमित्ताने गीतांची चर्चा करीत आम्ही सारे बसलो होतो. मी म्हणालो, “गांधीजींनी सेवकांसाठी एक फार प्रेरणादायी संदेश गद्यात लिहिला आहे. ‘हे नम्रता के सम्राट, दीन, भंगीकी हीन कुटिया के निवासी’ असे हे गद्य लिखाण आहे. ह्या गद्याला पद्यमय चालीत बसविता आले तर प्रत्येकाच्या मुखात ते बसू शकेल. वसंतरावजी, द्या ना एखादी सुंदर चाल. त्यांनी ते वाचले आणि म्हणाले, “कठीण आहे परंतु प्रयत्न करतो.’ दोन दिवसांनी ते आले आणि म्हणाले, ” बाळासाहेब, मी खूप प्रयत्न केला परंतु कुठल्याच मीटरमध्ये बसणे शक्य नाही. मला खेद वाटतो. मी म्हणालो, ‘स्वरांच्या सम्राटाला आमची मागणी आहे, की आजच्या कुठल्या एखाद्या मीटरमध्ये बसत नसले तर नवे ‘वसंत मीटर’ तयार करा, नाही म्हणू नका!” आणखी तीन दिवसांनी ते फैयाज, जयवंत कुलकर्णीसह आले. अन् एका नवीनच मीटरमध्ये बसविलेले ‘हे नम्रता के सम्राट’ हे महात्मा गांधींचे, सेवकांची प्रार्थना म्हणून लिहिलेले गद्य लिखाण सुरेल तालासुरात गाऊन दाखविले. आज साऱ्या महाराष्ट्रभर ते खूप लोकप्रिय झाले आहे हे सर्वश्रुत आहे. एका महामानवाला कवी बनविणारा संगीतकार वसंतराव देसाई, अशीही त्यांची एक ओळख देता येईल.

त्याच वेळी मी त्यांना सहज विचारले, “वसंतरावजी इतक्या सुंदर सुंदर चाली तुम्हाला सुचतात तरी कशा?” त्याबद्दल विस्ताराने बोलत असता त्यांनी ‘अमर भूपाळी’ची कहाणी सांगितली. ते सांगू लागले, ‘अमर भूपाळी हा चित्रपट काढायचा निर्णय शांतारामबापूंनी घेतला. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी स्वाभाविकच माझ्याकडे होती. मी अनेक गीतांना चाली दिल्यात. परंतु ‘घन:श्याम सुंदरा’ कसे स्वरबद्ध करायचे कळेच ना. चाली सुचत, पण समाधान होईना. म्हणून एके रात्री मी एकटाच स्मशानात होनाजींच्या समाधीजवळ जाऊन बसलो. खूप वेळ एकाग्र चित्ताने बसून प्रार्थना करीत होतो. अचानक कुठूनसे स्वर कानात घुमले आणि आजच्या स्वरूपातील ‘घन:श्याम सुंदरा श्रीधरा’ ही भूपाळी अवतरली. बऱ्याचदा काय घडतं, कसं घडतं हे कळतही नाही. उत्स्फूर्त होत असतं सारं!’

अशाच एका बैठकीत मला एक अपूर्व कल्पना सुचली. मी या मित्रांना म्हणालो, “या समूहगानातून आपण आपला सारा देश राष्ट्रप्रेमाच्या धाग्यात गुंफू शकणार नाही का? महाराष्ट्रापासून सुरुवात करू या! चांद्यापासून बांद्यापर्यंत एक सूर एक ताल असा एखादा समूहगानाचा संच तयार करता येईल. महाराष्ट्रातील शाळेत असलेल्या संगीत शिक्षकांना आणि इतर गायकांनादेखील समुहगानाचे प्रशिक्षण देऊन हा कार्यक्रम आपल्याला राबविता येईल. वसंतरावजी, घ्या ना ही जबाबदारी.” एका क्षणात वसंतराव म्हणाले, “मी घेतो ही आपण जबाबदारी. बालकांच्या सहवासापेक्षा, त्यांच्या विकासापेक्षा आनंददायी ते काय असेल? शिवाय माझ्या आवडत्या साने गुरुजींना आणि महाराष्ट्राला मी दिलेली ही छोटीशी भेटच असेल. सोपवा हे काम माझ्याकडे!” मी म्हणालो, आपल्यासारखा थोर संगीतकार आम्हाला मिळत असेल तर आम्ही ‘महाराष्ट्राचे संगीत दिग्दर्शक असे एखादे पदच निर्माण करू.” त्यांनी जबाबदारी घेतली. महाराष्ट्र संगीत दिग्दर्शक हे मानद पदही निर्माण झाले. वसंतरावांनी फैयाज, प्रमिला दातार, जयवंत कुलकर्णी, जयस्वाल, सोमनाथ परब, बाळ देशपांडे या आपल्या गायक चमूसह महाराष्ट्रभर संगीत शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी दौरे काढीत, मेळावे भरविले. महाराष्ट्रात एका सुरात एका तालात काही अर्थपूर्ण सुंदर गीतांचे समूहगान करुन घेतले. या प्रसंगी ते बालकांशी एकरूप होऊन जात. वसंतरावांनी महाराष्ट्राला ही मोठी देणगी दिली. स्वत: वसंतरावांनी या मोबदल्यात एक पैसाही घेतला नाही. अशाच एका प्रसंगाची आठवण होते. मी प्राथमिक शाळेत असताना क्रमिक पुस्तकातील कविता भसाड्या आवाजात वाचून व गाऊन दाखविल्या जात आणि शिकविल्या जात. मला कवितांना चाली लावण्याची आवड होती. आमच्या गुरुजींनी मला क्रमिक पुस्तकातील काही कवितांना चाली बसविण्यास सांगितले. मी माझ्या कुवतीप्रमाणे चाली बसविल्या आणि आम्ही वर्गात कविता गाऊ लागलो. त्यामुळे कविता पटकन तोंडात बसत व आनंदी वातावरण निर्माण होई. हा माझा बालपणीचा अनुभव लक्षात घेऊन मी एकदा वसंतरावांना म्हणालो, “आपण प्राथमिक कक्षेच्या क्रमिक पुस्तकांतील कवितांना चाली बसवू शकाल का? तसे झाले तर प्राथमिक शाळातील शिक्षकांना तालासुरात कविता शिकविण्याची व्यवस्था शासनामार्फत करता येईल. पुढे ते शिक्षक आपल्या वर्गातील मुलांना तालासुरात कविता शिकवू शकतील. साऱ्या महाराष्ट्रभर शाळांतून हा प्रयत्न यशस्वी झाला तर प्राथमिक शाळांतून लहानपणापासूनच एक सूर एक तालाचा उपक्रम महाराष्ट्रभर एक वेगळेच वातावरण निर्माण करेल.”

वसंतरावांना ही कल्पना खूपच आवडली. त्यांनी लगेच क्रमिक पुस्तकातील कवितांना सुरेल चाली बसविण्याचे कार्य हाती घेतले. शिक्षकांची शिबिरे घेऊन तालासुरात कविता गायनाचे उपक्रम सुरू झाले. वसंतरावांची ही आमच्या बालकांसाठी केवढी मोठी देणगी! हा उपक्रम पुढे त्याच स्फूर्तीने व उत्साहाने पुढे चालविला गेला नाही हे दुर्दैव.

सहज एका प्रसंगाची आठवण झाली. वसंतरावांच्या निधनानंतर ‘एक सूर एक ताल’ हा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्र संगीत दिग्दर्शक या पदावर सी. रामचंद्र यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली. त्यांनी एकदा ब्रेबॉर्न स्टेडियमवर बालकांचा मेळावा घेऊन समूहगानाचा एक कार्यक्रम आयोजित केला. मुख्यमंत्री व मी त्या वेळी उपस्थित होतो. कार्यक्रम आटोपला परंतु सी. रामचंद्र अगदी काकुळतीला येऊन म्हणाले, “माझ्याकडे नका ठेवू बालकांना, हसतखेळत, रिझवत त्यांच्याकडून एका सुरात एका तालात गाऊन घ्यायचे महाकठीण काम आहे ! वसंतरावच हे करू जाणे!”

वसंतराव मुलांना गीत शिकवायचे. तालासुरात गायला सांगायचे. कुठे चुकले तरी ‘वाऽ क्या बात है। बहोत अच्छा। फिरसे गाओ’ असे उत्तेजन देत देत गाणे सुरेल होईपर्यंत मुलांना गात ठेवायचे. मुले आनंदाने बेहोष होऊन गायची अशी होती त्यांची किमया! त्यांच्या साऱ्या स्मृतींनी मन भारावून जाते. त्यांचा सहवास एक सुंदर मैफील असायची. त्या भरल्या मैफिलीतून काळाने त्यांना अचानक उचलून नेले. त्यांचा दारुण अंत आठवतो आणि आजही मन शहारून जाते. विधात्याने या आनंदयात्रीची आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची इतकी क्रूर चेष्टा का करावी? हा प्रश्न अनुत्तरीच राहतो.

वसंतरावांनी शेवटी शेवटी ‘एक सूर एक ताल’ या उपक्रमाचा ध्यासच घेतला होता. त्यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या आत्म्याला साक्षी ठेवून ‘वसंत स्वर प्रतिष्ठान’ची स्थापना केली गेली. त्या प्रतिष्ठानच्या वतीने अनेक संगीतमय कार्यक्रम करून त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु अद्यापही त्याला म्हणावे तसे स्वरूप देता आले नाही याचे दु:ख आहे. त्यांचे चरित्र लिहावे असा एक संकल्प होता. कविवर्य ग. दि. माडगूळकर आणि राजाभाऊ मंगळवेढेकर ते चरित्र लिहिणार होते. काही अपरिहार्य कारणामुळे ते होऊ शकले नाही. परंतु पुण्याचे श्री. मधू पोतदार यांनी उत्स्फूर्तपणे ही जबाबदारी घेतली आणि पार पाडली, यासाठी वसंत स्वर प्रतिष्ठानचे आम्ही सारे कार्यकर्ते त्यांचे ऋणी आहोत. मंजुल प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेने अत्यंत सुबक छपाई व आकर्षक सजावट करून ग्रंथ प्रकाशित केला याबद्दल त्यांनाही धन्यवाद.

– श्री. मधुकरराव चौधरी

(सौजन्य – मंजुल प्रकाशन)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया