अमर कलात्मक ‘ चित्रपती ’
——
भारतीय चित्रपटसृष्टी ज्यांच्या कर्तृत्वावर उभी राहिली त्यातले प्रमुख होते व्ही.शांताराम. भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह. सिनेक्षेत्रात अगदी सुरुवातीपासून विस्मयचकित प्रयोग करणारे
संवेदनशील निर्माता,दिग्दर्शक व अभिनेतेही होते.सामाजिकदृष्ट्या अर्थपूर्ण विषय हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य होते.प्रचंड मोठे प्रतीकात्मक दृश्य हा शांतारामबापूंचा अट्टाहास असायचा.
सगळ्या संकल्पांचे आभास ते स्टुडीओत उभे करायचे.फार कमी वेळा ते स्टुडीओच्या बाहेर गेले असतील.त्यामुळेच त्यांच्या सर्व चित्रकृती अमर कलात्मक ठरल्या आणि त्यातून सुप्रसिद्ध ‘शांताराम
टच’ चा एक स्वतंत्र ठसा स्वतंत्रपणे दिसून आला.
शांतारामबापूंचा जन्म कोल्हापूर येथे १८ नोव्हेंबर १९०१ मध्ये झाला.त्यांनी लहान वयातच म्हणजे १९१४-१५ साली गंधर्व नाटक कंपनीत प्रवेश मिळविला.त्यानंतर महाराष्ट्र फिल्म कंपनीत
प्रवेश करून त्यांनी पौराणिक मूकपट ‘सुरेखा हरण’ मध्ये कृष्णाची भूमिका करून अभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावर प्रथम पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते बाबुराव पेंटर. फिल्म कंपनीत
हरकाम्या म्हणून कुली कामगारापासून कंपनीच्या निरनिराळ्या खात्यात त्यांनी भरपूर कष्ट उपसले. स्वत: तोंडाला रंग लावला तेव्हा त्यांचे मावसभाऊ बाबुराव पेंढारकरांनी त्यांचे शांताराम वणकुद्रे हे
मूळ नाव बदलून व्ही.शांताराम असं ‘बारसं’ केलं.हे नाव त्यांना चांगलंच लाभलं.त्यांचं भाग्यचक्र बदललं.त्यानंतर इथेच त्यांनी ‘सिंहगड,श्रीकृष्णावतार,सती पद्मिनी,शहाला शह,सावकारी पाश,राणा
हमीर,माया बाजार,गजगौरी,भक्त प्रल्हाद,मुरलीवाला,सती सावित्री,महारथी कर्ण,बाजीप्रभू देशपांडे’ असे अनेक ऐतिहासिक व पौराणिक चित्रपट अभिनेता म्हणून गाजवले.
१९२७ मध्ये ‘नेताजी पालकर’ या ऐतिहासिक मूकपटाचे दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रथम दिग्दर्शन केले.त्यावेळी ते केवळ २६ वर्षांचे होते.३० एप्रिल १९२९ ला त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी सोडली.
प्रभात फिल्म कंपनीचा १ जून,१९२९ रोजी कोल्हापूर येथे जन्म झाला.महाराष्ट्र फिल्म कंपनीतील त्यांचे सहकारी केशवराव धायबर,विष्णुपंत दामले,शेख फत्तेलाल असे तंत्रज्ञ,कलावंत आणि
भांडवलासाठी कोल्हापूरचे सीताराम कुलकर्णी व स्वत: व्ही.शांताराम अशा पाच जणांनी एकत्र येऊन ही संस्था सुरु केली.पुढे या संस्थेने भारतीय चित्रपटाचे सुवर्णयुग निर्माण केले.मुकपटांच्या जमान्यात प्रभात कंपनीने पहिला मूक चित्रपट ‘गोपालकृष्ण’ निर्माण करून सर्वांचा आत्मविश्वास वाढवला. प्रभातने १९२९ ते १९३२ या सहा वर्षात ‘खूनी खंजर,रानी साहिबा,उदयकाल,जुलूम,चंद्रसेना’ असे चित्रपट निर्माण केले.
१९३० साली व्ही.शांताराम-दामले-फत्तेलाल यांच्या प्रभात फिल्म कंपनीने ‘स्वराज्याचे तोरण’ हा चित्रपट काढला त्यावेळची ही गोष्ट…..त्यावेळी ब्रिटीशांची सत्ता होती.इंग्रज सरकार ‘स्वराज्य’ या
शब्दावर फार हळवं होतं.प्रभात स्टुडीओ कोल्हापूरातच होता.पण सेन्सॉर बोर्ड मुंबईत होते.सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष इंग्रज होते.इतर सदस्य भारतीय असून काय उपयोग? ‘ The picture is ban’ असा निर्णय दिला गेला.शांतारामबापू मटकन खाली बसले. ‘स्वराज्याचे तोरण’ या नावावरच त्यांचा आक्षेप होता.तसेच शिवाजी महाराज झेंडावंदन करतात हा सीन आणि काही वाक्ये कापावीत तरच
चित्रपट प्रदर्शित करता येईल हे ऐकल्यावर बापू संतापले.अशी कापाकापी करून चित्रपट दाखविण्यात काय अर्थ आहे? आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा हा चित्रपट दाखवू अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती.परंतु त्यांचे सहकारी म्हणाले, ‘चित्रपटाचे नाव बदलले म्हणून कथेमध्ये थोडाच फरक पडणार आहे ?.शिवाजी हा शिवाजीच राहणार आहे.झेंडावंदन सीन कापला तरी शिवाजीने तोरणगड जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली हे लोकांना समजणारच आहे.’ मग नाव बदलण्याची अट मान्य करून या स्वराज्य तोरण चे नाव उदयकाल असे ठेवण्यात आले आणि चित्रपट प्रदर्शित
झाला. ‘उदयकाल’ मध्ये बापूंनी शिवाजी राजाची भूमिका केली होती.
६ मार्च १९३२ साली प्रभात कंपनीचा पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ तयार झाला.हा चित्रपट पौराणिक असून मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत तयार झाला.या चित्रपटाला दिग्दर्शन
शांतारामबापूंचे होते.यावरून लक्षात येते की,चित्रपट क्षेत्राच्या इतिहासाचे पहिले पान शांतारामबापूंनी लिहिले होते.रंगीत चित्रपटाच्या लाटेत त्यांनी १९३३ साली ‘सैरंध्री’ हा चित्रपट
तयार केला.चित्रपट निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाची,सिनेयंत्राची माहिती घेण्यासाठी ते जर्मनीला जाऊन आले.या जर्मनी भेटीत त्यांनी येताना झूम लेन्स आणली आणि १९३४ च्या ‘अमृत मंथन’ या
मराठी/हिंदी चित्रपटासाठी त्याचा यशस्वी प्रयोगही केला.यानंतर बापूंनी तब्बल दहा वर्षे प्रभात कंपनीसाठी काम केले.यात ‘जंबूकाका’ हा भारताचा पहिला व्यंगपट (कार्टून),प्रभातचे प्रभातनगर
या लघुपटाची निर्मिती आणि अनेक चित्रपट निर्माण केले.१९३५ च्या ‘धर्मात्मा’ या संतपटात बालगंधर्व होते. ‘रजपूत रमणी,अमरज्योती आणि संत तुकाराम’ हे १९३६ चे चित्रपट गाजले. ‘संत
तुकाराम’ हा चित्रपट जगातील तीन चित्रपटातील एक उल्लेखनीय चित्रपट मानतात.
प्रभातची तुतारी खऱ्या अर्थाने निनादली ती १९३७ च्या ‘कुंकू’ या मराठी आणि ‘दुनिया न माने’ या हिंदी सामाजिक चित्रपटामुळे.एकीकडे पौराणिक चित्रपट बनवीत असतानाच शांताराम बापूंनी
अनेक उत्तमोत्तम सामाजिक चित्रपटांची निर्मिती केली.जरठ विवाहावर टीका करणारा ‘कुंकू/दुनिया ना माने’,वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा ‘माणूस/आदमी’,मुस्लिम आणि हिंदू दंग्याच्या
पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा ‘शेजारी/पडोसी’.असे मराठी/हिंदी चित्रपट अफाट गाजले. १९३९ ते १९४२ पर्यंत ‘संत सखू’ हा संतपट,‘रामशास्त्री’ हा ऐतिहासिक चित्रपट,‘संत ज्ञानेश्वर’ हा
संतपट,‘उमर खय्याम’ हा हिंदीतील चरित्रपट असे चित्रपट त्यांनी निर्माण केले.
शांतारामबापूंनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन १० सप्टेंबर १९४३ ला ‘राजकमल कला मंदिर’ या स्वत:च्या संस्थेची स्थापना केली.चित्रपट कॅमेऱ्याची भाषा
बोलतो हे वास्तव ओळखणाऱ्या या दिग्दर्शकाने व्यावहारिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून मराठी मराठी बरोबर हिंदी भाषेतही चित्रपट निर्माण करण्याचे हुशार धोरण ठेवले.प्रभातच्या बोध चिन्हात
प्रभातदेवी तुतारी वाजवून सूर्याच्या आगमनाची ललकारी देत असे.आता राजकमलच्या बोध चिन्हात शांत जलाशयात सूर्यमुखी कमळामध्ये प्रभातदेवी उभी राहून भरल्या ओंजळीने उगवत्या सूर्याला
फुलाचं अर्ध्य देत आहे असे नियोजन बापूंनी केले.आपल्या वडिलांचे नाव ‘राजाराम’ मधील राज आणि आईचे नाव ‘कमल’ हे जोडून त्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी बांधलेल्या बंगल्याचं नाव ‘राजकमल’ ठेवलं होतं.तसेच कलासाधनेचे पवित्र स्थान म्हणून कलामंदिर.अशा दोन शब्दांची सांगड घालून त्यांनी ‘राजकमल कलामंदिर’ असा फुलामाळांनी सजवलेला भव्य फलक कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नवीन संस्थेच्या बाहेर लावला. राजकमलच्या बोध चिन्हावर प्रातकाळच्या रागाची स्वरावली घालून पावित्र्याची मांगल्याची भावना निर्माण करणारा घंटानाद,पार्श्वध्वनी म्हणून वापरला गेला.या
घंटानादासाठी निरनिराळ्या स्वरांच्या लहान मोठ्या आकारांच्या घंटा बनवून घेतल्या आणि जेव्हा या पार्श्वसंगीताचं ध्वनिमुद्रण बोधचिन्हा बरोबर प्रेक्षकांनी ऐकलं व पाहिलं तेव्हा प्रेक्षकांचा गळा
दाटून आला. या ‘राजकमल’ च्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली.कालांतराने ‘राजकमल’ हा एक मुंबई मधील आधुनिक स्टुडीओ म्हणून ओळखला जाऊ लागला.
‘राजकमल’मध्ये १९४३ साली पहिला चित्रपट निर्माण केला तो म्हणजे ‘शकुंतला’.६ मार्च १९४६ साली डॉ.कोटणीसांच्या जीवनांवर आधारित ‘डॉ.कोटणीस की अमर कहानी’ या
चित्रपटांमध्ये बापूनी स्वत: नायकाची भूमिका केली होती.१९५० सालचा ‘दहेज’ हा सामाजिक हिंदी चित्रपट त्यावेळच्या हुंडा पद्धतीवर प्रहार करणारा होता.१९५१ सालचा होनाजी बाळा हा
शाहिराच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘अमर भूपाळी’ बांगला भाषेतसुद्धा डब केला गेला. त्यानंतरचे ‘परछाई,तीन बत्ती चार रास्ता,सुबह का तारा,सुरंग’ हे सामाजिक हिंदी चित्रपट
राजकमलने निर्माण केले.उत्तम नृत्ये असलेला १९५५ सालचा रंगीत ‘झनक झनक पायल बाजे’ चित्रपट हा राजकमलचा पहिला रंगीत चित्रपट होता. हा चित्रपट मेट्रो सिनेमात ११ आठवडे,ऑपेरा हाऊस मध्ये ८० आठवडे आणि लिबर्टीत ११ आठवडे चालला. मुंबईला शिवाजी पार्क मैदानात बापूंचा मोठा सत्कार होऊन साहित्यकार आचार्य अत्रेनी त्यांना ‘चित्रपती’ पदवी बहाल केली.या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट,दिग्दर्शन,कला दिग्दर्शन,संगीत,ध्वनी लेखन,संकलन यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळून उत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून राष्ट्रपती पदकही
मिळाले. कैद्यांना प्रेमाने वागविण्याचा संदेश देणारा ‘दो आँखे बारह हाथ’ हा चित्रपट २७ सप्टेंबर १९५७ ला प्रदर्शित झाला.एका कवीच्या मनोराज्याचा वेध घेणारा १९५९चा ‘नवरंग’ हा चित्रपट ९
ऑक्टोबरला प्रदर्शित झाला.हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला.२४ डिसेंबर १९६१चा ‘स्त्री’ हा पौराणिक हिंदी चित्रपट खूप गाजला.यात प्रमुख भूमिकेमध्ये संध्या आणि स्वत: व्ही.शांताराम
होते.मार्च १९६३ ला ‘सेहरा’ हा सामाजिक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला.त्यानंतर राजकमलचा अत्यंत गाजलेला सामाजिक हिंदी चित्रपट म्हणजे ‘गीत गाया पत्थरोने’.मुंबईच्या लिबर्टी सिनेमागृहात
२५ आठवडे चालला.त्याला राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला.
‘बुंद जो बन गई मोती’ हा सामाजिक हिंदी चित्रपट २६ जानेवारी १९६८ चा.‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हा सामाजिक हिंदी चित्रपट २७ जानेवारी १९७१ चा.‘पिंजरा’ या १९७२च्या
मराठी चित्रपटाने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. ‘पिंजरा’ मराठीतला पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता.त्यानंतर ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी,झुंज,चानी,असला नवरा नको ग बाई’ असे
अनेक सामाजिक मराठी चित्रपट व्ही.शांताराम यांच्या दिग्दर्शनातून पाहायला मिळाले.१९८३ चा ‘झंझार’ हा सामाजिक हिंदी चित्रपट बापूंचा शेवटचा चित्रपट होता.जवळपास ४५ चित्रपटांचे
दिग्दर्शन केलेल्या शांतारामबापूंची दिग्दर्शनाची एक पद्धत होती. चित्रपट हे कलेचं आणि मनोरंजनाचं माध्यम तर आहेच, पण यातून समाजाला योग्य तो संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले
होते.८९ वर्षांच्या आयुष्यात ६५ वर्षे चित्रपटाच्या ध्यासाने पछाडलेल्या व्ही.शांताराम यांचे आयुष्य म्हणजे ध्यासपर्वच होते.
भारत व महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शांतारामबापूंच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो.तसेच व्ही.शांताराम मोशन पिक्चर सायंटीफिक रिसर्च एंड कल्चरल फौंडेशन हे १९९३ मध्ये स्थापन करण्यात आले.त्यांच्यातर्फे चित्रपट निर्माण करणाऱ्यांना विविध पुरस्कार देण्यात येतात.हे पुरस्कार दरवर्षी १८ नोव्हेंबरला म्हणजेच बापूंच्या जन्मदिनी देण्यात येतात.भारतीय डाकघर यांच्या तर्फे सन्मानार्थ बापूंवर १७ नोव्हेंबर २००१ मध्ये पोष्टाचे तिकीट काढण्यात आले होते.‘ शांताराम ’ हे त्यांचं आत्मवृत्त मराठी आणि हिंदीमध्ये १९८६ साली प्रकाशित झालं आहे.त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.‘राजकमल कलामंदिर’ चे सर्वेसर्वा व्ही.शांताराम हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवलेलं नाव.चित्रपट महर्षी व मराठी चित्रपटसृष्टीचा सम्राट.
शून्यापासून सुरुवात करून ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ सर्वतोपरी कलात्मक योगदान देणारा हा थोर कलावंत ३० ऑक्टोबर १९९० साली वयाच्या ८९ व्या वर्षी अनंतात विलीन झालं.
‘व्ही.शांतारामके फिल्मोंकी सबसे बडी विशेषता यह थी की उनमें जीवनकी यथार्थ अनुभूतियां कॅमेरे की सूक्ष्म भाषा के साथ अभिव्यक्त होती थी l उनकी फिल्में दिल और दिमाग को छूकर, आंखो को सजल करके, मनको स्पंदित करके, सोचनेपर विवश करती थी l इसलिए उनकी फिल्में यादगार बनी l सत्यम शिवम सुन्दरम इन तीन शाश्वत मूल्योंका जिनपर प्रभाव था ऐसे व्ही.शांताराम के चित्रपटव्यवसाय के सत्तर वर्षोंका जीवनपट सचमुच एक देदीप्यमान इतिहास है l ’
– जयश्री दानवे
(सौजन्य – अथर्व प्रकाशन, कोल्हापूर)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया