अतिथी कट्टा

दिनांक : ०३-०९-२०२३

“कलायात्रीच्या कलायात्रेतील प्रवासी”


जीवन एक रंगभूमी………… पडदा उघडतो, सुख-दु:खाचा, ऊन-सावल्यांचा खेळ………
अभिनयाचा मेळ, आयुष्यभर… अथक…….

सिने-नाट्यसृष्टीशी साठ वर्षे निगडित असणाऱ्या नटश्रेष्ठ जयशंकर दानवेंच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर बरीच कलंदर माणसं भेटली. त्यांच्याशी त्यांचे धागे जुळले. त्यांच्या मनावर त्या माणसांची अमीट छाप पडली. मौल्यवान वस्तू बँकेत ठेवण्यासाठी जसा सेफ डिपॉडिट व्हॉल्ट असतो त्याप्रमाणे आपल्या मनाच्या कप्प्यात त्यांनी आपल्याला भेटलेल्या माणसांच्या जरतारी आठवणी ठेवून दिल्या. जीवनाच्या वाटचालीत त्यांच्या सर्व सुंदर आठवणींची दुलई त्यांनी जपून ठेवली होती.


——–

अनेक क्षेत्रं प्रगल्भ करणारी डोंगराएवढी सर्जनशील माणसं त्यांच्या सहवासात आली. त्यांनी दानवेंना जीवनाकडे बघण्याचा आवाका दिला. नकळत्या वयात श्री. दत्तो वामन पोतदारांसारखे
गुरुजी त्यांना लाभले. आर्य सुबोध कंपनीत श्री. रुस्तुमजी मोदींसारखे संस्थाचालक लाभले. बेंजामिनसाहेब व चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांसारखे गुरू लाभले.आयुष्यात त्यांना अध्यात्मातील मान्यवर अशा गाडगेबाबांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. बनारसला असताना काशी विश्वेश्वराने स्वप्नात दर्शन दिले. सिद्धारूढ स्वामींनी स्वत: त्यांना घास भरविला. शेगांवच्या गजानन महाराजांचे त्यांना कृपाछत्र लाभले.

कोल्हापूरचे सर्वेसर्वा शाहू महाराजांनी त्यांचे नाटक पाहून प्रशंसोदगार काढले. कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोनच्या अक्कासाहेब महाराजांनी त्यांचे कौतुक केले. बालगंधर्वांसारख्या पृथ्वीलोकच्या गंधर्वांच्या तोंडून त्यांना प्रशस्तीपत्र मिळालं.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिकारी देशभक्तांनी त्यांना शाबासकी दिली, हस्तांदोलन केले. सावरकरांच्या हाताचा स्पर्श त्यांनी अनुभवला. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज,पु. ल. देशपांडे,सुधीर फडके,भालचंद्र पेंढारकर,आत्माराम भेंडे,बबन प्रभू,काशिनाथ घाणेकर,त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील अशा मान्यवरांनी त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके पाहून त्यांना प्रशस्तीपत्रे दिली. बाबूराव पेंटर,नानासाहेब सरपोतदार, चंदूलाल शाह,वसंत जोगळेकर,दिनकर द. पाटील,विश्राम बेडेकर,राजा परांजपे,राजा ठाकूर,अनंत माने,दादा तोरणे,कृष्णा पाटील,प्रभाकर पेंढारकर,दादा कोंडके,राम देवताळे अशा दिग्गज निर्माते – दिग्दर्शक यांच्या चित्रपटातील त्यांचा खलनायक गाजला. कलाकार म्हणून अनेक कलाकारांच्या पडद्यावरील व रंगमंचावरील कारकीर्दीस ते कारणीभूत ठरले. नंतर हे कलाकार किर्तीच्या शिखरावर विराजमान झालेले त्यांनी पाहिले. कलावंतांना पैलू पाडणारे ते गुरू होते. राज कपूर, सोहराब मोदी,सुलोचना,रमेश देव,चंद्रकांत मांडरे,सुर्यकांत मांडरे,विक्रम गोखले,जयश्री गडकर, पद्मा चव्हाण,उमा भेंडे,शांता जोग अशा दिग्गजांना प्रथम त्यांनी संधी दिली आणि नंतर हे कलाकार सर्वश्रुत झाले.चालणं अशक्य झालं तरी घरात बसून नाटकांचे दिग्दर्शन केले.उषा नाईक, पूजा पवार यांना घरी बोलावून दिग्दर्शन केले. हे व्रत त्यांनी ७५ वर्षांपर्यंत निभावले.

पृथ्वीराज कपूर,नाना पळशीकर,डेव्हिड,मोतीलाल,भगवान,याकूब,अल्लाउद्दीन,गजानन जहागीरदार,धुमाळ,आगा,जयराज,विजू खोटे,रुबी मायर्स ऊर्फलोचना,खुर्शीद,जुबेदा,मनोरमा, अमिनाबाई,रत्ना यांसारख्या हिंदी कलाकारांसमवेत त्यांचा अभिनय फुलला.सौ. लीला पेंढारकर, स्नेहप्रभा प्रधान,सरोज बोरकर,विमल कर्नाटकी,माई भिडे,उषा मंत्री,उषा किरण,गोहराबाई,कुसुम देशपांडे,दुर्गा खोटे,वनमाला,जयश्री शांताराम,शांता हुबळीकर,गुलाब कोरगावकर,हंसा वाडकर, बेबी शकुंतला,सुषमा शिरोमणी,राधा बारटक्के,सुमती गुप्ते,अनुपमा,सुहासिनी देशपांडे,विजया धनेश्वर,मेघमाला विभूते,बेबी आचरेकर,शीला नाईक,शांता तांबे या स्त्री कलाकारांपैकी काहींना दिग्दर्शन केलं तर काही त्यांच्या सहकलाकार होत्या.गायक बालकराम,पंडितराव नगरकर,दिनकर कामण्णा,बर्चीबहाद्दर,वसंत लाटकर,वसंत शिंदे,मास्टर विनायक, गणपतराव बोडस,नानासाहेब फाटक,केशवराव दाते,झुंझारराव पवार,दिनकर,वसंत ठेंगडी,विष्णुपंत औंधकर,राजा पटवर्धन, भीमराव काळे,शंकराराव सरनाईक,सुरेश बाबू,राजा गोसावी,दामुअण्णा मालवणकर,दादा साळवी, नटवर्य मामा पेंडसे,अरुण सरनाईक,महेश कोठारे, राजा नेने,भालचंद्र कुलकर्णी,गुलाब मोकाशी या कलाकारांना सिनेमात वा नाटकात दिग्दर्शन केले तर काही कलाकारांसोबत अभिनयही केला.

ग. दि. माडगूळकर,आत्माराम भेंडे,वसंत देसाई,वसंत पवार,राम कदम,दत्ता डावजेकर तसेच विद्याधर गोखले यांचा सहवास त्यांना प्रगल्भ करून गेला.लता मंगेशकर,आचार्य अत्रे,गोविंदराव टेंबे,पंडित बेताबजी,पंडित आनंदकुमार व शिवकुमार,सुभाष भुरके,आय. बारगीर,राजेश मुजुमदार, बाळ कुरतडकर,नटवर्य मामा पेंडसे,वाय. जी. भोसले,मधू भोसले,चारुदत्त सरपोतदार,विश्वास सरपोतदार,मो. ग. रांगणेकर, विजय तेंडुलकर यांच्याशी त्यांचे अनाम भावबंध निर्माण झाले.

अनेक कलाकारांच्या आठवणींचे तुषार त्यांच्या मनाने झेलले आणि त्याचे थेंब त्यांच्या हृदयातून घरंगळले.त्यांच्या आठवणींच्या खणातील काही प्रसंग,माणसं,शब्दांच्या मोत्यात गुंफण्याचा प्रयत्न केला,एक चतुरस्र नट,नाटककार,नाट्य-सिने दिग्दर्शक,खलनायक अशी विविध पैलूंनी त्यांनी आपली कलायात्रा संपन्न केली. या थोर कलावंताचं सिने-नाट्यजीवन हा एक इतिहास संशोधनाचा विषय आहे.


‘ दिव्यत्वाकडे आम्हास नेतो, या कल्पतरूचा साक्षात्कार,

स्मरून तुमच्या दिव्य स्मृतीला, करितो वंदन त्रिवार ….’

– जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

ज्येष्ठ लेखिका, एम.ए.

चित्र-नाट्यअभ्यासक

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया