अतिथी कट्टा

दिनांक : १८-११-२०२२

आत्मशोधाचा प्रवास म्हणजे ‘गोदावरी’…


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी यानं मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यानिमित्तानं त्याचं हे मनोगत.


——–

१७ ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि माझा मित्र निशिकांत कामत याचं निधन झालं. त्या दिवशी मी प्रचंड अस्वस्थ होतो. दुसऱ्याच दिवशी मी निखिल महाजन या माझ्या आणखी एका मित्राला निशिकांतविषयी बोलून दाखवलं की मला निशीच्या नावानं काहीतरी करायचं आहे. काय करायचं, काय करायचं याचा विचार करीत असताना सिनेमाच करण्याचा विचार आमच्या मनात आला. तेव्हा निखिलनं मला एका गोष्टीचं कथासूत्र सांगितलं. मला ते आवडलं. तेव्हा त्यानं मला विचारलं की कुठं करायचा हा चित्रपट, मुंबई की पुणे? तेव्हा मी त्याला नाशिक असं उत्तर दिलं. त्यामागचं कारण मलादेखील तेव्हा माहीत नव्हतं. मग आम्ही नाशिकला गेलो. त्याआधीच मला ‘खळखळ गोदा निघालीस तू’ हे गीत आपोआप स्फुरलं. सिनेमाचं नाव मग ‘गोदावरी’ ठरलं आणि नाशिकला गेल्यावर आम्हाला प्राजक्त देशमुख भेटला. तोदेखील नाशिकचाच. मग या दोघांनी या चित्रपटाचं लेखन करायला सुरुवात केली. मग ए. व्ही. प्रफुल्लचंद्रनं मी लिहिलेल्या गीताला संगीत दिलं. हळूहळू देशमुख कुटुंब उभं राहिलं. मग मी स्वतःच हा चित्रपट निर्मिण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडे जे होतो, नव्हते ते सगळे पैसे मी या चित्रपटासाठी लावले.

शमिन कुलकर्णी या आमच्या छायाचित्रकारानं अतिशय सुंदर असं या चित्रपटासाठी काम केलं आहे. एका कुटुंबापासून दुरावलेल्या आणि पुन्हा आपल्या कुटुंबाचं महत्त्व जाणणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. तो आपल्या नदीचं, भवतालाचं महत्त्व जाणतो आणि एका आंतरिक वाटेवरचा त्याचा आत्मशोधाचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात तो आपली संस्कृती, परंपरा याला न नाकारता त्याकडे तो डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो. मी साकारलेली निशिकांतची भूमिका नक्कीच आजवरची माझी सर्वाधिक आव्हानास्पद भूमिका आहे. पण मी तिला बेस्ट म्हणणार नाही. कारण आपणच आपलं कौतुक कशाला करायला हवं. ते लोकांनी करायला हवं. मला नेहमी असं वाटतं की माझ्या दिग्दर्शकाला जे अपेक्षित आहे ते करण्यात मी सफल झालो तर ते माझं यश आहे. चित्रपट निर्मिती करताना मी कधीही बजेटचा विचार केला नाही. माझ्याकडे नियोजन हा प्रकार नाही. मी उत्स्फूर्त आहे. जे कमावलं ते इथं लावलं आहे. आमची स्टारकास्ट अगदी दमदार आहे. ही सगळी जबरदस्त माणसं आहे. विक्रमकाका, मोनेकाका, गौरी नलावडे, नीनाताई, प्रियदर्शन, मोहित टाकळकर सगळे जबदरस्त कलाकार आहेत. करोनाच्या काळात आम्ही खूप काळजी घेऊन चित्रीकरण केलंय. सगळं सुखरूप पार पडल्याचा मला आनंद आहे. सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यामुळे चित्रपटाच्या यशाचे सगळे भागीदार आहेत.

– जितेंद्र जोशी

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया