अतिथी कट्टा

दिनांक : २३-०४-२०२३

‘महाराष्ट्र शाहीर’मधून मराठी संस्कृतीचं दर्शन…


‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे अजरामर महाराष्ट्रगीत देणार्‍या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट येत्या 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, शाहिरांची व्यक्तिरेखा साकारणारे अंकुश चौधरी, शाहिरांच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणारी सना शिंदे यांचं हे मनोगत.


——–

शाहिरांची ही जीवनगाथा म्हणजे रसिकांसाठी गाण्यांच्या रूपातील एक पर्वणी आहे. या चित्रपटाच्या टिझर प्रकाशन सोहळ्यास शाहिरांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल तसेच पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेला हा चित्रपट एक भव्य आणि केवळ पडद्यावर पाहावा असाच चित्रपट आहे.

शाहीरांबद्दल बोलताना राज ठाकरे यावेळी म्हणाले, “कोणताही स्वातंत्र्यलढा कोणतीही सामाजिक चळवळ ही मनामनात, घराघरात पोहोचविण्याचे काम हे लोक कलाकार करत असतात. जगभरात हे झालेले आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1960 साली आला, त्यात अनेक लोकांचे योगदान होते. पण त्याकाळात शाहिरांनी दिलेले योगदान खूप मोठे होते. अशा लोकांमुळे स्वातंत्र्य लढा असो की संयुक्त महाराष्ट्र सारखी चळवळ असो, त्या जवळ येत जातात. हे लोक मनामनात आणि घरघरात पोहोचलेले असतात. कोणतीही चळवळ सांघिक स्वरूपात नेण्यात अशा लोकांचा फार मोठा वाटा असतो. हे जगभरातील अनुभव आहे. शाहीरांचे हे सर्वात मोठे योगदान आहे. शाहिरांना मी लहानपणापासून पाहत आलो आहे. ते आमच्या घरी माननीय मा. बाळासाहेबांना भेटायला यायचे. मला ते ‘जय जय महाराष्ट्र माझा’वाले शाहीर म्हणून माहीत होते. पण शाहीरांबद्दल एक गोष्ट सांगतो, की जे ठराविक लोक बाळासाहेबांना ‘बाळ’ म्हणायचे, त्यात एक शाहीर होते. आज बायोपिक बरेच येतात. त्यासाठी तो माणूसही तसा असावा लागतो. पण शाहिरांच्या या जीवनपटात एकेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे येत जातात. या चित्रपटात प्रत्येक फ्रेमसाठी विशेष प्रयत्न केल्याचे जाणवते. केदार शिंदे यांनी जेव्हा मला या चित्रपटाबद्दल सांगितले तेव्हा मी त्यांना विचारले की शाहिरांनी भूमिका कोण करतोय. त्यांनी जेव्हा अंकुशबद्दल सांगितले तेव्हा मी थोडीशी साशंकता व्यक्त केली. पण टिझर पाहिल्यावर नक्की सांगू शकतो की, अंकुश ने उत्कृष्टपणे शाहीर उभे केले आहेत.

शाहीर साबळे यांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे यावेळी बोलताना म्हणाल्या, की हा माझ्यासाठी एक अत्यंत हळवा प्रसंग आहे. आज मी भावूक झाले आहे. संगीतकार अजय-अतुल म्हणाले, की आम्ही शहीरांकडून खूप शिकलो. त्यांच्यामुळे केदार आणि आमची मैत्री झाली. या चित्रपटाचा भाग होता आले, हे आमचे भाग्य आहे. त्यासाठी आम्ही केदारचेही आभारी आहोत. निर्माते संजय छाब्रिया यावेळी बोलताना म्हणाले, की आम्ही जेव्हा ‘मी शिवाजीराजे बोलतोय’ची निर्मिती केली तेव्हाही राजसाहेब आले होते. यावेळी ते आले आहेत. त्यामुळे त्यांचा आणि आमचा एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी अप्रतिम संगीत दिले आहे. एक दर्जेदार चित्रपट दिल्याबद्दल केदार शिंदे यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “गेली साडे तीन वर्षं मी जे स्वप्न उराशी बाळगलं होतं, ते आता साकार होतंय याचा आनंद आहे. शाहीर आणि शाहिरांच्या पत्नीसाठी मी निवडलेले अंकुश आणि माझी मुलगी सना हे ‘फर्स्ट चॉइस’ होते. अंकुशच्या निवडीत आमचा ‘डीओपी’ वासुदेव याचाही मोठा वाटा आहे. एके दिवशी बोलता बोलता वासुदेव मला म्हणाला, ‘शाहिरांच्या व्यक्तिरेखेसाठी अंकुश सर तुम्हाला कसे वाटतात?’ तेव्हा मी विचार करायला लागलो.

शाहिरांची काही छायाचित्रं पाहिलं. शाहीर खूप ‘स्टायलिश’ होते. अंकुश आणि शाहिरांच्या उंचीत थोडा फरक आहे. पण आपल्याला कधीही पाहताना शाहीर साबळे हे उंचच वाटतात. कारण ते उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं. मला आनंद या गोष्टीचा आहे की अंकुशनं शाहिरांच्या व्यक्तिरेखेत शिरण्यासाठी आपली तब्येत खूप सांभाळली. केवळ या सिनेमासाठी तो बारीक झालाय. शाहीर कधीच गोलमटोल नव्हते. अंकुशनं त्यांची देहबोली अगदी परफेक्ट साध्य केलीय. त्यानं खूप मेहनत घेतलीय या भूमिकेसाठी. सनाबाबत बोलायचं झालं तर तिनं चार वर्षं माझ्याकडे दिग्दर्शनात सहाय्यक म्हणून काम केलं. तिला पहिल्यापासूनच अभिनयाची आवड होती. पण माझं स्वतःचं असं मत होतं की तिनं योग्य ‘नोट’वर काम करायला हवं. तिचं पहिलं काम उत्तमच असलं पाहिजे, असं माझं मत होतं. नायिका म्हणून येण्यापेक्षा तिचं अभिनेत्री म्हणून पदार्पण व्हावं, असं मला वाटत होतं. अभिनेत्री बनण्यासाठी तुमच्यात कस असावा लागतो. तसेच अभिनेत्री कधीही लवकर बाद होत नाही. तिला ‘लाँग लाइफ’ असतं. त्यामुळे आता सनानं कसं काम केलंय हे प्रेक्षकांना हा चित्रपट आल्यावर कळेलच. प्रेक्षक खूप सूज्ञ असतात, असं माझं मत आहे. मराठी संस्कृती बघण्याच्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक खूपच गर्दी करतात, असं माझं मत आहे. त्यामुळे मराठी संस्कृती पाहायची असेल तर ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रत्येकानं पाहायलाच हवा.”

शाहिरांची व्यक्तिरेखा साकारणारा अंकुश चौधरी म्हणाला, “केदारनं जेव्हा मला या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेसाठी विचारलं तेव्हा माझ्या मनात शंका होती. ते मला पचनी पडणारंदेखील नव्हतं. पण ज्या वेळी मी शाहिरांच्या गेटअपमध्ये शिरलो, तेव्हा मला केदारच्या डोळ्यात पाणी दिसलं. तसेच त्या वेळी तिथं जे उभे होते, त्या सगळ्यांना भरून आलं होतं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की केदारनं माझी केलेली निवड बरोबर आहे. कारण चित्रपटाचं शीर्षक आणि कास्टिंग या दोन गोष्टींमध्येच तो 90 टक्के यश मिळवतो. तो बरेच दिवस मला सांगत होता की, मी ‘महाराष्ट्र शाहीर’ करतोय आणि अचानक एके दिवशी त्यानं मला विचारलं. त्याला माझं नाव कसं सुचलं याबद्दल मला फारसं ठाऊक नाही. मला या चित्रपटासाठी जे काही करावं लागणार होतं, ते सगळं केदारला येत होतं. त्यामुळे माझ्या जागी केदारला उभं केलं असतं तर त्यानं अजून चांगलं काम केलं असतं. केदारच्या पाठिंब्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारणं मला सोपं झालं. काही वर्षांपूर्वी माझ्या लक्षात आलं की आपण एका वेळी एकच चित्रपट केला तर ते अधिक चांगलं ठरतं. ते आनंददायी काम असतं. या चित्रपटासाठी मला दीड वर्षं द्यावं लागणार होतं. त्यामुळे हा चित्रपट पूर्ण होईपर्यंत आपण दुसरं काम करायचं नाही असं मी ठरवलं होतं. खूप नवीन गोष्टी मला या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शिकता आल्या.”

शाहिरांच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणारी सना शिंदे म्हणाली, “ सर्वप्रथम ‘बहरला मधुमास’ या गाण्याचे भरपूर रिल्स बनवून रसिक प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेमाचा जो वर्षाव केलाय, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याची ‘हुक स्टेप’ प्रचंड व्हायरल झालीय. हा चित्रपट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. यापूर्वी मी बाबांबरोबर (केदार शिंदे) सहाय्यक म्हणून काम केलं होतं. परंतु, एक अभिनेत्री म्हणून मला पहिल्यांदाच त्यांच्या बरोबर काम करता आलं. तसेच माझा पहिला को-स्टार म्हणून अंकुश काकाबरोबर काम करायला मिळणं याबद्दल मी स्वामी समर्थांना धन्यवाद देते. शाहिरांची पहिली पत्नी भानुमती यांच्याबद्दल मला त्यांच्या मुलींकडून खूप काही ऐकायला मिळालं. अनेकदा शूटिंगवेळी मी म्हणायचे, ‘पणजी… प्लीज माझ्याकडून काम करून घे या वेळेला.’ पणजीच्या गेटअपमध्ये तयार होऊन मी जेव्हा आरशासमोर उभी राहिले तेव्हा मी खरोखरीच घाबरले होते. कारण यात माझ्या व्यक्तिरेखेचा ग्राफ हा 18 वर्षांपासून ते 65 वर्षांपर्यंत दाखविण्यात आला आहे. त्यासाठी मी वेशभूषा आणि रंगभूषा विभागात काम करणार्‍या सगळ्यांचे आभार मानेन. मला पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की मी खरोखरीच ‘भानुमती’ आहे. तेव्हा मला खूपच भरून आलं. बाबांनी माझ्याकडून खूप चांगलं काम काढून घेतलं.”

– महाराष्ट्र शाहीर टीम

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया