‘रावरंभा’ म्हणजे सप्तरंगी मोरपंखी पान
शशिकांत शीला भाऊसाहेब पवार (निर्माते): सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी. आम्ही सातार्याचे असल्याने पहिला चित्रपट हा महाराजांवरच असावा आणि आमच्या पूर्वजांनीही आपल्या भूमीसाठी रक्त सांडले त्या पूर्वजांना आणि छत्रपती शिवरायांना आदरांजली देण्यासाठी आम्ही ‘रावरंभा’ चित्रपटाच्या निर्मितीचं पाऊल उचललं. आमची सगळी ‘टीम’ ही सातारचीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जिवाची बाजी लावणार्या एका मावळ्याची ही गोष्ट आहे. स्वराज्यासाठी लढताना या मावळ्यांनी व्यक्तिगत आयुष्यात केलेला त्याग नेमका कसा असेल, हेदेखील या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे इतिहासाला धरून, ऐतिहासिक पुराव्यांची मदत घेऊन हा चित्रपट बनविण्यात आला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात मी बरीच वर्षं काम केलं आहे. त्या क्षेत्रामधील शिस्त, नियोजन या गोष्टींचा मला या चित्रपट निर्मितीसाठी खूप उपयोग झाला. चांगल्या ‘टीम’कडून उत्तम काम करून घेतल्यामुळे प्रेक्षकांना एक चांगला चित्रपट देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.
प्रताप गंगावणे (लेखक): ‘रावरंभा’ म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं एक मोरपंखी पान आहे. ते आम्ही शोधून काढलंय. त्या पंखावरील सप्तरंग प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे पाहायला मिळतील. शिवकाळाचा अभ्यास करीत असताना माझ्या लक्षात आलं की इतिहासातील नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर यांच्यासारखी महत्त्वाची माणसं आपल्याला माहिती आहेत. पण सर्वसामान्य मावळ्यांबद्दल आपल्याला फारसं कुठं लिहिलेलं, चित्रीत केलेलं पाहायला मिळत नाही. म्हणून मग प्रतापराव गुजरांसोबत असलेल्या सहा मावळ्यांपैकी एकाची ही कथा आहे. त्यातला ‘रावजी’ हा आपल्या चित्रपटाचा नायक आहे.
अनुप जगदाळे (दिग्दर्शक): ऐतिहसिक चित्रपटाची मोट बांधणं हे नेहमीच एक मोठं आव्हान असतं. अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते यांचं संपूर्ण सहकार्य हवं असतं. ते मला मिळाल्यामुळे हा चित्रपट यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकला. आमच्या सर्वच टीमनं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून ती प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना खूप आनंद मिळेल.
ओम भुतकर (अभिनेता): छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संदर्भ असलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाचं स्क्रीप्ट खूप सुंदर लिहिलं होतं. मी साकारीत असलेल्या ‘राव’ची स्वराज्याप्रति असलेली निष्ठा आणि त्यासाठी बलिदान करण्याची त्याची तयारी मला विशेष भावली. दुसर्या बाजूला आपल्या प्रेयसीबद्दल वाटणारं प्रेम आणि त्यासाठी काहीही करून जाण्याची तयारी मला विलक्षण वाटली.
मोनालिसा बागल (अभिनेत्री): ‘रावरंभा’ या चित्रपटामधील ‘रंभा’ ही व्यक्तिरेखा साकारणं माझ्या आयुष्यातील सुवर्णसंधी आहे. त्याबद्दल मी निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकांची आभारी आहे. या आधी मी कधीही न केलेल्या गोष्टी या चित्रपटासाठी केल्या आहेत. घोडेस्वारी यापूर्वी मी कधीही केली नव्हती. ती या चित्रपटात मी केली. या चित्रपटासाठी भाषेवर आम्ही खूप काम केलं. सुरुवातीला काम करताना थोडं दडपण होतं. परंतु जसजसं आम्ही काम करीत गेलो, तसतसं हे दडपण कमी होत गेलं.
संतोष जुवेकर (अभिनेता): प्रथमच मी एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ‘जालिंदर’ नावाची ही भूमिका आहे. आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळ्या धाटणीची ही भूमिका आहे. कपटी स्वभावाचा जनावरांचा दलाल असलेला जालिंदर हा शत्रूंशी संधान बांधून कसे डावपेच रचतो? हे यात पहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं’. ‘रावरंभा’ च्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका मला करायला मिळाली. निगेटिव्ह शेडची ही भूमिका असून मला स्वतःला ही व्यक्तिरेखा करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृतीतून अशा व्यक्तिरेखांची ओळख होत असते. माझ्या आजवरच्या भूमिकांना रसिकांनी जे प्रेम दिलं. तेच प्रेम ‘जालिंदर’ ला मिळेल असा मला विश्वास आहे.
अशोक समर्थ (अभिनेता): इतिहासात गाजलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे आपल्यासारखी सर्वसामान्य माणसंच होती. यांना पण आनंद, दुःख, यातना, चिडचिड असे माणूसपणाचे सगळे कंगोरे होते. या सर्व पात्रांचं ‘नॉर्मल’पण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रताप गंगावणे यांच्यासारख्या प्रख्यात लेखकानं हा चित्रपट लिहिला असल्यामुळे मला माझी प्रतापराव गुजरांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप काही शोधकार्य करावं लागलं नाही. तसेच लेखक-दिग्दर्शकानं मला माझ्या पद्धतीनं ही व्यक्तिरेखा साकारण्याची मुभा दिली आणि त्याप्रमाणे मी अभिनय केला.
कुशल बद्रिके (अभिनेता): बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. ‘बघणार्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारलीय. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडेल, अशी मला खात्री आहे.
किरण माने (अभिनेता): ऐतिहासिक चित्रपटांची सध्या रांग लागली आहे. पण या चित्रपटात खूप वेगळेपण आहे. इतिहासामधील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आपल्याला ठाऊक आहेत. पण काही असे मावळे आहेत की जे आपल्याला माहीतच नव्हते. इतिहासाच्या उदरात गुडूप झालेलं एक सोनेरी पान म्हणजे ‘रावरंभा’ हा चित्रपट आहे. प्रतापराव गुजरांसोबत असलेल्या वीरांपैकी एक वीर म्हणजे हा रावजी आहे. त्याची ही प्रेमकथा आहे आणि त्यातून सगळा इतिहासाचा पट उलगडत जातो.
– रावरंभा टीम
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया