अभिनय आणि दिग्दर्शनात ‘बॅलन्स’ साधणार – मृण्मयी देशपांडे
——
चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश करणार्या प्रत्येक व्यक्तीचं अंतिम ध्येय हे दिग्दर्शक बनण्याचं असतं. त्यामुळे दिग्दर्शनात पदार्पण केल्याचा मला नक्कीच आनंद झालाय. पण, माझे काही अॅक्टर मित्र असे आहेत की, ज्यांना दिग्दर्शन क्षेत्रामध्ये नक्की यायचं नाहीय. पण दिग्दर्शक व्हायचं माझं स्वप्न होतं. हे स्वप्न मला कायमच खुणावत होतं. ‘मन फकीरा’च्या रुपानं माझी फायनली स्वप्नपूर्ती होते आहे.
या चित्रपटाची गोष्ट कॉलेजमध्ये असल्यापासून माझ्या डोक्यात होती. तसेच दिग्दर्शन तसं काही मला नवीन नाही. कॉलेजमध्ये असताना मी काही कलाकृतींचं दिग्दर्शनही केलेलं होतं. अनेक बक्षीसंही तेव्हा मला मिळालेली होती. सिनेमाचंही मला दिग्दर्शन करायचं होतं. मात्र हे खूप अवघड काम आहे. त्यामुळे मी योग्य वेळेची वाट पाहत होते. नाटकामध्ये तीन भिंती बांधलेल्या असतात नि त्यात जे घडतंय ते तुम्हांला प्रेक्षकांना सांगायचं असतं. परंतु, सिनेमा हा अधिक पसरलेला असतो. त्यामुळे सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी मी तब्बल दहा वर्षं थांबले. या कामासाठी स्वतःला पूर्ण तयार केल्यानंतरच मी दिग्दर्शनात उडी घेतली.
या चित्रपटात मी आजच्या काळातली नाती दाखवली आहेत. स्टिरिओटिपिकल गोष्टींना ब्रेक करणं मला आवडतं. मराठीमध्ये आणखी एक विषयाचं नावीन्य आणणारा हा चित्रपट आहे. अर्थातच विषय आजच्या तरुणाईचा आहे. मांडणी आजची असली तरी त्यात अजिबात भडकपणा नाही. दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न मी जरी बघितलेलं असलं तरी दिग्दर्शक बनणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. सुरुवातीला मी नितीन प्रकाश वैद्य यांना या चित्रपटाची कथा ऐकवली. त्यानंतर आम्ही निर्माते विनय गानू यांना भेटलो. अर्धी कथा त्यांना वाचून दाखवल्यानंतर त्यांनी मला ती पूर्ण करण्यास सांगितलं. अवघ्या दहा दिवसांमध्ये मी ते कथानक संवादांसकट पूर्ण केलं नि गानूंना ऐकवलं. अवघ्या दोनच दिवसांनी मला नितीनचा फोन आला की गानूंना कथानक आवडलं असून त्यांनी निर्मितीसाठी होकार दिला असून आपण हा चित्रपट करतो आहे.
मी स्वतःला या चित्रपटात अभिनय करण्यापासून लांब ठेवलं. त्यामागचं कारण म्हणजे दिग्दर्शनासाठी खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात आपण अभिनयाची रिस्क घेऊ नये असं मला वाटलं. आपण दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केलं की, लोकं म्हणतात की तुम्ही तुमच्या व्यक्तिरेखेच्या अधिक प्रेमात पडून चित्रपटाच्या कथानकावर अन्याय केलात. त्यामुळे मला हे टेन्शनच नको होतं. दिग्दर्शक म्हणून आपल्याला कोणकोणत्या मानसिक आंदोलनांमधून जावं लागणार आहे, हे मला ठाऊक नव्हतं. म्हणून मी या चित्रपटासाठी तरी अभिनयापासूनच लांबच राहिले.
मला या चित्रपटासाठी अर्ध्या पैशाचीही तडजोड करायची नव्हती आणि ती मला करावी लागलेली नाही. याचं मोठं श्रेय जातं ते नितीन प्रकाश वैद्यला. त्यानं सगळी ही मोट बांधली. अभिजित अब्दे या आमच्या कॅमेरामनचंही काम खूप चांगलं आहे. मला हवं ते करण्याची मुभा दिल्याबद्दल निर्माते विनय गानू यांनाही मी श्रेय देते.
गौरी शिंदे, राजकुमार हिरानी, फरहान अख्तर या दिग्दर्शकांचं काम खूप आवडते. त्यांचं काम पाहत पाहतच मी दिग्दर्शक बनले. नायिका म्हणून मला चांगल्या चांगल्या कथा ऑफर होताहेत. अशा परिस्थितीत अभिनय आणि दिग्दर्शन यांच्यातला बॅलन्स आपोआप साधला जाईल असं मला वाटतं. खूप चांगल्या स्क्रीप्ट्स अभिनयासाठी माझ्याकडे आल्या आहेत. ‘मन फकीरा’ प्रदर्शित होण्यापूर्वीच मी माझा दुसरा चित्रपटही दिग्दर्शित केला आहे. त्यात मात्र मी अभिनयही केला आहे.
– मृण्मयी देशपांडे
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया