अतिथी कट्टा

दिनांक : ०१-०३-२०२३

कलापंढरीचा निष्ठावान सेवक : जयशंकर दानवे


कोल्हापूरच्या नाट्य,चित्रपट वैभवाच्या पायाभरणीसाठी छत्रपती शाहू महाराजांची कलादृष्टी,कलेविषयी व कलावंताविषयी प्रेम जसे कारणीभूत ठरले,तसेच करवीर संस्थानच्या राजाश्रयामुळे प्रोत्साहित होऊन अनेक कलाकार या मातीत घडले.


——–

चित्रपती व्ही.शांताराम,चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूरचे नाव या क्षेत्रात सतत तळपत ठेवले.त्याच भालजी पेंढारकरांचे शिष्योत्तम नटश्रेष्ठ जयशंकर दानवे.केवळ चित्रपटच नव्हे तर नाट्यसृष्टीतही आपला वजनदार ठसा त्यांनी उमटविला.किंबहुना चित्रपट आणि नाट्य या दोन्ही क्षेत्रात सहजतेने वावरणाऱ्या फार थोड्या कलावंतात दानवेंची गणना होईल.

वयाच्या केवळ बाराव्या वर्षी आई-वडिलांच्या छ्त्रास पारखा झालेला शंकर लोणावळ्यास आपल्या काकांकडे राहताना,पुण्याच्या रास्ता पेठेतील चित्रपट गृहाभोवती घुटमळत असे,त्याचवेळी तो ग्लोब (पूर्वाश्रमीचे लक्ष्मी) थिएटरजवळ भालजी पेंढारकरांच्या नजरेस पडला.रुस्तुम,सोहराब हे मोदी बंधू या थिएटरचे मालक,तर भालजी मैनेजर.जिवाशिवाची गाठ अशी पडली आणि शंकरने एका रुपेरी कारकीर्दीच्या वाटेवर पहिले पाऊल टाकले.याच पहिल्या पावलाने शंकरला त्याच्या व्यावहारिक घरातून बाहेर काढले आणि नाटक करायचे तर घराबाहेर हो अशा निवार्णीच्या इशाऱ्यावर शंकरने नाट्यपंढरीची खडतर वाट पसंत केली;पण बेंजामिन साहेबांनी आधारच दिला नाही तर त्यांना आपला मानसपुत्र मानले आणि जयशंकर
दानवे या नटसम्राटाला इथे जणू सूर गवसला. ‘आसुरी लालसा’ या भालजींनी रुपांतरीत केलेल्या नाटकातून जयशंकर दानवे यांची खरी कारकीर्द सुरु झाली.

आर्य सुबोध कंपनीच्या बहुतांशी हिंदी-उर्दू अशा जवळजवळ ४० नाटकांतून दानवे चमकले.त्यानंतर कोल्हापूरी स्थायिक होऊन शुगर मिल्सच्या लोहियासाहेबांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या ‘जीवन कल्याण’ या संस्थेमार्फत एकापेक्षा एक नाटके त्यांनी सादर केली.यात आग्य्राहून सुटका,पुण्यप्रभाव,दुसरा पेशवा यासारखी ऐतिहासिक नाटके तर सौभद्र,स्वयंवर,मानापमान,शारदा यासारखी संगीत नाटके दिग्दर्शित करून त्यांनी वैभवशाली इतिहास घडविला.शहरातील सर्वसामान्य कलाकारांना घेऊन त्यांनी शेकडो नाटकांचे दिग्दर्शन केले.यातून अनेकांच्यातील कलेला संधी मिळाली.कोल्हापूरच्या कलेचा वारसा जयशंकर दानवेंनी असा बांधेसूद बनविला.नाटक,चित्रपटांतून राहिलेल्या वेळात ते चित्रकलेत रमले.नाट्य,चित्रपटाच्या रंगभूषेपासून ते वेशभूषेपर्यंत व अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत साऱ्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व दिसून येईल.

हिंदी चित्रपटसृष्टीचे महान शोमन राजकपूर यांना प्रथम मेकअप करून जयशंकरनी नारदाच्या भूमिकेत उभे केले.त्याचबरोबर आजच्या महान कलाकार श्रीमती सुलोचनादीदींच्या रंगमंचावरील प्रथम पदार्पणाचे श्रेयदेखील दानवेंकडे जाते.चित्रपटांत, नाटकांत खलनायकाच्या भूमिकेत असल्यामुळे प्रेक्षकांच्या रागाचे धनी होणारे जयशंकर जगाच्या रंगभूमीवर मात्र एक मनस्वी कलावंत म्हणून वावरताना कोल्हापूरच्या जनतेने पाहिलेत.कलेवरील प्रामाणिक निष्ठा,उदयोन्मुख कलावंताना पुढे आणण्यासाठी धडपड त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत चालू ठेवली.रंगभूमी,चित्रपट क्षेत्रात व्रतस्थ राहून स्वच्छ व पारदर्शक अशा चारित्र्याने ते वावरले.कलावंताच्या जीवनातील चढउतार त्यांच्याही वाट्याला आले;पण कलेवरील निष्ठेने त्याची त्यांनी कधी फिकीर केली नाही.त्यांनी अनेक नाटके,कादंबऱ्या,पटकथा,एकांकिका,लघुकथा इतकेच नव्हे तर तीन खंडात ‘ हिरवी चादर रुपेरी पडदा’ हे त्यांचे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले.

जयशंकर भक्तिभावाने कला सादर करीत राहिले.कुणी क्रेडीट दिले वा न दिले त्याचा हिशेब त्यांनी ठेवला नाही,तसेच आज मोठ्या झालेल्या कलावंतानीही त्यांची आठवण ठेवली नाही.पण कोल्हापुरातील अनेक लहान-मोठे कलावंत मात्र याचा उल्लेख अभिमानाने करतात.दानवे परिवारांने आपल्याला लाभलेल्या परीसस्पर्शाची आठवण स्मृतीरूपाने गेली २५ वर्षे जपली आणि २०११ पासून त्यांच्या नांवे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार ’ ज्येष्ठ रंगकर्मींना दिला जातो. आतापर्यंत श्री.दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे,सदाशिव अमरापूरकर,शरद पोंक्षे,अरुण नलावडे,सुबोध भावे,प्रशांत दामले,डॉ.गिरीश ओक,भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर, महेश कोठारे,सचिन खेडेकर या कलाकारांना पुरस्कृत केले आहे. दानवे बंधू-भगिनी दरवर्षी आपल्या या थोर पित्याच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने कला क्षेत्रांतील मंडळीना पाचारण करतात व करवीरकरांना एक दर्जेदार कार्यक्रमाची भेट गेली ३७ वर्षे देतात. करवीर नगरीतील अनेक कलावंत या समारंभात भक्तिभावाने हजेरी लावतात.नव्या पिढीच्या नव्या विचारांत हरवू पाहणारी जयशंकर दानवेंसारख्या थोर कलाकाराची आठवण करून देण्यासाठी या परिवाराने घेतलेला हा अवघड वसा वर्षानुवर्षे असाच पार पडावा व करवीरकरांना या थोर कलाकाराला मानाचा मुजरा करण्याची संधी त्यांनी सतत द्यावी
हीच सदिच्छा !

– तुकाराम भिसे

(माजी कार्यकारी अभियंता,एम.एस.ई.बी.)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया