अतिथी कट्टा

दिनांक : ०८-०६-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌भारतीय स्त्रीचं प्रतिनिधीत्व करणारा चित्रपट….




सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीचा ‘वेलकम होम’ हा चित्रपट येत्या १४ तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी साकारली आहे. त्या निमित्यानं त्यांचं हे मनोगत.

——

‘वेलकम होम’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मी पहिल्यांदाच सुमित्रामावशींबरोबर काम करतेय. सुमित्रामावधी आणि सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची माझी बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होता. साधारण आठ वर्षांपूर्वी सुमित्रामावशीनं मला या चित्रपटाची कथा ऐकवली होती. त्यावेळीच मला ती खूप आवडली होती. परंतु, तो चित्रपट आता बनला. परंतु, हरकत नाही जसा आम्हाला हवा होता तसा हा चित्रपट बनला. काही महिन्यांपूर्वी ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून या चित्रपटाला स्थान मिळालं होतं. त्यावेळी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना तो खूप भावला होता. आता सर्वांसाठी हा चित्रपट खुला होतो आहे.

आपण नेहमी म्हणतो की स्त्री घर वसवते. पण घरांच्या चार भिंती म्हणजे काही घर नसतं. घराला घरपण देणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. पण आपल्याला अनेकदा असं बघायला मिळतं की त्या घरातलं त्या स्त्रीचं स्थान बऱ्याचदा कमकुवत असतं. मग ती कितीही शिकलेली असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असो. काही त़डजोड करायची वेळ आली तर त्या स्त्रीलाच आपलं घर सोडावं लागतं. असं असलं तरी निष्ठेने, प्रेमानं सर्वांचं करते. घराला घरपण देते. मात्र वेळ आली तर आजची स्त्री ही घराबाहेर पडू शकते. परंतु, तिच्यासाठी स्वतःचं घर कोणतं हा शोध कधीच संपलेला नसतो. मग हे घर वडिलांचं असो किंवा पतीचं असो. तिचं स्वतःचं असं घर कोणतं असा प्रश्न पुढील पिढी तिला विचारते आहे. हा या चित्रपटाचा मूळ विषय आहे.

हा विषय आजच्या प्रत्येक घरातल्या स्त्रीला आपलासा वाटेल. तसेच हा चित्रपट पाहून पुरुषवर्गही अस्वस्थ होईल. आपल्याकडे स्त्री-पुरुष दोघांनाही समान महत्त्व आहे. परंतु काही विशेष निर्णय घ्यायची वेळ आली की स्त्री आणि पुरुष किती वेगळ्या स्तरावर आहेत हे आपल्याला दिसून येतं. आजच्या भारतीय स्त्रीचं प्रतिनिधीत्व करणारा हा चित्रपट आहे. सुमित्रामावशी स्वतः चांगली लेखिका आहे. त्यामुळे तिचा सगळा दष्टीकोन या चित्रपटातून पाहायला मिळतो.

– मृणाल कुलकर्णी

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया