स्मिता पाटील, मुक्ता बर्वे या माझ्या आयकॉन्स…
राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची जबाबदारी किती असते, हे अजून मला नक्की माहीत नाही. त्यामुळे आपण अजून कशा पद्धतीनं प्रतिक्रिया द्यावी, कसं वागायचं हे अजूनही मला समजलेलं नाही. परंतु आपण केलेल्या मेहनतीचं फळ एवढ्या सुंदर रीतीनं मिळाल्याबद्दल खूप छान वाटतंय. कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडते, याबद्दल खूप छान वाटतंय. या चित्रपटासाठी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. जीव ओतून काम केलं आहे.
या चित्रपटाची गोष्ट खूप साधी नि सरळ आहे. त्यामुळे मला खूप काही वेगळं करण्याची गरजच पडली नाही. माझ्या व्यक्तिरेखेचं नाव ‘इंद्रायणी’ असून हे नावच जितकं निर्मळ आहे, तितकीच ती व्यक्तिरेखाही आहे. अर्थात पडद्यावर साधं काम करणं हेच खूप मोठं आव्हान असतं. कधीकधी एखाद्या भूमिकेसाठी आपण खूप काम करायला गेलो की गोंधळ होतो. आमचे दिग्दर्शक शंतनू रोडेसरांनी माझ्यासाठी खूप गोष्टी सोप्या करून ठेवल्या होत्या.
या चित्रपटात खूप मोठे कलाकार असून ते सगळे माझ्याशी तितक्याच प्रेमानं जोडले गेले आहेत. मृणालताई, गिरीजाताई, मधुराताई, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मोहनकाका, सुव्रत, सविताताई, चित्रपटामधील माझ्या छोट्या मुलाची भूमिका साकारणारा आरव यात आहे. सुव्रतनं या चित्रपटात ‘सुजीत’ची भूमिका साकारली आहे आणि आरव, ‘सुजीत’शिवाय ‘इंद्रायणी’ पूर्णच नाही होऊ शकत. हे कलाकार, तसेच गीतकार, संगीतकार, गायक या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ म्हणजे आम्हाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आहे. या सगळ्यांचे मी आभार मानते.
गमतीशीर गोष्ट म्हणजे आजपर्यंत मी कोणतीही पैठणी विकत घेतलेली नाही. सगळ्या मला ‘गिफ्ट’ म्हणून मिळालेल्या आहेत. ‘तारांगण’च्या मुखपृष्ठासाठी नेसलेली पैठणी ही माझ्या आजीची (वडिलांची मामी) आहे. ती किती वर्षं जुनी आहे, हे मलादेखील ठाऊक नाही. परंतु चांगल्या पैठणीत आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी तिच्यात आहेत. प्रत्येक पैठणी मला कोणीतरी ‘गिफ्ट’ केलीय. त्यामुळे प्रत्येक पैठणीची माझ्यासाठी वेगळी आठवण आहे. एक मला ‘होम मिनिस्टर’मध्ये मिळालीय, एक मला शुभांगी गोखले यांनी दिलीय. माझे फॅन्स मला पैठणी गिफ्ट देतात. त्यामुळे यापुढेही मी पैठणी विकत नाही घेणार.
‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची टॅगलाइन आहे, स्वप्नपूर्तीचा प्रवास. तीच टॅगलाइन माझ्या वैयक्तिक आयुष्यातील प्रवासाशी मिळतीजुळती आहे. खरं तर स्वप्नं सगळेच पाहतात. पण काहींचीच ती पूर्ण होतात. त्यातली मी एक आहे. चांगल्या सिनेमामध्ये काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं. राष्ट्रीय असंच नव्हे तर कोणताही पुरस्कार मिळवण्याचं माझं स्वप्न नव्हतं. पण तेही या चित्रपटाच्या निमित्तानं पूर्ण झालं.
सर्वप्रथम मी नाव घेईन ते माझे वडील संजीव यांचं. दुर्दैवानं ते आता आपल्यात नाहीत. माझ्या आजवरच्या प्रवासात त्यांचं मोठं योगदान आहे. घरून तुम्हाला पाठबळ नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे माझे आई-वडील आणि कुटुंब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तसेच माझ्या कुटुंबाचा दुसरा भाग आहेत ते, ‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर. ‘पैठणी’ चित्रपटासाठी त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला नसता तर हा चित्रपट मला मिळाला नसता. माझे आजवरचे निर्माते, दिग्दर्शक यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे हा प्रवास सुरू झाला.
‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटात एक संवाद आहे, ‘पैठणीला तुम्ही निवडत नसता, पैठणी तुम्हाला निवडत असते.’ तसंच काही माझ्या बाबतीत आत्तापर्यंत झालं आहे. मी कोणतीही कलाकृती ‘स्क्रीप्ट’ वाचून निवडलेली नाही. ती निवड माझ्या समोरून झालीय. त्यामुळे नशीबावर मी सध्या जास्त अवलंबून आहे. जे घडतं ते चांगल्यासाठीच यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मी माझं पुढचं करिअरदेखील काही विशिष्ट पद्धतीनं ‘प्लॅन’ करीत नाहीय. जे समोरून काम येतंय, माझी निवड होतेय, यावरच मी सध्या तरी अवलंबून आहे. फक्त मला एवढंच ठाऊक आहे की, आपण चांगलं काम केलं की त्याचं फळ चांगलंच मिळतं.
चित्रपट, मालिका, वेब सीरिज यामध्ये माझं काम करणं सुरूच राहील. जे माझ्यासाठी सवयीचं आहे, त्यात मी नक्कीच यापुढेही काम करीत राहीन. पण नाटकासाठी मी कितपत बनलीय, हे मला ठाऊक नाही. कारण रंगभूमीवर काम करणार्या सगळ्यांनाच माझा सॅल्यूट आणि हॅट्स ऑफ. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकताच साडे बारा हजार प्रयोगांचा टप्पा पूर्ण केलाय. मी अजूनपर्यंत एकही प्रयोग केलेला नाही. पण मला रंगभूमीवर काम करायला आवडेल.
स्मिता पाटील, मुक्ता बर्वे, जितेंद्र जोशी हे माझे आवडते कलाकार आहेत. काळानुसार आपले ‘आयकॉन्स’ बदलत राहतात, असं मला वाटतं. अचानक कोणी तरी चांगलं काम करतं आणि मग ते तुम्हाला खूपच आवडू लागतात. असं माझ्याबाबत कायम होतं.
– सायली संजीव
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया