चित्र-चरित्र

अनिल मोहिले
अनिल मोहिले
संगीतकार
८ जुलै १९४१ --- १ फेब्रुवारी २०१२

अनिल जगन्नाथ मोहिले यांचा जन्म मुंबईत झाला. अनिल मोहिलेंचे आजोबा पंढरीनाथ मोहिले हार्मोनियम वाजवत, तर वडील बुलबुलतरंग आणि बासरी वादन करीत असत. वडिलांकडे वाद्ये शिकण्यासाठी खूप लहान मुले येत असत. वयाच्या सातव्या वर्षापासूनच अनिल मोहिले सर्व प्रकारची वाद्ये वाजवत होते. सातव्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवर लहान मुलांच्या ‘गंमत-जंमत’ कार्यक्रमात तबला वाजवला.
बाराव्या वर्षापासून दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयाच्या मंगेश तेंडुलकरांकडे त्यांनी व्हायोलिनचे प्राथमिक शिक्षण घेतले. पंधराव्या वर्षी ते प्रथम श्रेणीत संगीत विशारद परीक्षा उत्तीर्ण झाले. पं. गजाननबुवा जोशींचे शिष्य गणेश लिमये यांच्याकडेही ते काही काळ शिकले. बी.आर. देवधरांच्या ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’चे विष्णुशास्त्री पंडित यांच्याकडून अनिल मोहिलेंनी व्हायोलीनची दाक्षिणात्य पद्धत आत्मसात केली. अनिल मोहिले यांना १९५९ साली आकाशवाणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आणि आकाशवाणी स्टाफ आर्टिस्ट म्हणून ते काम करू लागले. तेथे त्यांना अनेक गायकांना साथ करण्याची संधी मिळाली. खूप चांगल्या चाली करायला मिळाल्या आणि चांगल्या संगीतकारांची काम करण्याची पद्धत जवळून बघता आली. त्यांनी स्वत: काही भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या आणि नामवंत वाद्यवृंदांच्या संचालनाचे कामही पाहिले. श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, यशवंत देव, सुधीर ङ्गडके, राम कदम, श्रीकांत ठाकरे, एस.एन. त्रिपाठी, चित्रगुप्त, अविनाश व्यास, इक्बाल कुरेशी, खय्याम, एस.डी. बर्मन यांच्यासमावेत त्यांनी काम केले.
आकाशवाणीत दहा वर्षे काम करून त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ संगीतकार होण्याचे ठरवले. १९८७ साली ‘चल रे लक्षा मुंबईला’ या चित्रपटापासून ‘दे दणादण’ (१९८७), ‘वहिनी’ (१९८७), ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ (१९८७), ‘घोळात घोळ’ (१९८८), ‘चंबूगबाळे’, ‘थरथराट’, ‘नवरा बायको’, ‘हमाल दे धमाल’ (१९८९), ‘अफलातून’, ‘धुमाकूळ’, ‘कुठं कुठं शोधू तिला’ (१९९०), ‘जिवा सखा’, ‘माहेरची साडी’, ‘एक फुल चार हाफ’ (१९९१), ‘जगावेगळी पैज’, ‘झपाटलेला’, ‘रामरहिम’, ‘ताईच्या बांगड्या’ (१९९३) इत्यादी चित्रपटांना मोहिले यांनी संगीत दिले.
लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमात त्यांना महत्त्वाचे स्थान होते. याच कार्यक्रमादरम्यान त्यांची अरुण पौडवाल यांच्याशी ओळख झाली आणि मग ‘अनिल-अरुण’ संगीतकारद्वयीने अनेक चित्रपटांना संगीत दिले.
मुंबई विद्यापीठात सुरू केलेल्या ‘संगीत दिग्दर्शन आणि संयोजन’ या अभ्यासक्रमाचे पहिले संचालक म्हणून अनिल मोहिलेंची नियुक्ती झाली होती. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे त्यांचे आकस्मिक निधन झाले.
- मधू पोतदार



चित्र-चरित्र