चित्र-चरित्र

वैभव जोशी
वैभव जोशी
कवी-गीतकार
२ जुलै

ओवी,अभंग,अंगाई ते लावणी,गझल, रुबाई असे जवळजवळ सर्वच काव्यप्रकार हुकुमीपणे हाताळणा-या वैभव जोशी यांनी चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमांसाठी भरपूर लिखाण केले आहे. वैभव जोशी यांच्या कविता, गझल रुबायांशी रसिक परिचित आहेत ते,"सोबतीचा करार","इर्शाद" इ.कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या कविता गझल्स सादर करत असतात. त्यांच्या लिहिलेल्या चित्रपटातील गाण्यांमध्ये, दूरदर्शन मालिकांच्या शीर्षक गीतांमध्येसुध्दा दर्जेदार काव्यगुण अंगभूत असतात. वैभव जोशी यांनी आपल्या कविता वाचनाचे कार्यक्रम देशविदेशात सादर केले आहेत. आशा भोसले, उ. रशीदखाँ, शंकर महादेवन, रेखा भारद्वाज, राहुल देशपांडे, महेश काळे, हृषीकेश रानडे, बेल शेंडे, वैशाली सामंत अशा पट्टीच्या गायकांनी त्यांच्या कवितांना न्याय दिला आहे. 'सविता दामोदर परांजपे' सिनेमात 'वेल्हाळा' आणि 'जादुगिरी', 'पोश्टर गर्ल' सिनेमात 'रखुमाई', 'मुरांबा' सिनेमात 'मुरांबा' हे तसेच 'होम स्वीट होम' सिनेमातील 'हाय काय नाय काय', 'नात्यांचं रुटीन चेकअप' 'साजन माझा' हा अल्बम, 'तुला पाहते रे' मालिकेचं 'तुला पाहते रे' हे शीर्षकगीत ही गाणी वैभव जोशी यांनी लिहिली आहेत. वैभव जोशी यांनी 'होम स्वीट होम’च्या गाण्याच्या बरोबर 'होम स्वीट होम'ची पटकथाही लिहीली आहे.२०१८ मध्ये त्यांना "असेही एकदा व्हावे" या चित्रपटातील 'भेटते ती अशी' या गीतासाठी उत्कृष्ट चित्रपट गीतलेखनासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा,चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा ग.दि.माडगूळकर पुरस्कार मिळाला होता.

- संजीव वेलणकर, पुणे



चित्र-चरित्र