चित्र-चरित्र

इलाई राजा
इलाई राजा
संगीतकार
२ जून १९४३

इलाई राजा यांचे पूर्ण नाव डॅनिअल राजैय्या. तीन दशकांच्या आपल्या संगीतप्रवासात इलाई राजा यांनी ९५० हून अधिक सिनेमांना संगीत दिले आहे. 'सदमा', 'अप्पूराजा', 'हे राम', 'शिवा', 'अंजली' या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. चौकटीबाहेरचे संगीत हे इलाई राजा यांची खासियत आहे. दाक्षिणात्य सिनेमासृष्टीप्रमाणेच हिदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले आहे. तसेच गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘हॅलो जयहिंद’ या मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. भारतीय संगीताला पाश्चिमात्य देशात महत्त्व मिळवून देणाऱ्या संगीतकारांमध्ये इलाई राजा यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जाते. भारतीय संगीतात पाश्चिमात्य वाद्य वापरण्याचा ट्रेंड त्यांनी रुजू केला. तेलगू, कन्नड, मल्याळम यांसारख्या दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांना सुमधूर संगीत देऊन इलाई राजा त्यांच्या नावाप्रमाणेच 'दाक्षिणात्य संगीताचा राजा'' झाला. 'अन्निकली' या तामिळ चित्रपटापासून सिनेजगतात इलाई राजा यांनी पहिल्यांदा संगीत दिले. त्यानंतर चित्रपटातील त्यांची गाणी ही त्या चित्रपटाची जमेची बाजू म्हणून ओळखली जाऊ लागली. चित्रपटसृष्टीत नव्याने येणा-या संगीतकारांसाठी इलाई राजा आदर्श मानतात. इलाई राजा यांच्या प्रतिभेची पोचपावती म्हणून भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार देऊन गौरविले. तसेच आतापर्यंत त्यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनमधील ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक या जगद्विख्यात संगीत महाविद्यालयाने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविले आहे.
- संजीव वेलणकर, पुणे



चित्र-चरित्र