चित्र-चरित्र

दिनकर पाटील
दिनकर पाटील
दिग्दर्शक, लेखक, पटकथालेखक
६ नोव्हेंबर १९१५ --- २१ मार्च २००५

दिनकर दत्ताजी पाटील यांचा जन्म चिकोडी तालुक्यातल्या बेनाडी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. मात्र आध्यात्मिक शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आपल्या मामाकडे आले आणि त्यांनी विद्यापीठ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मा. विनायक हे दिनकर पाटील यांच्या वर्गाला मराठी शिकवत. त्या काळात गजानन जागीरदारही या शाळेत शिक्षक म्हणून काम करत. त्या काळात वि.स. खांडेकर आणि ना.सी. फडके हे विद्यार्थ्यांचे आवडते लेखक होते. विद्यापीठ हायस्कूलमधील साहित्यप्रेमी विद्यार्थी दर रविवारी मा. विनायक यांच्याकडे जमत. मा. विनायक ‘किर्लोस्कर’मध्ये छापून आलेल्या फडके आणि खांडेकर यांच्या कथा त्यांना वाचून दाखवत. अशा प्रकारे दिनकर पाटील यांच्यामधील साहित्यिक घडण्यास सुरुवात झाली.

उच्च शिक्षणासाठी दिनकर पाटील यांनी राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या ‘राजारामीयन’ मासिकाचे संपादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ना.सी. फडके यांच्याबरोबर कवी माधव ज्युलियनही या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. या मोठ्या साहित्यिकांच्या प्रभावाने दिनकर पाटील यांनी लिहिण्यास सुरुवात केली. ‘सेवक’, ‘सत्यवादी’ या वृत्तपत्रातून लेखन करण्यास त्यांनी सुरुवात केली. लवकरच ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या कथास्पर्धेत दिनकर पाटील यांच्या ‘एरीना’ या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले आणि लेखक म्हणून त्यांना मान्यता मिळाली. या काळात ते शारदा मंडळ साहित्य संस्थाही चालवत असत. या मंडळाच्या एका कार्यक्रमात त्यांना सुमन शिंदे ही सहचरी भेटली व त्यांचे लग्न झाले.

पुढे दिनकर पाटील मा. विनायक यांच्या हंस पिक्चर्समध्ये नोकरी करू लागले. ‘हंस’चे रूपांतर ‘नवयुग’मध्ये झाले. पुढे ‘नवयुग’ कंपनी बंद पडली आणि विनायक यांनी कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओमध्ये प्रफुल्ल पिक्चर्स ही स्वत:ची संस्था सुरू केली. प्रफुल्ल कंपनीने ‘बडी मॉं’ हा हिंदी चित्रपट बनवला आणि संस्था मुंबईला हलवली, त्याबरोबर दिनकर पाटीलही मुंबईला आले. मुंबईला विनायक यांच्या ‘मंदिर’ या चित्रपटाचे काम सुरू झाले. त्याच सुमारास जुन्या हंस पिक्चर्सचे व्यवस्थापक वामनराव कुलकर्णी यांनाही विनायकरावांनी बोलवून घेतले. वामनरावांनी दिनकर पाटील यांना चित्रपटाच्या कथेविषयी विचारले, तेव्हा पाटील यांनी ‘किर्लोस्कर’मध्ये प्रकाशित झालेली ‘जय मल्हार’ ही कथा त्यांना दाखवली. वामनराव कुलकर्णी यांनी बाबूराव पेंढारकर यांना ही कथा दाखवली. पेंढारकरांनाही ही कथा आवडली. दिनकर पाटील यांनी या काळात ‘वाघ्या मुरळी’ची पटकथा लिहून ठेवली आणि संवादही लिहिले. बाबूराव पेंढारकरांनी चित्रपटाचे नाव ठेवले, ‘जय मल्हार’! या चित्रपटाचे दिग्दर्शनही दिनकर पाटील यांनीच करावे असे बाबूराव पेंढारकर यांनी सुचवले, पण विनायकरावांनी बाबूरावांना तसे करण्याची परवानगी दिली नाही. ‘दिनकर माझा साहाय्यक आहे, त्या चित्रपटाला मीच दिग्दर्शन करणार’ असे विनायकरावांनी सांगितले.

१९ ऑगस्ट १९४७ रोजी विनायकरावांचे निधन झाले आणि अपूर्ण राहिलेल्या ‘मंदिर’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी शांतारामबापूंनी दिनकर पाटील यांच्यावर सोपवली आणि दिनकर द. पाटील यांनी ‘मंदिर’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. ‘मंदिर’चे काम सुरू असतानाच ‘जय मल्हार’ पूर्ण झाला. द.स. अंबपकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. ग.दि. माडगूळकरांनी या चित्रपटासाठी ठसकेबाज लावण्या लिहिल्या होत्या. दिनकर द. पाटील यांनी लिहिलेला हा पहिलाच चित्रपट गाजला. ‘जय मल्हार’पासूनच लावणीप्रधान चित्रपटाचे नवे युग सुरू झाले. दिनकर द. पाटील हे मान्यताप्राप्त पटकथाकार झाले. वि.स. खांडेकर, ना.सी. फडके यांसारखे लेखक जरी त्यांचे आवडते असले, तरी चित्रपटाचे संवाद लिहिताना त्यांना भालजी पेंढारकरांची शैली जवळची वाटली. ‘माझं शिष्यत्व सांगणारे कोणी असोत किंवा नसोत, पण माझा खरा शिष्य कोणी शोभत असेल तर दिनकर पाटीलच.’ असे भालजी पेंढारकरांनी म्हटले होते. पण दिग्दर्शनाच्या बाबतीत मात्र दिनकरराव हे ‘विनायकरावांच्या’ परंपरेतील विद्यार्थी होते.

त्यानंतर दिनकर पाटील यांनी ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटाची कथा लिहिली. शांता शेळके आणि पी. सावळाराम यांच्याकडून त्यांनी गाणी लिहून घेतली आणि लता मंगेशकर यांनी या चित्रपटाला संगीत दिले. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला. नंतर ‘पाटलाचं पोर’ हा चित्रपटही चांगलाच यशस्वी ठरला. दिनकर पाटील यांनी लिहिलेल्या ‘वादळ’, ‘शिकलेली बायको’ या चित्रपटाचे दिग्दर्शक होते माधव शिंदे. ‘जोतिबाचा नवस’, ‘जावयाची जात’ (दिग्दर्शक कमलाकर तोरणे) या चित्रपटांना अमाप लोकप्रियता मिळाली.

दिनकर पाटील जवळपास पन्नास वर्ष चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. त्या काळात सुमारे १००हून जास्त चित्रपटांचे लेखन, ३५ चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. १० अनुबोधपट तयार केले. या व्यतिरिक्त ५ नाटके, २ एकांकिका, ४ कथासंग्रह, ४ व्यक्तिचित्र संग्रह, आणि ‘रुपेरी पडदा तंत्रमंत्र’ अशी मोठी मजल त्यांनी मारली. ‘पाटलाचं पोरं’ हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले. १९५३ साली त्यांनी दिनकर चित्र संस्थेची स्थापना केली.

दिनकर पाटील यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात ‘ग्रामीण चित्रपटांची’ मोलाची भर घातली आणि चित्रपट रसिकांच्या मनात वेगळे स्थान मिळवले. ‘उमज पडेल तर’ (१९६०), ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६२) व ‘ते माझे घर’ (१९६३) या दिनकर पाटील यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘कुंकू माझं भाग्याचं’ या चित्रपटाला फिल्मफेअर ऍवार्ड मिळाले. दिनकर पाटील यांनी त्यापूर्वीच १९५४ साली ‘तारका’ हा चित्रपट व्यवसायावरचा पहिला चित्रपट काढला होता आणि १९५५ साली भिकार्‍यांच्या जीवनावरचा ‘मूठभर चणे’ या चित्रपटांसाठी त्यांना १९८२ साली ग.दि. माडगूळकर पुरस्कार, १९९८ साली जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि १९९८ सालचा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार मिळाला होता. मराठी चित्रपट महामंडळाने ‘चित्रभूषण’ अशी पदवी त्यांना बहाल करून त्यांचा सन्मान केला होता. वयाच्या ८९ व्या वर्षी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.

- स्नेहा अवसरीकर



चित्र-चरित्र