चित्र-चरित्र

केदार शिंदे
केदार शिंदे
दिग्दर्शक
१६ जानेवारी १९७३

केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू. लहानपणापासूनच त्याला कलेची आवड होती. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्याने 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती. केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात 'बॉम्ब-ए-मेरी-जान' या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्याच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये 'आमच्यासारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दीनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत. दूरदर्शन मालिका आणि चित्रपट करतानाही त्याने हीच गोष्ट काटेकोरपणे पाळली आहे. त्यामुळे "केदार शिंदे=धमाल कॉमेडी" हे एक समीकरणच बनलंय. नाट्यसृष्टीमध्ये भरघोस यश मिळवल्यानंतर त्याने पुढचं पाऊल टाकलं ते दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात. इथेही त्याने 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय' या ‘झी मराठी’वरील मालिकांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

त्याचा पहिला चित्रपट ‘अगं बाई... अरेच्या' म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एकप्रकारची क्रांतीच होती. ह्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच 'आयटेम साँगचा वापर करण्यात आला होता. ह्या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलिवुडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे नाचली होती. ह्या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. ह्यानंतरही केदारने 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' यासारखे हिट चित्रपट दिले. २०१० मध्ये त्याने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही पदार्पण केलं. तब्बू आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत असलेला 'तो बात पक्की' या चित्रपटाचं त्यानं दिग्दर्शन केलं. परंतु या चित्रपटाला फारसं व्यावसायिक यश मिळाले नाही. केदार शिंदेने 'नाटक ना नाटक नु नाटक' असं गुजराती नाटकही दिग्दर्शित केलं. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‌‘इरादा पक्का’, ‘रंगीला रायबा’, ‘गलगले निघाले’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘खो खो’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘जत्रा’, ‌‘यांचा काही नेम नाही’ आदी मराठी चित्रपट त्यानं दिग्दर्शित केले आहेत.

अलीकडच्या काळातील त्याचा चित्रपट म्हणजे 'रंगीला रायबा'. अभिनेता भरत जाधवसोबत त्याने केलेली 'सुखी माणसाचा सदरा' ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. केदार सध्या शाहीर साबळे ह्यांच्यावरील चित्रपटाची निर्मिती करीत आहे.

-मंदार जोशीचित्र-चरित्र