दळवींचा जन्म गोव्यातील हडफडे गावचा. दळवी वेंगुर्ल्यापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील आरवली गावचे. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले आणि घरच्या दडपणामुळे मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय.मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी अभ्यास करू लागले. पण डिप्लोमा अर्धवट टाकून मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात ते रुजू झाले. तेथून ते ‘लोकमान्य’मध्ये गेले. एम.ए.साठी त्यांनी ‘इमोशन अॅन्ड इमॅजिनेशन अॅृन्ड देअर प्लेस इन लिटरेचर’ या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. अमेरिकन सरकारच्या मुंबई येथील माहिती खात्यात (युसिस) त्यांनी नोकरी स्वीकारली. लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी १९७५ साली स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
बालपणी त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. श्रमदान मोहिमेत ते उत्साहाने भाग घेत. त्यांची पहिली कथा ‘दातार मास्तर’ १९४८मध्ये ‘नवा काळ’ दैनिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या लेखणीला बहर आला आणि विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. ‘गहिवर’ (१९५६), ‘एदीन’ (१९५८), ‘रुक्मिणी’ (१९६५), ‘स्पर्श’ (१९७४) आदी १५ कथासंग्रह; ‘चक्र’ (१९६३), ‘स्वगत’ (१९६८), ‘महानंदा’ (१९७०), ‘अथांग’ (१९७७), ‘अल्बम’ (१९८३) आदी २१ कादंबऱ्या ; ‘संध्याछाया’ (१९७४), ‘बॅरिस्टर’ (१९७७), ‘सूर्यास्त’ (१९७८), ‘महासागर’ (१९८०), ‘पुरुष’ (१९८३), ‘नातीगोती’ (१९९१) आदी १९ नाटके दळवींनी लिहिली आणि त्यातील बहुतेक पुस्तके गाजली. ‘लोक आणि लौकिक’ हे प्रवासवर्णन आणि ‘सारे प्रवासी घडीचे’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे विनोदी पुस्तक वाचकप्रिय ठरले. ‘महानंदा’ तसेच ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटांसाठी त्यांनी कथा-पटकथा-संवाद लेखक म्हणून काम केले. ‘कवडसे’ या चित्रपटाची कथाही दळवी यांनीच लिहिली होती.
- संजीव वेलणकर, पुणे-