चित्र-चरित्र

यशवंत देव
यशवंत देव
संगीतकार
१ नोव्हेंबर १९२६ --- ३० ऑक्टोबर २०१८

यशवंत त्र्यंबक देव यांचा जन्म पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे झाला. त्यांचे वडील त्र्यंबक गोविंद देव हे संगीतप्रेमी होते. ते स्वतः अनेक वाद्ये उत्तमरीत्या वाजवत. यशवंत देवांचे शालेय शिक्षण प्रथम पेण खाजगी विद्यालय येथे व त्यानंतर नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव, नूतन मराठी विद्यालय, पुणे आणि चिकित्सक समूह विद्यालय, गिरगाव, मुंबई अशा विविध शिक्षणसंस्थांमध्ये झाले. ते १९४४ मध्ये चिकित्सक समूह विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा सर्व विषयांत प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. नंतर सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई आणि राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथून १९४८ मध्ये पदार्थविज्ञान आणि गणित हे विषय घेऊन त्यांनी बी. एस्सी. ची पदवी मिळवली.

शास्त्रशाखेचे विद्यार्थी असलेल्या यशवंत देव यांनी आपली कारकीर्द विशेषतः सुगम संगीतामध्ये घडवली. यशवंत देव यांच्यावर संगीताचे प्राथमिक संस्कार त्यांच्या वडिलांनी केले. त्यांच्या घरी नेहमी संगीत क्षेत्रातील दिग्ग्ज कलाकार येत असत. त्यांचे गाणे सतत कानांवर पडत असे . नकळत घडलेल्या या संस्कारांचा त्यांच्या संगीत कारकिर्दीवर मोठा प्रभाव पडला.

देवांनी निदान सुरुवातीच्या काळात पूर्णपणे संगीताला वाहून घ्यायचे असे ठरवले नव्हते, ते आपोआप घडत गेले. पुण्याला शाळेत असताना त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला होता ; पण लवकरच हे शिक्षण थांबले. स्वयंअध्ययन करून त्यांनी शास्त्रीय संगीत आत्मसात केले आणि १९६८ साली शास्त्रीय संगीताची पदवी मिळवली. नागपूर आकाशवाणीवर काम करताना त्यांनी सतारवादनामध्ये 'संगीत विशारद' ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन मिळवली. दीर्घकाळ आकाशवाणीवरची नोकरी त्यांच्या दृष्टीने एक प्रयोगशाळाच ठरली. काही काळ त्यांनी शिधावाटप कार्यालयात काम केले. नंतर एच. एम. व्ही. आणि शेवटी धारवाड, मुंबई, नागपूर या आकाशवाणी केंद्रांवर, तसेच 'विविध भारती' च्या हिंदी विभागात त्यांनी कार्यक्रम निर्माता म्हणून काम केले.

विविध भारतीवर होणाऱ्या 'रंजनी' या खास सुगम संगीताच्या कार्यक्रमासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लता मंगेशकर व आशा भोसले यांनी सादर केलेल्या गाण्यांचे ध्वनिमुद्रण यशवंत देव यांनी केले. आकाशवाणीवर काम करताना त्यांनी अनेक संगीतिका, नाटकांचे पार्श्वसंगीत, संगीत आणि स्वतंत्रपणे अनेक गीतांचे संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी १९६१-६२ मध्ये सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम 'भावसरगम' याची निर्मिती करून मराठीतल्या अनेक कवींच्या रचना रसिकांपर्यंत पोहोचवल्या. देव यांनी अनिल विश्वास यांना आपले गुरु मानले आणि त्यांच्या संगीतनियोजनातून प्रेरणा घेतली. अनिल विश्वास यांचा परिचय देवांशी आकाशवाणीवरच झाला. त्यांना १९५८ ते १९८४ इतक्या दीर्घकाळच्या आकाशवाणीवरील नोकरीत नवनवीन प्रयोग करण्याची संधी मिळाली, त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. त्यांनी १९५० पासून सुगम संगीत शिक्षणाचे वर्ग सुरु केले. सुगम संगीतातले बारकावे आणि आवाजाची योग्य तऱ्हेने जोपासना करण्यासाठी रियाजाची पद्दत यांचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात, देशभर इतकेच नव्हे, तर परदेशांतही अनेक विद्यार्थी घडवले. त्यांनी १९५७ मध्ये 'झालं गेलं विसरून जा' या चित्रपटासाठी गीतकार - संगीतकार म्हणून प्रथम काम केले. त्यानंतर 'उतावळा नारद', 'चोरावर मोर', 'कामापुरता मामा', 'सुखी संसार', 'मंत्र्यांची सून', 'कशाला उद्याची बात', 'साज' (हिंदी) आणि अलीकडच्या काळात 'जोशी की कांबळे' या चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले, तसेच गीतेही लिहिली.

चित्रपटांप्रमाणेच नाट्यक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. आजवर चाळीसहून अधिक नाटकांसाठी त्यांनी गीत, संगीत, पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी सांभाळली आहे. 'वळणाचे पाणी वळणावर', 'घनश्याम नयनी आला', 'आम्रपाली', 'बावनखणी', 'आषाढातील एक दिवस', 'सख्खे शेजारी', 'धिक ताम', 'घास रे रामा', 'चाकरमानी', 'नस्त झेंगाट', 'शेवटचे घरटे माझे', 'देवापाशी उत्तर नाही' ही त्यापैकी काही उल्लेखनीय नावे आहेत.

ख्यातनाम नर्तक सचिनशंकर यांच्या 'शिवपार्वती', 'द रेन' आणि 'कथा ही रामजानकीची' या नृत्यनाट्यांचे संगीत दिग्दर्शन देवांनी केले आहे. त्यांनी दुर्दर्शनवरींल अनेक मालिकांच्या शीर्षकगीतांना संगीत दिले, तसेच 'बहीणाबाई', 'गीतगोपाल', 'रथचक्र', 'आव्हान' अशा विशेष कार्यक्रमांनाही देवांनी संगीताचा साज चढवला आहे. अलीकडच्या काळात जुन्या जमान्यातील गाजलेल्या २८ संगीतकारांच्या ६४ गाण्यांच्या चालींवर पूर्णपणे नवीन मराठी गीते लिहिण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी केला आहे. संगीत दिग्दर्शनासाठी येणाऱ्या सदोष रचना सुधारून घेता घेता देवांमधल्या कवीला प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्वतंत्रपणे अनेक गीते लिहिली. मात्र केवळ गीतकार आणि संगीतकार एवढेच यशवंत देवांचे कर्तृत्व नाही. ते उत्तम संगीत शिक्षक व संगीत संयोजक आहेत., काव्याचे डोळस अभ्यासक आहेत, अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. 'असे गीत जन्म येते' या गीतजन्मावर आधारित व्याख्यानांचे अनेक सप्रयोग कार्यक्रम त्यांनी केले आहेत. 'घनश्याम नयनी आला' या नाटकासाठी 'देवांगिनी' या नव्या रंगाची त्यांनी निर्मिती केली. तसेच, 'अक्षरफुले' या वेगळ्या संकल्पनेवरील कार्यक्रमाचेही त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत.

सहा दशकांहून अधिक काळ यशस्वीपणे चाललेल्या त्यांच्या या संगीत प्रवासात त्यांना अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले आहेत. त्यांना १९७४ साली, 'आम्रपाली', १९८१ मध्ये 'आषाढातील एक दिवस' या नाटकांसाठी, १९८१ मध्ये 'भाई सावध व्हा' या आकाशवाणीवरील कार्यक्रमासाठी, १९८४, १९९३ मध्ये 'बावणखणी', 'सौभाग्यवती भव' या नाटकांसाठी, १९९९ मध्ये 'सख्खे शेजारी' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट संगीतकार' म्हणून, १९८१ मध्ये 'आषाढातील एक दिवस' साठी मराठी नाट्य परिषदेचा 'सर्वोत्तम गितकार' असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. याशिवाय, १९९६ मध्ये 'सु. ल. गद्रे मातुःश्री' पुरस्कार, २००१ मध्ये नाट्य परिषदेचा 'मराठी रंगभूमी सेवा कृतज्ञता' आणि महाराष्ट्र शासनाचा 'उपशास्त्रीय संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल' चा पुरस्कार, २०१० मध्ये दत्ता डावजेकर प्रतिष्ठानचा 'जीवनगौरव' पुरस्कार, आणि महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 'संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी' बद्दलचा पुरस्कार, अशी ही पुरस्कारांची मोठी यादी आहे.

मुंबई विद्यापीठ संगीत केंद्र, ना. दा. ठाकरसी विद्यापीठ संगीतविषयक अभ्यास, महाराष्ट्र राज्य चित्रपट सल्लागार मंडळ, बालभारती संगीत ध्वनिफितींविषयक सल्लागार, आकाशवाणी सल्लागार, शारदा संगीत विद्यालयाचा संगीतविषयक पदविका अभ्यासक्रम अशा अनेक ठिकाणी विशेष सल्लागार सदस्य म्हणून यशवंत देवांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. यशवंत देवांनी 'शब्दप्रधान गायकी' (राज्य पुरस्कार) आणि 'रियाजाचा कानमंत्र' ही संगीतविषयक पुस्तके, 'कधी बहर कधी शिशिर' हे आत्मचरित्रपर लेखन, 'चार लोचनांची दुनिया', 'साई गीत प्रसाद', 'या रे सारे गाऊ या', 'गाणारे शब्द' हे गीतांचे संग्रह, 'कृतज्ञतेच्या सुरी हा काव्यमय शब्दचित्रांचा संग्रह, 'ओशो ही ओशो' ही हिंदी गीतमाला, 'करून त्यांची' आणि 'जिथे गाभारा तिथेच कळस' हे दोन रुबायांचे संग्रह, प्रसिद्ध हिंदी गीतांच्या चालीबरहुकूम लिहिलेल्या मराठी गाण्यांचा संग्रह 'अक्षरफुले', तसेच 'पत्नीची मुजोरी' हा विडंबन गीतांचा संग्रह असे विपुल लेखन केले आहे. तसेच, त्यांनी जवळजवळ ४० ध्वनिफितींसाठी संगीतही दिले आहे.

आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत आपल्या क्षेत्रात घडणाऱ्या घटना, नवनवे उपक्रम, प्रयोग यांचे डोळस नजरेने त्यांनी निरीक्षण केले. संगीतकाराला अनेक वाद्यांची उत्तम माहिती आणि आकलन असले पाहिजे. चाल बांधण्यासाठी निवडलेल्या गीतातील शब्दांची बांधणी, त्यांचा आशय, तालसूचकता या सर्वांवर त्यांचे प्रभुत्व हवे. गीतातील शब्दभावाला योग्य असा वाद्यवृंद, हिंदुस्थानी आणि पार्श्चत्य स्वरलेखनपद्धती यांचा सखोल अभ्यास यांची नितांत आवश्यकता असते. हे सर्व त्यांनी स्वतः कष्टाने आत्मसात केले आहे. त्यांच्या वाटचालीत पत्नी, प्रख्यात अभिनेत्री करूणा देव यांचा त्यांना उत्तम पाठिंबा लाभला.

- संगीता बापट



चित्र-चरित्र