चित्र-चरित्र

वि. स. खांडेकर
वि. स. खांडेकर
लेखक
११ जानेवारी १८९८ --- २ सप्टेंबर १९७६

वि. स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि. स. खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांच्या कथा-कादंबर्‍यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या ‘उल्का’ या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.

खांडेकर यांनी १९३६ मधील ‘छाया’, १९३८ मधील ‘ज्वाला’ या चित्रपटाची कथा, संवाद आणि गीते लिहिली होती. गोहर गोल्ड कमिटीचे १९३६ सालच्या सर्वोत्तम चित्रकथेसाठीचे सुर्वणपदक वि. स. खांडेकर यांना ‘‘छाया’’ या चित्रपटासाठी मिळाले. बोलपट सृष्टीतले पहिले पारितोषिक. ‘ज्वाला’ हा जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपीअरच्या मॅकबेथ या नाटकावर आधारित एकमेव मराठी चित्रपट. त्यानंतर ‘सोनेरी सावली’ या चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद खांडेकर यांनी लिहिले. ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटासाठी खांडेकर कथा-पटकथा-संवाद आणि गीतलेखन केले होते.

१९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या. वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकर यांना सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.

-मंदार जोशीचित्र-चरित्र