चित्र-चरित्र

साधना सरगम
साधना सरगम
पार्श्वगायिका
७ मार्च १९७४

साधना सरगम यांचे खरे नाव साधना घाणेकर. त्यांचा जन्म दाभोळ येथे झाला. बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका होत्या. नीला यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. तर अनिल संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. त्यांनीच साधना यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती. त्यानंतर साधना सरगम यांनी १९७८ मध्ये आलेल्या फिल्म ‘तृष्णा’साठी कोरस गायले होते. त्या गाण्याचे बोल होते ‘पम परम पम बोले जीवन की सरगम’. या गाण्याला किशोर कुमार यांनी स्वरसाज चढवला होता. त्यानंतर साधना यांनी वयाच्या सातव्या व्या वर्षीपासून पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. १९८२ मध्ये आलेल्या ‘विधाता’ या चित्रपटातील ‘सात सहेलियां खडी खडी’ हे गाणे गाऊन साधना सरगम यांनी बॉलिवूडमध्ये धमाल केली होती. साधना सहा वर्षांच्या असताना त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ हे बोल असलेले गीत गायले होते. हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. दाक्षिणात्य गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या साधना पहिल्या नॉन साऊथ इंडियन गायिका आहेत.

कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहेमानपर्यंत प्रत्येकाने त्यांचे कौतुक केले आहे. उदित नारायण यांच्यासोबत ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातील गाजलेले गाणे ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गायन सुरु केले होते. आजवर 34 विविध भाषांत त्या गायल्या आहेत. ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’, ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ अशी अनेक गाणी प्रसिद्ध आहेत.

साधना सरगम यांनी अंदाजे १५०० चित्रपटात २०००च्या वर हिंदीत गाणी गायली आहेत. ५०० हून अधिक तामिळ चित्रपटात १००० च्या वर तामिळ गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. १९९४ ते २०१५ याकाळात साधना सरगम यांनी २५०० हून अधिक बंगाली गीत गायली आहेत. त्यांनी मराठी, तेलुगु , कन्नड, मल्याळम, गुजराती, नेपाली आणि अनेक प्रादेशिक भाषेत गाणी गायली आहेत. साधना सरगम यांनी ३४ भाषांत गीते गायली आहेत. साधना सरगम यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर अवॉर्डने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९८८ आणि २००४ मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. साधना यांना साऊथच्या फिल्मफेअर अवॉर्डसोबतच पाचवेळा महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. ‘सारेच सज्जन’, ‘माहेरची सावली’, ‘जोडीदार’, ‘आधार’, ‘सरीवर सरी’, ‘एक होती वादी’, ‘एवढंसं आभाळ’, ‘आईशप्पथ’ आदी मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र