चित्र-चरित्र

मास्टर कृष्णराव
मास्टर कृष्णराव
संगीतकार
२० जानेवारी १८९८ --- २० ऑक्टोबर १९७४

आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मा.मास्टर कृष्णराव. मा. कृष्णराव यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण मा.बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी ‘नाट्यकला प्रवर्तक मंडळी’ या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशी झाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या.

गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मा. कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मा.कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. मा.कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात ‘अत्रे फिल्म्स’च्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.

अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.

- संजीव वेलणकर



चित्र-चरित्र