चित्र-चरित्र

वसंत देसाई
वसंत देसाई
संगीतकार
९ जून १९१२ --- २२ डिसेंबर १९७५

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच नाट्यक्षेत्रात अभिजात शास्त्रीय संगीताची गाणी देणारे आणि म्हणूनच स्वत:चे खास स्थान निर्माण करणारे संगीतकार म्हणजे वसंत कृष्णा देसाई. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील सोनवडे या गावी झाला. लहानपणापासूनच व्यायामाची आवड असल्यामुळे शालेय शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंतच झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी उस्ताद अलम खॉं यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आणि नंतर उस्ताद इनायत खॉं यांच्याकडे ते गाणे शिकले. ध्रुपद-धमार या शास्त्रीय गायनपद्धतीसाठी त्यांनी डागर बंधूंकडे शिक्षण घेतले.
उत्तम गळा, दमदार आवाज, कमावलेले शरीर आणि जबरदस्त आलापी याबरोबरच गुरूंकडे केलेला नियमित रियाज, यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम तयार झाली होती. त्यानंतर ते ठिकठिकाणी गाण्याच्या मैफली करू लागले. त्यामुळे त्यांना इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे गाण्यासाठी बोलावले. तेथे त्यांनी स्वत: संगीत देऊन स्वत:च्याच आवाजात अनेक गाणी सादर केली.
देसाई १९३० मध्ये ‘प्रभात फिल्म कंपनी’त नोकरीला लागले. परंतु उत्तम शरीरयष्टी लाभली असल्याने, आपण चित्रपटात अभिनय करावा असे त्यांना वाटत होते व त्यानुसार ‘खुनी खंजर’ या मूकपटात त्यांनी भूमिका केली. १९३२ साली प्रभात फिल्म कंपनीच्या ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या बोलपटात त्यांनी भूमिका केली. शिवाय चित्रपटातले ‘जय जय राजाधिराज’ हे गाणेही त्यांनी गायले. नंतर ‘धर्मात्मा’, ‘कुंकू’, ‘माझा मुलगा’, ‘संत ज्ञानेश्वर’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. ‘राजकमल’चा ‘लोकशाहीर राम जोशी’ हा वसंत देसाईंनी संगीत दिलेला पहिला मराठी चित्रपट, मात्र त्यापूर्वी अकरा वर्ष ‘हंस पिक्चर्स’च्या मा. विनायक निर्मित ‘छाया’ चित्रपटातील दोन गाण्यांना त्यांनी संगीत दिले होते. ‘श्याम माझा पाहिला’ आणि ‘घनहीना ललनांना’ या दोन गाण्यांना त्यांनी चाली दिल्या होत्या. त्यानंतर १९५२ साली आचार्य अत्रेंनी वसंत देसाईंवर ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाचे संगीत सोपवले. या चित्रपटात बारा गाणी होती. नंतर आचार्य अत्रेंनी वसंत बापटांच्या मदतीने ‘श्यामची आई’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. वसंत देसाई यांच्यावर या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी होती. या चित्रपटाने पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक पटकावले, हे सर्वज्ञात आहे. या चित्रपटाचे संगीत अविस्मरणीय ठरले. त्यानंतर त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या ‘माझी जमीन’ या चित्रपटाला संगीत दिले. नंतर १९५४ साली दिग्दर्शक माधव शिंदे आणि लता मंगेशकर यांची निर्मिती असलेल्या ‘सुरेल चित्र’ संस्थेच्या ‘कांचनगंगा’ या चित्रपटालाही वसंत देसाईंनीच संगीत दिले. भालजींची कथा, पी. सावळाराम यांची सात गाणी या चित्रपटात होती. चित्रपटातली ‘बोल वीणे बोल’, ‘शाम सुंदर नयन’ ही गाणी शास्त्रीय रागदारीवर आधारित होती. १९५५ साली भालजी पेंढारकरांच्या ‘येरे माझ्या मागल्या’ या विनोदी चित्रपटाला संगीत दिल्यानंतर वसंत देसाईंनी हिंदी चित्रपटांना संगीत दिले. यामध्ये राजकमल, वाडिया, फेमस, मिनर्व्हा, प्रकाश पिक्चर्स, प्रफुल्ल पिक्चर्स यांसारख्या हिंदी चित्रपट संस्थांच्या जवळपास २५ चित्रपटांना संगीत दिले.
१९६० साली वसंत देसाईंचे मित्र गजानन जागीरदार यांनी ‘उमाजी नाईक’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट वसंत देसाईंकडे सोपवला. त्यानंतर १९६२ साली शास्त्रोक्त संगीताचा अतिरेक करणार्‍यांवरती विडंबन कथा असणारा ‘बाप माझा ब्रह्मचारी’ या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. याच चित्रपटात गायक महेंद्र कपूर हे वसंत देसाईंकडे प्रथम गायले. नंतर ‘छोटा जवान’, ‘मोलकरीण’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, (१९६४) शांतारामबापूंच्या ‘इये मराठीचिये नगरी’ अशा बर्‍याच चित्रपटांना वसंतरावांनी संगीत दिले. शांतारामबापूंनी ‘इये मराठीचिये नगरी’ हा चित्रपट ‘लडकी सह्याद्री की’ या नावाने हिंदीतही काढला. १९६२ साली सूरसिंगार संसदने या चित्रपटाच्या संगीत नियोजनासाठी वसंत देसाईंना ‘डॉ. बृहस्पती पारितोषिक’ दिले.
‘धन्य ते संताजी धनाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट, तसेच ‘लक्ष्मणरेषा’ अशा चित्रपटांनाही देसाईंनी संगीत दिले. हृषीकेश मुखर्जींच्या ‘आशीर्वाद’ आणि ‘गुड्डी’ या चित्रपटांनाही संगीत दिल्यानंतर १९७४ साली देसाईंनी ‘बायांनो नवरे सांभाळा’ या चित्रपटाला संगीत दिले. या चित्रपटाला तेराव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट संगीताचे पारितोषिक मिळाले. ‘उभी अशी त्रैलोक्यसुंदरी’ या गीताला आणि संगीत दिग्दर्शनासाठी वसंत देसाई यांना ‘हरिदास पारितोषिक’ मिळाले होते. ‘तूच माझी राणी’ हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपट संगीताशिवाय अनेक नाटकांनाही वसंत देसाईंनी संगीत दिले. १९६० साली ‘पंडितराव जगन्नाथ’ या नाटकाला त्यांनी प्रथम संगीत दिले. नंतर ‘जय जय गोैरीशंकर’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘प्रीतिसंगम’, ‘मृत्युंजय’, ‘स्वरसम्राट तानसेन’ यांसारख्या एकूण पंधरा नाटकांना १९६० ते १९७५ या काळात त्यांनी अप्रतिम संगीतरचना बांधून दिल्या. त्यापैकी ‘प्रीतिसंगम’ या नाटकाचे संगीत गाजले. त्यांनी फिल्म्स डिव्हिजनच्या लघुपटांचे संगीत दिग्दर्शन केले. नृत्य-संगीतप्रधान आणि अनेक भावगीतांना वसंत देसाईंनी संगीत दिले.
चित्रपटाला पार्श्‍वसंगीत देण्यातही वसंत देसाई यांचा हातखंडा होता. स्वत: संगीत दिग्दर्शक असताना त्या चित्रपटाला तर त्यांनी संगीत दिलेच. त्याशिवाय ‘संत ज्ञानेश्‍वर’, ‘संत सखू’ (संगीतकार केशव भोळे), ‘भक्तीचा मळा’ (संगीत मा. कृष्णराव), ‘परछाई’, ‘सुबह का तारा’ (संगीतकार सी. रामचंद्र) ‘सुरंगा’ (संगीतकार एस. पुरुषोत्तम), ‘तीन बत्ती चार रस्ता’ (संगीतकार शिवराम), ‘जलजला’ (संगीतकार पंकज मलिक), ‘कश्ती’ (संगीतकार हेमंतकुमार), ‘सेहरा’ आणि ‘गीत गाया पत्थरोंने’ (संगीतकार रामलाल), अशा चित्रपटांना वसंत देसाईंनी पार्श्‍वसंगीत दिले. मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रमाची, प्रसारणाची सुरुवातच वसंत देसाईंच्या सुरावलीने झाली होती. १९६७ साली भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरवले गेले. एका गीताचे ध्वनिमुद्रण संपवून घरी परततानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
- शशिकांत किणीकर
(मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश)



चित्र-चरित्र