गायक, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक अशी चौफेर प्रतिभा असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अवधूत गुप्ते.दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही त्याने केले आहे. ‘सागरिका म्युझिक’ कंपनीच्या ‘पाऊस’ या अल्बमामार्फत गायक-अधिक-संगीतकार म्हणून अवधूतचे मनोरंजन क्षेत्रामध्ये पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंत हिच्यासोबत त्याने बनवलेला ‘ऐका दाजीबा’ हा इंडिपॉप अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला. त्यानंतर अवधूतने गेल्या दशकभरात अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले तसेच त्यामधून पार्श्वगायनही केले. ‘माधुरी’, ‘बॉईज’, ‘झेंडा’, ‘गोट्या’, ‘एक तारा’, ‘रेगे’, ‘आंबट गोड’, ‘तुकाराम’, ‘सनई चौघडे’, ‘आयडियाची कल्पना’ हे अवधूतने संगीतबद्ध केलेले काही महत्त्वाचे चित्रपट. २०१० साली चित्रपटगृहांत झळकलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांमधील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या ‘झेंडा’ या चित्रपटाची त्याने निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यानंतर त्याने ‘मोरया’, ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’, ‘कान्हा’ या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. विविध वाहिन्यांवरील रिअॅलिटी शोमध्ये त्याचा परीक्षक म्हणूनही समावेश असतो.
अवधूत गुप्ते ह्यांनी २०२१ मध्ये संगीतबद्ध केलेली 'पांडू' ह्या चित्रपटाची गीते खूप गाजली होती. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पावनखिंड' आणि 'धोंडी चंप्या एक प्रेमकथा' या चित्रपटांसाठी अवधूत गुप्ते यांनी पार्श्वगायन केले होते.
-मंदार जोशी