चित्र-चरित्र

व्यंकटेश माडगूळकर
व्यंकटेश माडगूळकर
कथा-पटकथा-संवाद लेखक
६ जुलै १९२७ --- २८ ऑगस्ट २००१

कथा, कादंबर्‍या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी कथा-पटकथा-संवाद लिहिणारे प्रख्यात लेखक अशी व्यंकटेश माडगूळकर यांची ओळख आहे. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू होत.व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५-८५) नोकरीत होते. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत.

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), ह्या त्यांच्या कादंबर्‍या उल्लेखनीय आहेत. व्यंकटेश माडगूळकर हे १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. 'कोवळे दिवस' ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. 'पुढच पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, 'तू वेडा कुंभार', 'सती', 'पति गेले गं काठेवाडी' ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. 'कुनाचा कुनाला मेळ न्हाई' आणि 'बिनबियांचे झाड' ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली. 'प्रवास एक लेखकाचा' हे व्यंकटेश माडगूळकरांचे आत्मचरित्र आहे. जशास तसे (कथा- १९५१), पुढचं पाऊल (कथा-१९५०), रंगपंचमी (पटकथा, संवाद-१९६१), वंशाचा दिवा (कथा-१९५०), सांगत्ये ऐका (पटकथा-संवाद-१९५९), जोहार मायबाप-संत चोखामेळा (कथा), संत बहिणाबाई (कथा-पटकथा-संवाद), भल्याची दुनिया (कथा-पटकथा-संवाद), सुख आले माझ्या दारी (कथा-पटकथा-संवाद), छोटा जवान (कथा-पटकथा-संवाद), मुक्काम पोष्ट ढेबेवाडी (कथा-पटकथा-संवाद), बनगरवाडी (कथा-पटकथा-संवाद) ही त्यांची मराठी चित्रपटसृष्टीसाठीची विशेष कामगिरी.

मंदार जोशी



चित्र-चरित्र