चित्र-चरित्र

यशवंत पेठकर
यशवंत पेठकर
दिग्दर्शक
१५ मे १९०९ --- २८ एप्रिल १९९५

यशवंत विठ्ठल पेठकर यांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचे आई वडील हे विद्यापीठ शिक्षणसंस्थेत शिक्षक होते. त्यांच्या हाताखालीच मास्टर विनायक यांनी शिक्षणाचा ओनामा गिरवला होता. पेठकरही पुढे त्या शिक्षणसंस्थेत शिक्षकाची नोकरी करत होते.

मास्टर विनायकांनी १९३७ सालात ‘प्रेमवीर’ या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. त्या चित्रपटात यशवंत पेठकरांनी विनोदी खलनायकाची भूमिका उत्तम केली. पडद्यावर ओझरते दर्शन देऊन पेठकर पुढे दहा वर्षांनी चित्रपटसृष्टीत आले. १९४७ मध्ये साने गुरुजींच्या ‘रामाचा शेला’ या कादंबरीवरून प्रभात फिल्म कंपनीने ‘आगे बढो’ या चित्रपटाची निर्मिती केली. पेठकरांनी त्याचे दिग्दर्शन केले आणि तेथून पेठकरांची चित्रपटसृष्टीतील आगेकूच सुरू झाली. देव आनंद चित्रपटाचा नायक होते आणि त्या काळातील गाजलेल्या अभिनेत्री खुर्शिद या चित्रपटाच्या नायिका होत्या. प्रभातने पेठकरांना ‘अपराधी’ हा पुढला चित्रपट दिग्दर्शनासाठी मिळाला. १९४२ च्या चले जाव चळवळीवर याची चित्रकथा बांधली होती. त्यात नायक-नायिकेच्या भूमिकेत होते रामसिंग व मधुबाला आणि अच्युतराव पटवर्धनांच्या व्यक्तिरेखेशी साम्य असणारी भूमिका केली होती प्राण या नटाने. या चित्रपटात प्राण हे खलनायक नव्हते, तर एक क्रांतिकारक होते.

पेठकरांच्या कामाच्या पद्धतीवर खूश होऊन मुंबईच्या प्रकाश पिक्चर्सच्या विजय भट्ट यांनी पेठकरांना मोठा मोबदला देऊन मुंबईला आणले व ‘शादी की रात’ हा हिंदी चित्रपट त्यांच्या हातात दिला. त्यात गीता बाली, रेहमान, अरुण यांसारखे आघाडीचे कलाकार होते.

सुधीर फडके यांनी त्यांना ‘रत्नधर’ हा आपला चित्रपट दिला. चित्रपट उत्कृष्ट जमला होता, पण भागीदारांच्या भांडणामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही.

‘अपराधी’चा नायक असणार्‍या राम सिंग यांनी पेठकरांना ‘सौ का नोट’ हा आपला चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. त्यात गीता बाली, करण दिवाण, बेगमपारा हे कलाकार होते. प्रभादेवीच्या किस्मत टॉकिजचे मालक बेहराम यांना एक मराठी चित्रपट काढायचा होता. त्यांनी कथा लिहिली होती. ‘झालं गेलं विसरून जा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची, पटकथालेखनाची आणि संवाद लिहिण्याची कामगिरी बेहराम यांनी पेठकरांवर सोपवली. हा चित्रपट गाजला. उषाकिरण यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी ‘चोरावर मोर’ या आपल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून उतरली होती. पेठकरांनी यशवंत देव यांना या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी दिली.

पेठकरांनी गजानन शिर्के यांना ‘मोलकरीण’सारखा उत्तम चित्रपट काढून दिला. हाच चित्रपट पुढे त्यांनी गुजराती भाषेत ‘मोटी वा’ या नावाने काढला. त्या गुजराती चित्रपटाला गुजरात सरकारने सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट म्हणून गौरवले. पेठकरांनी पुढे ‘कधी करशी लग्न माझे’, ‘तूच माझी वहिनी’, ‘मायमाउली’, ‘सून लाडकी या घरची’ यासारखे यशस्वी चित्रपट काढले आणि चित्रपट जगतातून निवृत्ती घेतली. पुढे एका तपानंतर १९९१ साली त्यांनी निर्माते शरद वैद्य यांच्या आग्रहास्तव ‘संत नामदेव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

पेठकरांनी आपले आत्मचरित्र लिहावयास घेतले होते, पण ते पूर्ण होण्याअगोदर मृत्यूने त्यांना गाठले. चिरंजीव अविनाश पेठकर यांनी यशवंत पेठकर यांना ‘कीचकवध’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी साहाय्य केले होते.

-द. भा. सामंत



चित्र-चरित्र