चित्र-चरित्र

व्ही. शांताराम
व्ही. शांताराम
दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता
१८ नोव्हेंबर १९०१ --- २८ ऑक्टोबर १९९०

साठ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत चित्रपटमाध्यमावर जबरदस्त पकड मिळवून सातत्याने चित्रपट निर्मिती, दिग्दर्शनामध्ये ‘शांताराम टच’, मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी स्वतःच्या मालकीचा, अगदी अद्ययावत असा फिल्म स्टुडिओ, चित्रनिर्मितीपासून ते प्रदर्शनापर्यंत सार्‍या गोष्टी स्वतःपाशी बाळगणारा, चित्रपट उद्योगासाठी अहर्निश झटणारा आणि बालचित्र निर्मितीसाठी पुढाकार घेणारा अत्यंत कल्पक, धोरणी, बुद्धिमान आणि कष्टाळू निर्माता, दिग्दर्शक, संकलक व अभिनेता म्हणजे व्ही. शांताराम.

व्ही. शांताराम उर्फ शांताराम राजाराम वणकुद्रे यांचा जन्म कोल्हापूर येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती यथातथाच असल्याने शांतारामबापूंना शालेय शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचे वडील राजारामबापू यांचे कोल्हापूर येथे छोटे दुकान होते, पण ते न चालल्याने ते बंद करून त्यांनी हुबळी येथे हॉटेलचा धंदा सुरू केला. तिथे शांतारामबापू कपबशा विसळायचे काम करीत. शिवाय रेल्वेमध्ये गड्याचेही काम करत असत. दरम्यानच्या काळात त्यांनी बालगंधर्व नाटक मंडळीमध्ये प्रवेश मिळवला व ते नाटकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करू लागले. या काळात शांताराम यांचे मावसभाऊ बाबूराव पेंढारकर कोल्हापूर येथे बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत. तरुण व उत्साही शांतारामबापूंना ते महाराष्ट्र फिल्म कंपनीत घेऊन गेले. अत्यंत चिकाटीने व कष्टाळूपणे त्यांनी तिथे पडतील ती कामे केली, तरीही त्यांना सर्वप्रथम चित्रपटात पडद्यामागची कामे करावी लागली. ती व्यवस्थित होत आहेत हे पाहिल्यावर बाबूराव पेंटर यांनी त्याला ‘सुरेखाहरण’ (१९२१) या चित्रपटात कृष्णाची भूमिका दिली. त्यानंतरच्या काळात शांतारामबापूंनी महाराष्ट्र फिल्म कंपनीत अनेक छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. हळूहळू बाबूराव पेंटर यांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की, त्यांनी शांतारामबापूंना केशवराव धायबर यांच्याबरोबर ‘नेताजी पालकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली.

चित्रपटाच्या सर्व विभागांचा अभ्यास करून त्यामध्ये मिळवलेले प्रावीण्य आणि स्वतः चित्रपट दिग्दर्शन करून व तो यशस्वी झालेला पाहून मिळवलेला आत्मविश्‍वास तरुण आणि धडाडीच्या शांतारामबापूंना स्वस्थ बसू देईना. त्याच बरोबर महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये मिळत असलेली असंतोषपूर्ण वागणूक पाहून शांतारामबापूंनी भागीदारीत नवी चित्रसंस्था निर्माण करण्याचे ठरवले. भांडवलासाठी सीतारामपंत कुलकर्णी यांनाही भागीदारी देण्यात आली आणि १ जून १९२९ रोजी कोल्हापूर येथे ‘प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली.

१९२९ ते १९३२ या काळात ‘प्रभात’ने सहा मूकपट निर्माण केले. त्यापैकी पाच मूकपट शांतारामबापू यांनी दिग्दर्शन केलेले होते. ‘उदयकाल’ या मूकपटात त्यांनी शिवाजीची भूमिकाही केली होती. प्रभात फिल्म कंपनीच्या मूकपटाने शांतारामबापूंच्या नावाला स्थैर्य प्राप्त झाले. १९३२ साली ‘प्रभात’ने ‘अयोध्येचा राजा’ (मराठी) व ‘अयोध्या का राजा’ (हिंदी) हे बोलपट सादर केले. त्यांचे दिग्दर्शनही शांतारामबापू यांचेच होते. ‘प्रभात’च्या या पहिल्याच बोलपटाने सारा महाराष्ट्र ढवळून गेला होता. ‘प्रभात’मधील काळात त्यांनी ‘सैरंध्री’ (१९३३) हा सप्तरंगी बोलपट हिंदी-मराठी भाषेत सादर केला. त्यानंतर १९३४ साली पुणे येथे कंपनीचे स्थलांतर झाल्यावर ‘अमृतमंथन’, ‘धर्मात्मा’, ‘कुंकू’, ‘माणूस’, ‘शेजारी’ असे उत्तमोत्तम बोलपट त्यांनी सादर केले.

१९४२ साली प्रभात फिल्म कंपनीच्या इतर भागीदारांशी बेबनाव झाल्याने त्यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली व मुंबई येथे स्वतःचा स्टुडिओ घेऊन तेथे ‘राजकमल कलामंदिर’ ही स्वतःची चित्रसंस्था स्थापन केली. ‘लोकशाहीर राम जोशी’ व ‘अमर भूपाळी’ हे दोन चित्रपट मराठीतूनही सादर केले. स्वतःच्या चित्रसंस्थेत त्यांनी ‘भक्तीचा मळा’, ‘जीवन यात्रा’, ‘भूल’, ‘तूफान और दिया’, ‘मौसी’ वगैरे चित्रपट निर्मिले, पण त्याचे दिग्दर्शन इतरांकडे सोपवले. तसेच ‘फूल और कलियॉं’, ‘काले और गोरे’, ‘राजारानी को चाहिये पसीना’ हे तीन बालचित्रपट निर्माण केले.

१९२७ ते १९८६ या जवळजवळ साठ वर्षांच्या प्रदीर्घ काळात शांतारामबापूंनी अनेक चित्रपटांतून सामाजिक समस्या मांडल्या. धर्माबाबत अंधश्रद्धा बाळगून पशुबळी व नरबळी देऊ नका, असा संदेश त्यांनी ‘अमृतमंथन’ (१९३४) या चित्रपटातून दिला. ‘धर्मात्मा’ (१९३५) या चित्रपटाद्वारे हरिजनांचा उद्धार या महात्मा गांधींच्या शिकवणीचा पुरस्कार केला. जरठ-विवाहाची समस्या ‘कुंकू’ (१९३७) या चित्रपटात मांडली. ‘शेजारी’ (१९४१) या चित्रपटातून हिंदू-मुस्लीम ऐक्य मांडले. स्त्रीच्या आहारी गेल्याने एका साधू-संन्याशाचे पतन कसे होते, याचे चित्रण ‘पर्बतपे अपना डेरा’ (१९४४) या चित्रपटाद्वारे केले. सुप्रसिद्ध पत्रकार व चित्रनिर्माते के.ए. अब्बास यांच्या कादंबरीवरून त्यांनी ‘डॉ. कोटणीस की अमर कहाणी’ (१९४६) या चित्रपटात ध्येयासक्त असणार्‍या तरुण भारतीय डॉक्टरचे चित्रण केलेले आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर भारतामध्ये काळा बाजार बोकाळला होता; त्यामुळे समाजाला कसा धोका संभवतो ही गोष्ट अत्यंत चातुर्याने त्यांनी ‘अपना देश’ (१९४९) मध्ये मांडली. बहुभाषिकांनी एकत्रित आल्यास समाजाची जडणघडण चांगली होईल, असा संदेश ‘तीन बत्ती चार रास्ता’ (१९५३) या चित्रपटात दिला. खाण कामगारांच्या समस्यांना, ‘सुरंग’ (१९५३) या चित्रपटाद्वारे हात घातला. ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५) या भारतातील पहिल्या रंगीत चित्रपटाद्वारे त्यांनी अभिजात संगीत आणि तांत्रिक छायाचित्रण पडद्यावर आणले. ‘झनक झनक’ने उत्पन्नाचे उच्चांक गाठले. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मित्रांनी त्यांना समजावून सल्ला दिला की यशाचे शिखर तुम्हाला दिले आहे. शिवाय यापुढे नवीन काय देणार, तेव्हा आत्ताच निवृत्ती घ्या. नवीन काय देणार? या प्रश्नाने शांतारामबापू विचारात चांगलेच गर्क असताना औंधराजाने कैदी सुधारण्याची काढलेल्या शाळेसंबंधी ग.दि. माडगूळकरांनी त्यांना माहिती दिली. त्यावरच शांतारामबापूंनी ‘दो आँखे बारह हात’ हा अलौकिक चित्रपट बनवला. कथा-पटकथा ग.दि.मा. यांचीच होती. ‘दो आँखे’ने बर्लिन महोत्सवात पारितोषिक पटकावून शांतारामबापूंच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्यानंतर पुन्हा शांतारामबापूंनी ‘नवरंग’ हा तांत्रिक चित्रपट काढला, तर ‘पिंजरा’ (१९७२) हा मराठीतील पहिला सप्तरंगी चित्रपट हिंदी भाषेतही सादर केला. त्यानंतर सातत्याने ते मराठी चित्रपट देत राहिले. ‘झंझार’ (१९८७) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट.

चित्रपटसृष्टीसाठी व्ही. शांताराम यांनी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण कामगिरी केली. फिल्म ऍडव्हायझरी बोर्ड, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर या संस्थांचे अध्यक्षस्थान त्यांनी काही काळ भूषवले. तसेच भारतीय चित्रपट निर्मात्यांची संस्था ‘इम्पा’ व भारतीय चित्रपट समस्यांना तोंड फोडणारी एकमेव संस्था ‘इम्पडा’ या संस्थांचेही अध्यक्षस्थान त्यांनी सांभाळले. ‘फिल्म प्रोड्यूसर गिल्ड’चे ते सर्वप्रथम अध्यक्ष होते. भारत सर चिल्ड्रन ङ्गिल्म सोसायटीचे ते अध्यक्ष होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीवर प्रकाश पाडावा, या उद्देशाने त्यांनी १९८६ साली ‘शांतारामा’ हे आत्मचरित्रही लिहिले. नागपूर विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन त्यांचा बहुमान केला होता, तर भारत सरकारतर्फे त्यांना १९९२ साली मरणोत्तर पद्मविभूषण व १९८६ साली दादासाहेब फाळके पारितोषिक देऊन सन्मानित केले होते. वयाच्या ९० वर्षी वृद्धापकाळामुळे त्यांचा मुंबई येथे मृत्यू झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा एक प्रचंड आधारस्तंभ कोसळला.

- शशिकांत किणीकर



चित्र-चरित्र