चित्र-चरित्र

स्नेहल भाटकर
स्नेहल भाटकर
संगीतकार
१७ जुलै १९१९ --- २९ मे २००७

वासुदेव गंगाराम भाटकर उर्फ स्नेहल भाटकर यांचा जन्म मुंबईत झाला. भाटकर यांच्या आईला संगीताची आवड होती त्यामुळे घरात बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार होत गेले. त्यानंतर दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले आणि त्या सुरुवातीच्या काळात भजनांचे कार्यक्रमही करू लागले.
हार्मोनियमवादक म्हणून स्नेहल भाटकर यांना एच.एम.व्ही. कंपनीत चाळीस रुपये पगारावर वयाच्या विसाव्या वर्षी नोकरी मिळाली. एच.एम.व्ही.त काम करत असताना केसरबाई केरकर, मल्लिकार्जुन मन्सूर, बडे गुलाम अली खॉं यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांना साथ करण्याची संधी त्यांना मिळाली. अनेक मोठ्या कलाकारांचे गाणे ऐकता ऐकता त्यांचीही संगीताची समज वाढत गेली, परिपक्व झाली आणि कंपनीत संगीत दिग्दर्शक अशी बढतीही मिळाली. ते १९४९ सालापर्यंत एच.एम.व्ही. कंपनीत कार्यरत राहिले.
दरम्यानच्या काळात, एच.एम.व्ही.मध्ये असतानाच निर्माता-दिग्दर्शक केदार शर्मा यांनी एच.एम.व्ही.कडे उत्तम हार्मोनियम वादकासाठी विचारणा केली. त्या वेळी केदार शर्मा ‘कलियॉं’ नावाचा चित्रपट बनवत होते. एच.एम.व्ही.ने केदार शर्मा यांना स्नेहल भाटकर यांचे नाव सुचवले. केदार शर्मा यांनी ‘कलियॉं’चे संगीत दिग्दर्शक सी. एस. चिश्ती यांची आणि स्नेहल भाटकर यांची भेट घडवली. केदार शर्मा यांना ‘कलियॉं’च्या ग्रामोङ्गोन ध्वनिमुद्रिका काढण्यासाठी एखाद्या संगीतकारांची मदत हवी होती. चिश्ती यांनी चित्रपटासाठी बनवलेली गाणी चार ते पाच मिनिटांची होती. भाटकरांनी चिश्तींच्या संगीतरचनेत थोडाफार बदल करून प्रत्येक गाणे तीन मिनिटांचे केली. भाटकरांचे हे काम लक्षात घेत केदार शर्मांनी त्यांना पुढच्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करण्यासाठी विचारले. मात्र भाटकर एम.एम.व्ही.त नोकरी करत असल्याने कंपनीने आक्षेप घेतला. नोकरीतील स्थैर्य की चित्रपटातली आर्थिक सुबत्ता? यांचा विचार करताना चित्रपटाचे संगीत की नोकरी याबद्दल भाटकर यांचा निर्णय होत नव्हता. शेवटी कुणाच्या तरी सल्ल्यावरून त्यांनी ‘वासुदेव’ या टोपणनावाने १९४६ साली प्रदीप पिक्चर्सच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ या हिंदी आणि मराठी चित्रपटासाठी सुधीर ङ्गडकेंसोबत संगीत दिग्दर्शन केले. नंतर १९४७ साली बी. वासुदेव या टोपणनावाने त्यांनी केदार शर्मा यांच्या ‘नीलकमल’ या चित्रपटाला संगीत दिले. त्यानंतर त्यांनी एच.एम.व्ही. कंपनीतली नोकरी सोडली.
१९४८ साली केदार शर्मा यांच्या ‘सुहाग रात’ या चित्रपटाला स्नेहल भाटकर यांनी संगीत दिले. या वेळी त्यांनी आपले नाव पुन्हा बदलले आणि आपली मुलगी स्नेहलता हिच्या नावावरून ‘स्नेहल भाटकर’ हे नाव घेतले. स्नेहल भाटकर यांनी ‘हमारी बेटी’ (१९५०), ‘भोला शंकर’ (१९५१), ‘गुनाह’ (१९५३), ‘आज की बात’ (१९५५), ‘बिंदिया’ (१९५५), ‘डाकू’ (१९५५), ‘दिवाली की रात’ (१९५९), ‘जलदीप’ (१९५६) यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले. १९४८ साली प्रभातच्या ‘संत तुकाराम’ चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रदर्शित झाली, त्यालाही स्नेहल भाटकर यांनीच संगीत दिले होते. १९६१ साली ‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटाला स्नेहल भाटकर यांनी संगीत दिले. याच चित्रपटातले ‘कभी तनहाईयोमें यूँ हमारी याद आयेगी...’ हे मुबारक बेगम यांनी गायलेले गीत सर्वाधिक गाजले. स्नेहल भाटकरांच्या कारकिर्दीतले हे अविस्मरणीय गीत ठरले. भाटकर यांनी मराठी चित्रपटांना, नाटकांनाही संगीत दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवायन’ या संगीतिकेचेही त्यांनी अनेक प्रयोग केले. ‘मायामच्छिंद्र’, ‘नंदकिशोर’, ‘संत बहिणाबाई’, ‘तुका झालासे कळस’, ‘चिमुकला पाहुणा’, ‘मानला तर देव’, ‘बहकलेला ब्रह्मचारी’, प्रभातचा शेवटचा चित्रपट ‘मी गुरुदेव दत्त’ अशा अनेक मराठी चित्रपटांना भाटकरांनी संगीत दिले. त्यापैकी ‘अन्नपूर्णा’ या चित्रपटाला दिलेल्या संगीतासाठी त्यांना सूरसिंगारतर्फे पारितोषिक दिले गेले. १९९४ साली त्यांना ‘कंठसंगीत’ हा पुरस्कार मिळाला आणि २००५ साली त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ मिळाला. नाटक-चित्रपट क्षेत्रापासून दूर झाल्यानंतरही त्यांनी आकाशवाणीवर गीतांचे, भजनांचे कार्यक्रम केले. वृद्धापकाळाने मुंबई येथे स्नेहल भाटकर यांचा मृत्यू झाला. मात्र ‘हमारी याद आयेगी’ हे भाटकर यांनी संगीत दिलेले गाणे रसिकमनावर चिरंतन कोरले गेले आहे.
- शशिकांत किणीकर (सौजन्य : विवेक चरित्र कोश)



चित्र-चरित्र