चित्र-चरित्र

नानासाहेब सरपोतदार
नानासाहेब सरपोतदार
अभिनेता, दिग्दर्शक
११ फेब्रुवारी १८९६ --- २३ एप्रिल १९४०

नानासाहेब सरपोतदार हे साखरप्याजवळच्या नाणीज आणि नांदवलीचे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे नोकरी करत शिकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण त्यात यशस्वी न झाल्यामुळे त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. गणपतराव जोशी यांच्या ओळखीने ते बाबूराव पेंटर यांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त १९१९ साली नट आणि कथालेखक म्हणून रुजू झाले. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त ते नटांना अभिनयाचे प्रशिक्षण देत आणि बाबूराव पेंटर यांच्या हाताखाली चित्रपट माध्यमाचे धडे घेत. १९२५ साली त्यांनी तलगिरींच्या ‘डेक्कन पिक्चर्स’मध्ये दिग्दर्शक म्हणून प्रवेश केला आणि 'प्रभावती ' (१९२५) हा चित्रपट दिग्दर्शित केला. तलगिरींनी ‘डेक्कन पिक्चर्स’ ही संस्था बंद करून पुणे येथे खडकीला ‘युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट'ची स्थापना केली.

सरपोतदारांनी तेथे जवळजवळ दोन वर्षे काम केले. तेथे त्यांनी काही मूकपट दिग्दर्शित केले आणि त्या चित्रपटांचे पटकथालेखनही केले. सरपोतदारांनी ‘युनायटेड पिक्चर्स’साठी 'महाराची पोर 'हा अस्पृश्यांची दुर्दशा चित्रित करणारा चित्रपट काढला. त्या काळात असा चित्रपट काढणे हे एक धाडसच होते. 'महाराची पोर ' हा चित्रपट पाहून सरोजिनी नायडू, बॅ. बॅष्टीस्टा, शौकत अली यासारख्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी सरपोतदारांचे खूपच कौतुक केले.

केवळ एक रुपया भांडवलावर १९२७ साली सरपोतदारांनी मुंबईच्या कोहिनूर सिनेमाचे मालक कान्हेरे यांच्या मदतीने 'आर्यन फिल्म कंपनी'ची स्थापना केली. त्यांचा पहिला चित्रपट होता 'हर हर महादेव '. या चित्रपटाच्या शीर्षकालाच सेन्सॉरने हरकत घेतली. 'मराठ्यांच्या ज्या रणगर्जनेने मोगलांची सिंहासने हादरली, तो हर हर महादेव लवकरच पाहा ' या चित्रपटाच्या जाहिरातीतील मजकुराने आपला पराक्रम दाखवला. मग 'हर हर महादेव'चे शीर्षक 'नमक हराम 'असे करण्यात आले. सरपोतदारांनी 'रायगड पतन', 'रक्ताचा सूड', 'चंद्रराव मोरे', 'ताई तेलीण' हे चित्रपट दिग्दर्शित केले. तसेच 'उमाजी नाईक', 'थोरातांची कमळा', 'छत्रपती संभाजी' या चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले. 'आर्य महिला' हा त्यांचा पुढील चित्रपट मद्याचे दुष्परिणाम दाखवणारा चित्रपट होता . त्याबद्दल बालगंधर्व व अ . ब. कोल्हटकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. १९२८ साली त्यांनी 'मराठ्याची मुलगी ', 'गनिमी कावा ', 'उडाणटप्पू ', 'पतितोद्धार 'हे मूकपट दिग्दर्शित केले. त्यानंतर त्यांनी 'समशेरबहादूर', 'ठकसेन राजपुत्र', 'चतुर सुंदरी', 'चाँदबीबी', 'भवानी तलवार' असे अनेक मूकपट तयार केले .

१९३१ साली आपल्याकडे बोलपटांचे युग सुरू झाले. सरपोतदारांनी आपली कंपनी बंद केली आणि दादासाहेब तोरणे यांना आपला स्टुडिओ विकला. तोरणे यांनी 'सरस्वती सिनेस्टोन स्टुडिओ ' असे त्या स्टुडिओचे नामांकन केले. इम्पीरियलचा 'रुक्मिणीहरण ' (१९३३) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला बोलपट. ते या चित्रपटाचे लेखक व गीतकारही होते. याशिवाय 'देवकी ' , 'चलता पुतळा ' हे अन्य बोलपटही त्यांनी दिग्दर्शित केले. सरपोतदारांनी बाबुराव पटेल यांच्यासाठी 'पृथ्वीराज संयोगिता ' हा बोलपट निर्माण केला. यात रफिक भजनची याने कवीची भूमिका करून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सरपोतदारांनी केलेला हा बोलपट फारसा चालला नाही . त्यानंतर त्यांनी मुंबईच्या इंपिरिअल फिल्म कंपनीसाठी 'रुक्मिणी स्वयंवर ' आणि 'देवकी' असे दोन चित्रपट केले. त्यांनी दादासाहेब तोरणे यांच्या 'श्यामसुंदर ' या बोलपटाचा काही भाग दिग्दर्शित केला. केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडून मराठी, हिंदी आणि तमिळ भाषेतून 'नंदकुमार ' हा बोलपट निर्माण करायचे ठरवले . सरपोतदारांनी तामिळ 'चि . नंदकुमार ' या चित्रपटाचे दिग्दर्शन करावे , असे धायबरांनी सुचवले. तमिळ भाषेतील 'नंदकुमार'ला मद्रासच्या ए. व्ही. एम. च्या मालकांनी भांडवलाची मदत केली होती, तसेच दक्षिणेकडील प्रांतात त्या बोलपटाचे वितरण करण्याचे ठरवले होते. मराठी व हिंदी 'नंदकुमार ' चित्रपट फार चालला नाही. तमिळ 'नंदकुमार ' दक्षिण प्रांतात खूपच चालला आणि ए. व्ही. एम. या कंपनीचा घट्ट पाय रोवला गेला. सरपोतदारांनी पुढे तोरणे यांच्यासाठी एक मराठी ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित करून दिला. डी. बिलिमोरिया, पार्श्वनाथ आळतेकर , भाऊराव दातार, ललिता पवार, जी. आर. सॅंडो , बंडोपंत सोहनी अशी नटरत्ने चित्रपटसृष्टीला मिळवून दिली. चित्रपटाचा व्यवसाय अनिश्चित असल्यामुळे चित्रपटसृष्टीचा संन्यास घेऊन त्यांनी पुण्यात 'पूना गेस्ट हाऊस'ची स्थापना केली आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत पुण्यात आल्यावर त्यांना राहण्यासाठी हक्काची सोय केली. 'बाजीरावचा बेटा', 'उनाड पेंद्या' आणि 'चंद्रराव मोरे' ही नाटके त्यांनी लिहिली.

अखेरच्या काळात मो. ग. रांगणेकरांच्या 'मौज' व 'वसुंधरा' या नियतकालिकांसाठी स्तंभलेखन केले होते. १९३८ साली त्यांनी रवींद्र पिक्चर्ससाठी 'संत जनाबाई ' या चित्रपटाचे दिग्दर्शन व त्यात खलनायकाची भूमिका केली. ‘सरस्वती सिनेटोन’साठी १९३९ साली दिग्दर्शित केलेला 'भगवा झेंडा' या त्यांच्या अखेरच्या चित्रपटामध्ये ललिता पवार, शाहू मोडक,रत्नमाला, राजा सॅन्डो, डी. बिलिमोरिया हे कलाकार होते. मधुमेहाच्या आजाराने अवघ्या ४४व्या वर्षी सरपोतदारांचे निधन झाले.

- द. भा. सामंत



चित्र-चरित्र