सातारा जिल्ह्यातल्या पितांबर मारुती काळे या चित्रपट ध्येय्यवेड्या तरुणाने चित्रपट निर्मितीचं स्वप्न उराशी बाळगून थेट कोल्हापूर गाठलं. मात्र अनेक निर्मिती संस्था, दिग्दर्शकांचे उंबरे झिजवूनही सहज काम काही मिळेना, पण शिकण्याची उर्मी आणि काम चिकाटी या गुणांमुळे त्यांना १९६८ साली सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांच्याकडे 'गणगवळण' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्यातील उपजत कलागुणांमुळे आणि मितभाषी स्वभावामुळे अनेकानेक उत्तमोत्तम चित्रपटांसाठी नावाजलेल्या दिगर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळत गेली. त्यांनी 'डोंगरची मैना', 'झाला महार पंढरीनाथ', 'लाखात अशी देखणी', 'सोंगाड्या', 'एकटा जीव सदाशिव', 'सुगंधी कट्टा', 'ग्यानबाची मेख', 'दैवत', 'सख्या साजणा', 'मानाचं कुंकू', 'धोंडी धोंडी पाणी दे', 'आली लहर केला कहर', 'हऱ्या-नाऱ्या झिंदाबाद', 'सामना', 'सर्वसाक्षी', 'धूम धडाका' आणि 'माहेरची साडी' अश्या लोकप्रिय चित्रपटांसाठी गोविंद कुलकर्णी, कमलाकर तोरणे, वसंत पेंटर, एन. एस. वैद्य, जब्बार पटेल, रामदास फुटाणे, अरुण कर्नाटकी, महेश कोठारे, विजय कोंडके यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.
त्यांची स्वतंत्र दिग्दर्शनाची कारकीर्द १९८७ साली ‘इरसाल कार्टी’ या चित्रपटाने झाली. त्यानंतर त्यांनी जवळपास ४०-५० चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून 'सर्जा राजा', 'तांबव्याचा विष्णू बाळा', 'बापू भिरु वाटेगावकर', 'सख्खा भाऊ पक्का वैरी', 'पहिली शेर, दुसरी सव्वा शेर नवरा पावशेर', 'कश्यासाठी प्रेमासाठी'!, 'संघर्ष', 'माहेरचा आहेर', 'तोचि एक समर्थ', 'आई शक्ती देवता', 'दुर्गा आली घरा', 'सौभाग्यवती सरपंच', 'तूच माझी भाग्यलक्ष्मी', 'आता लग्नाला चला', 'मी तुळस तुझ्या अंगणी', 'स्वामी माझे दैवत', 'लग्नाचा धूम धडाका', 'संसार माझे मंदिर', 'गोंद्या मारतंय तंगड', 'लग्नाची वरात लंडनच्या घरात', 'हिरवा चुडा सुवासिनीचा', 'शेगावीचा योगी गजानन', 'गाव थोर पुढारी चोर' इत्यादी चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहेत तसेच त्यांनी 'थरकाप' आणि 'उतावळा नवरा' या चित्रपटांची निर्मितीही केली आहे.
-मंदार जोशी