चित्र-चरित्र

मधू कांबीकर
मधू कांबीकर
अभिनेत्री
२८ जुलै १९५३

‘मधू कांबीकर ही नुसतीच उत्तम नर्तिका नाही, तर उत्तम अभिनेत्री आहे’ असा उल्लेख श्रीराम लागू यांच्या ‘लमाण’ या आत्मकथनात आढळतो. अभिनयाच्या जोरावर श्रीराम लागूंसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याकडून कौतुकाची थाप मिळवलेल्या मधू कांबीकर ऊर्फ मधू वामन जाधव यांचा जन्म बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे झाला. तेथेच त्यांनी तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतले व त्या पुढचे सातवीपर्यंतचे शिक्षण कांबी या गावी पूर्ण केले. वयाच्या ११व्या वर्षी त्यांनी पुण्याच्या बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले, तर वयाच्या १३-१४ व्या वर्षी मधू कांबीकर यांनी गुरू पांडुरंग घोटीकर व लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडे लावणी नृत्याचे धडे घेतले. येथूनच मधू कांबीकर यांचा लोककलेचा प्रवास खर्‍या अर्थाने सुरू झाला.
एकीकडे लोककलाकार म्हणून नाव गाजत असतानाच दुसरीकडे लोककलाकार म्हणूनच त्यांना समाजाच्या अवहेलनेचा विषय व्हावे लागत होते, पण त्यानेही खचून न जाता मधू कांबीकर यांनी चित्रपटसृष्टीत कोणाच्याही मदतीशिवाय केलेला प्रवेश त्यांच्या धडपड्या वृत्तीचा निदर्शक असल्याचे लक्षात येते. चित्रपटात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना प्रभाकर पणशीकर यांनी ‘पुत्रकामेष्टी’ (१९८०) या अनिल बर्वेलिखित नाटकात काम करण्यासाठी बोलावले. येथेही त्यांना लोककलावंत म्हणून हिणवले गेले, पण या काळात मोठ्या हिमतीने त्यांच्या मागे वडीलकीच्या नात्याने उभे राहिले ते प्रभाकर पणशीकर. त्यांच्या सहकार्याने व आपुलकीने भारावलेल्या मधूबाईंनी या नाटकात केलेला अभिनय उत्कृष्ट ठरला व त्या वर्षीचा ‘नाट्यदर्पण’चा ‘विशेष लक्षवेधी अभिनेत्री’चा पुरस्कार त्यांनी पटकावला. त्यानंतर मधू कांबीकर यांनी ‘पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’, ‘फुलवंती’ इत्यादी १९ नाटकांमधून काम केलेले आहे.
याच दरम्यान त्यांनी ‘सतीची पुण्याई’, ‘दगा’, ‘लक्ष्मी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या आहेत. पण त्यांना चित्रपटसृष्टीत नावलौकिक प्राप्त झाला तो ‘शापित’मुळे (१९८२). ग्रामीण राहणीमान, ग्रामीण हेलातील बोलणे व चालण्या-बोलण्यात ग्रामीण ढंग यांमुळे ३६-३७ मुलींमधून मधूबाईंची निवड झाली, हे विशेष. स्नेहलता दसनूरकर यांच्या ‘वज्रदीप’ या कादंबरीवर आधारलेल्या ‘शापित’ या चित्रपटाची पटकथा ग. रा. कामत यांनी लिहिली होती. यात ‘बिजली’ नावाच्या ग्रामीण, खेडवळ व वेठबिगार असलेल्या पुरुषाच्या पत्नीची भूमिका मधू कांबीकरांना वठवायची होती. स्वत:चे बालपण खेड्यात गेलेले असल्यामुळे त्यांना ही भूमिका सहज करता आली असती. पण तरीही या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा खेड्यात जाऊन ग्रामीण स्त्रीच्या देहबोलीचा अभ्यास केला व त्या जाणिवा भूमिकेशी पडताळून पाहून मगच अभिनय केला. या चित्रपटातील ‘बिजली’ ही व्यक्तिरेखा सुंदर नवविवाहित स्त्री म्हणून चित्रपटाच्या सुरुवातीला समोर येते व चित्रपटाच्या शेवटी ती कणखर, आलेल्या अनुभवांनी आपले जीवन सक्षमपणे जगणारी एक बलवान स्त्री होते. सुंदर रूप व गरिबी यांच्यामुळे तिच्या आयुष्याचा झालेला विचका शोकमय आहे. या शोकमय जीवनाचा आलेख, अक्षमतेपासून सक्षमतेपर्यंतचा ‘बिजली’ या व्यक्तिरेखेचा प्रवास मधू कांबीकर यांनी आपल्या अभिनयातून ताकदीने उभा केला. खेडवळ स्त्रीची बसण्या-उठण्याची, बोलण्या-हसण्याची, तिच्या व्यक्तिगत व सामाजिक संघर्षाची, मुलाप्रती असणार्‍या तिच्या ममत्वाची, आपल्या स्त्रीअस्मितेचा अपमान झाला, त्याला नवरा जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर आयुष्यभर असणार्‍या रोषाची निरनिराळी रूपे मधू कांबीकरांनी आपल्या अभिनयाने संपन्न केली. त्यांच्या या अभिनयासाठी त्यांना १९८३ सालची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राज्य शासनाने गौरवले, तसेच ‘फिल्मफेअर’ हा मानाचा पुरस्कारही लाभला. अभिनयाची कारकीर्द सुरू झाल्या झाल्या मानाचे पुरस्कार मधू कांबीकरांना लाभले, यातूनच त्यांची अभिनयक्षमता ध्यानात येते. ही अभिनयक्षमता राजदत्त यांच्यासारख्या दिग्दर्शकाने हेरली व त्यांचे चीज केले, हेही वाखाणण्यासारखे आहे. तेव्हाच मधू कांबीकर यांनी राजदत्त यांना आपले गुरू मानले, ते कायमचे.
यानंतरचा त्यांचा चित्रपट म्हणजे ‘राघू मैना’ (१९८२). वसंत सबनीसलिखित ही पटकथा लोककलेत काम करणार्‍या कलावंताची दुर्दशा दाखवणारी आहे. यात त्यांच्यासोबत निळू फुले, अशोक सराफ व नाना पाटेकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी कामे केली होती. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील अभिनयासाठी राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी मधू कांबीकर यांचे नामांकन झाले होते.
या दोन चित्रपटांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर मधूबाईंना एक ते दीड वर्ष कामे मिळाली नाहीत, पण १९८४ साली त्यांना ‘हेच माझे माहेर’ नावाचा चित्रपट मिळाला. यातील मामा-मामींनी सांभाळ केलेल्या अनाथ ‘शकू’ची भूमिका त्यांनी केली. आयुष्यभर दु:ख पाहिलेल्या अनाथ मुलीचा लग्नानंतरही सासरी छळ होतो, एका मुलाच्या जन्मानंतर नवर्‍याचा मृत्यू होतो व तिचे आयुष्य आणखी वैराण होते, पण मुलाला सांभाळण्याची जबाबदारी समर्थपणे ती पेलते व आपल्या मुलाला मोठे करते. अनाथ मुलगी ते कर्तव्यदक्ष माता असा ‘शकू’ या व्यक्तिरेखेचा बहुआयामी प्रवास त्यांनी आपल्या अभिनयातून समर्थपणे साकारल्यामुळेच या भूमिकेसाठी त्यांना १९८५चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लाभला.
मधू कांबीकर यांचा पुढील टप्प्यातील महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘एक होता विदूषक’. पुलंची पटकथा, ना.धों. महानोर यांच्या लावण्या, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांचे नृत्यदिग्दर्शन, डॉ. जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन व लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका. यातला मधू कांबीकर यांचा अभिनय कलावंत आईचा संघर्ष मांडणारा आहे. हा संघर्ष वयात आलेल्या आपल्या मुलाबरोबर तमाशाच्या फडात काम करताना आपल्या वयाचे भान ठेवण्याचे तारतम्य व त्याच वेळेस आपल्या कलेला न्याय देण्याचा ध्यास, असा दुहेरी पातळीवरचा आहे. आपल्या कलेवर निरतिशय प्रेम असणारी ही कलावंत स्त्री आपल्या मुलावर कलेइतकेच निर्व्याज प्रेम करते. हा दोन टोकातला संघर्ष या बाणेदार व स्वाभिमानी स्त्रीला सतत अस्वस्थ करत राहतो, ते अस्वस्थपण त्यांनी आपल्या अभिनयातून प्रत्ययकारी पद्धतीने मांडले आहे. याचे मूळ आपल्याला त्यांच्या ‘मधुरंग’ आत्मकथनातील काही भागांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या वास्तव अभिनय कारकिर्दीमधील ठसठसते दु:ख प्रेक्षकांना ‘एक होता विदूषक’ या चित्रपटाच्या माध्यमातून, त्यातल्या त्यांच्या अस्सल अभिनयातून पाहायला मिळते. त्यामुळेच एका आईचे अस्वस्थपण या भूमिकेच्या माध्यमातून त्या नेटकेपणाने, सहजपणाने व वास्तवरीत्या मांडू शकल्या असे वाटते. या चित्रपटाची निवड ‘इंडियन पॅनोरमा’त झाली होती, तसेच राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठीही मधूबाईंचे नामांकन झाले होते.
यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या मधू कांबीकर यांनी त्यानंतर ‘रावसाहेब’ या चित्रपटात काम केले व त्यातील अभिनयासाठीही त्यांना १९९६ सालचा राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. १९९९ साली त्यांनी ‘साद’ नावाचा गुजराती चित्रपटात काम केले. त्यातील त्यांच्या संवादरहित आंगिक अभिनयासाठी त्यांना गुजराथ राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. २००१ व २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘आई कुलस्वामिनी तुळजाभवानी’ व ‘संघर्ष जीवनाचा’ या चित्रपटातील भूमिकांसाठीही त्यांना राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार लाभलेले आहेत, तर २००५ व २००६ साली आलेल्या ‘राजा पंढरीचा’ व ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘संत गाडगे महाराज’, ‘ती’ या चित्रपटांसाठी नामांकन झाले होते. त्यांनी दादा कोंडके यांच्याबरोबर काम केलेल्या ‘ह्योच नवरा पायजे’, ‘मला घेऊन चला’, ‘येऊ का घरात’ या चित्रपटांनाही यश मिळाले. याशिवाय त्यांचे ‘बिनकामाचा नवरा’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘रणरागिनी’, ‘दुसर्‍या जगातली’, ‘पैज लग्नाची’, ‘अशी असावी सासू’, ‘झपाटलेला’ आदी चित्रपटही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. त्यांनी ‘होळी रे होळी’, ‘सर्जा राजा’, ‘वैभव’, ‘संत गाडगे महाराज’, ‘श्रावणधारा’, ‘मुक्ती’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमध्येही काम केलेले आहे. तसेच त्यांनी ‘मधुप्रीतम’ (१९९६) नावाची संस्था स्थापन करून त्याद्वारे अभिजात पारंपरिक लावणी या लोककलेचे जतन व संवर्धन करणारा ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम सातत्याने सादर केला. या माध्यमातून पेशवेकालीन पारंपरिक लावणी व तिचा इतिहास रेखाटण्याचे मधू कांबीकर यांचे काम उल्लेखनीय आहे. तसेच नृत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या नावे ‘लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठान’ची स्थापना ही त्यांच्या लोककलेशी असणार्‍या इमानाची ग्वाही देणारी आहे. त्यांनी ‘ओमप्रीतम’ नावाची आपली निर्मिती संस्था स्थापन करून ‘काटा रुते कुणाला’ नावाच्या टेलिफिल्मची निर्मितीही केली होती.
लोकनाट्य-नाटक-दूरदर्शन मालिका-चित्रपट असा चौफेर प्रवास करणार्‍या मधू कांबीकर यांनी आपल्या बहुआयामी अभिनयकौशल्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे ठाम, निश्‍चित व आवर्जून दखल घेतले जाणारे स्थान निर्माण केलेले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमाच्या सादरीकरणावेळीच त्या रंगमंचावर बेशुद्ध झाल्या होत्या. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याच्या निदानानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मात्र, त्यामुळे त्यांना अभिनयापासून काही काळ दूर राहावे लागले.
- डॉ. अर्चना कुडतरकरचित्र-चरित्र