चित्र-चरित्र

अतुल गोगावले
अतुल गोगावले
संगीतकार
११ सप्टेंबर १९७४

आपल्या सुरेल संगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आजच्या पिढीचे संगीतकार म्हणजे अजय-अतुल. या दोघांचाही जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांची सारखी बदली होत असे. त्यामुळे अजय व अतुल यांना पश्‍चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावी राहावे लागे. ग्रामीण संस्कृती, तिथल्या परंपरा, त्याचप्रमाणे तिथल्या भाषेचा ढंग, उच्चारातले बारकावे त्यांना जवळून हेरता आले. लहानपणापासूनच काकडआरतीपासून ते लग्नानंतरच्या गोंधळापर्यंत लोकसंगीताचे सर्व प्रकार त्यांना बघायला व ऐकायला मिळाले. लहानपणी बघितलेला सांस्कृतिक महाराष्ट्र पुढे त्यांच्या संगीतातून अवतरला. लहानपणी दोघांनाही शिक्षणामध्ये विशेष रस नव्हता. पण शालेय जीवनातच संगीताविषयीचा त्यांचा ओढा वाढला. शाळेत असतानाच गाणी-नृत्य बसवणे, बँड पथकात भाग घेणे असे त्यांचे उद्योग चालूच होते. घरात संगीताची पार्श्‍वभूमी नसल्यामुळे त्यांना संगीतासाठी घरातून प्रोत्साहन मिळाले नाही. तसेच, वाद्ये विकत घेण्याएवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी पुण्याला आल्यावर घराजवळच्या बँडवाल्याशी ओळख करून घेऊन त्यांच्याकडून अनेक वाद्ये शिकून घेतली. पुण्याच्या काही वाद्यवृंदांतून ते कार्यक्रम करू लागले.

महाविद्यालयात असताना एन.सी.सी.च्या स्पर्धेत त्यांनी पूर्वसंगीतबद्ध व स्वत: संगीतबद्ध केलेले गाणे सादर केले व त्यासाठी त्यांना प्रथम बक्षीस मिळाले. दरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे व दादा कोंडके यांच्यासमोर ‘पोवाडा’ गायल्यामुळे त्यांचे कौतुक झाले व त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली. एकांकिका, खाजगी अल्बम्स अशी कामे करता करता चांगल्या संगीतामुळे त्यांचे नाव झाले आणि लवकरच ‘विश्वविनायक’ हा त्यांचा पहिला अल्बम आला. त्यातली गाणी खूप गाजली. ‘सही रे सही’, ‘लोचा झाला रे’, ‘कळा या लागल्या जीवा’, ‘नामदेव म्हणे’, ‘गोपाळा गोपाळा’, ‘मन उधाण वार्‍याचे’ इ. नाटकांना त्यांनी दिलेले संगीत लोकप्रिय झाले. या दोघांनी उमेदवारीच्या काळात रवींद्र जैन, विशाल भारद्वाज, अमर उत्पल, अशोक पत्की, श्रीधर फडके इ. संगीतकारांकडे काम केले.

व्यावसायिक जिंगल्सपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार्‍या अजय-अतुल यांनी जाहिराती, बॅले यांना दिलेले संगीतही वेगळ्या धाटणीचे होते. नाटक, जाहिराती, जिंगल्स यांना संगीत देणार्‍या अजय-अतुल यांनी ‘सावरखेड - एक गाव’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘जबरदस्त’, ‘उलाढाल’, ‘जोगवा’, ‘नटरंग’, ‘भारतीय’, ‘सैराट’, ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ आदी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले. या चित्रपटातील गाण्यांच्या तालाने रसिकांचे पाय जसे थिरकले, तसेच काही गाण्यांनी, त्यातील भावार्थ आळवणीने रसिकांना अस्वस्थही केले. ‘सैराट’ चित्रपटामधील गाण्यांनी तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटाची त्यांनी निर्मितीही केली आहे.

श्रवणीयता, भावमधुरता, आराधना, परमेश्‍वर आळवणी, प्रेमाराधन अशा अनेकानेक भावना अजय-अतुल यांच्या संगीतातून व्यक्त झालेल्या आहेत. संगीताची उत्तम जाण असणार्‍या या जोडीने आपल्या आवाजात गायलेल्या गाण्यांनाही तितकीच लोकप्रियता मिळालेली दिसते. ‘कोंबडी पळाली...’, ‘बायको कायको...’, ‘मोरया मोरया...’, ‘ये गो ये, ये मैना...’, ‘मल्हारवारी...’, ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यांच्या तालावर तरुणाईची पावले ताल धरू लागली, तशीच ‘खेळ मांडला...’, ‘मन उधाण वार्‍याचे...’, ‘जीव रंगला’ यांसारख्या गाण्यांनी भावविवशही होऊ लागला.

संगीताच्या माध्यमातून रसिकांच्या परस्परविरुद्ध भावना मनात निर्माण करण्याचे अजय-अतुल यांचे कौशल्य निश्‍चितच वाखाणण्याजोगे आहे. मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही फार थोड्या अवधीत या जोडीने आपल्या नावाचा ठसा उमटवला. ‘लाईफ हो तो ऐसी’ (यातील हनुमान चालीसा), ‘विरुद्ध’, ‘गायब’, ‘सिंघम’, ‘अग्निपथ’, ‘बोल बच्चन’ अशा हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. ‘सैराट’च्या ‘धडक’ या हिंदी रीमेकलाही अजय-अतुल यांनीच संगीत दिलं. या सर्व चित्रपटांमधील त्यांचे संगीत लोकप्रिय ठरले, आणि ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार म्हणून नावारूपाला आले. दक्षिणेतले प्रसिद्ध संगीतकार इलया राजा यांच्याबरोबर काम करायची संधीही त्यांना मिळाली.

अजय-अतुल यांना आपल्या यशस्वी संगीत कारकिर्दीबद्दल महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार, २००५ सर्वोत्कृष्ट संगीतकार (सावरखेड एक गाव), माता सन्मान, २००५ सर्वोत्कृष्ट संगीतकार (सावरखेड एक गाव), संस्कृती कला दर्पण, २००५ सर्वोत्कृष्ट संगीतकार (अगं बाई अरेच्चा), माता सन्मान - सर्वोत्कृष्ट संगीतकार, २००९ (जोगवा), व्ही. शांताराम पुरस्कार २००९ सर्वोत्कृष्ट संगीतकार (उलाढाल), राज्य पुरस्कार २००९ सर्वोत्कृष्ट संगीतकार (जोगवा), आदी पुरस्कार मिळालेले आहेत, तर २०११ चा राम कदम पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. मराठी लोकसंगीताचा बाज सांभाळून लोकप्रिय गाणी देणारे ‘अजय-अतुल’ आजच्या पिढीचे मोठे संगीतकार आहेत.

- मधू पोतदारचित्र-चरित्र