चित्र-चरित्र

अरुण दाते
अरुण दाते
गायक
४ मे १९३४ --- ६ मे २०१८

प्रख्यात भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म 4 मे 1934 रोजी झाला होता. अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. अरुण दाते इंदूरजवळच्या धारमध्ये कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले.अरुण दातेंनी 1955 पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचं संगीत यांनी सजलेल्या 'शुक्रतारा मंदवारा...' या गाण्यातून अरुण दाते खऱ्या अर्थाने नावारुपास आले. 1962 मध्ये त्यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली होती. 28 वर्ष टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रात पूर्णवेळ झोकून दिलं. 2010 पर्यंत अरुण दाते यांचे 'शुक्रतारा' या मराठी भावगीत कार्यक्रमाचे अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक अल्बमही लोकप्रिय आहेत. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत अनेक द्वंद्वगीतं गायली आहेत. अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावे लिहिलेलं आत्मचरित्र 1986 मध्ये प्रसिद्ध झालं होतं. 2016 मध्ये हे पुस्तक पुनर्प्रकाशित करण्यात आलं.

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘असे जीवनगाणे गातानाच’, ‘स्वरगंगेच्या काठावरती’, ‘दिलेल्या वचनाची’, ‘दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी’, ‘मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे’, ‘दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे’, ‘डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी’, ‘काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, ‘भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची’, ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती’ ही त्यांची गाजलेली गीते. अरुण दाते यांनी चित्रपट क्षेत्रात खूप कमी प्रमाणात पार्श्वगायन केलं. ‘मला देव भेटला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी पार्श्वगायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘सख्या सजणा’, ‘निलांबरी’, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ आदी चित्रपटांमध्येही त्यांनी काही गाणी गायली होती.



चित्र-चरित्र